चिंतामण विनायक वैद्य
भारताचार्य चिंतामण विनायक वैद्य (जन्म : कल्याण, १८ ऑक्टोबर, इ.स. १८६१ - कल्याण, २० एप्रिल, इ.स. १९३८) हे संस्कृत भाषेतील विद्वान होत. ते एक थोर ज्ञानोपासक, महाभारत-रामायणाचे संशोधक - मीमांसक व चतुरस्र ग्रंथकार होते. यांनी अनेक माहितीप्रचुर पुस्तके लिहिली. संस्कृत भाषेच्या व्यासंगामुळे त्यांनी रामायण-महाभारतासारख्या पौराणिक इतिहासाच्या अनेक अपरिचित भागांवर प्रकाश टाकला.
चिंतामणराव वैद्यांचे वडील विनायकराव हे कल्याणला वकिली करीत. चिंतामणरावांचे शिक्षण कल्याण तसेच मुंबईच्या एल्फिन्स्टन स्कूल व एल्फिन्स्टन कॉलेजात झाले. इ.स. १८८२त एम.ए. आणि १८८४मध्ये एल्एल.बी. झाल्यानंतर त्यांनी काही काळ कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे मुनसफ म्हणून व नंतर ठाण्याच्या कोर्टात वकील म्हणून काम केले. त्यानंतर ते उज्जैन येथे न्यायाधीश पदावर रुजू झाले. पुढे १८९५मध्ये ग्वाल्हेर संस्थानच्या सरन्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली. सेवानिवृत्तीनंतर ते १९०५ सालापासून लोकमान्य टिळकांचे सहकारी म्हणून काम करू लागले. राष्ट्रीय शिक्षणाचे काम त्यांनी आस्थेने व निष्ठेने केले. कोलकाता, सुरत आदी काँग्रेस अधिवेशनांना ते टिळकांबरोबर गेले. टिळकांच्या पश्चात वैद्यांनी महात्मा गांधीजींचा मार्ग अनुसरला. वेगवेगळ्या समित्यांवर काम करणे, अहवाल लिहिणे ही कामे त्यांनी गांधींच्या मार्गदर्शनाखाली केली.
कार्य
[संपादन]वैद्य हे पुणे येथे टिळक महाविद्यालयात व्याख्याते होते
लेखन
[संपादन]चि.वि. वैद्यांनी १८८९ ते १९३४ या काळात सुमारे ५०,००० पृष्ठे इतके लेखन इंग्रजी-मराठीत केले. त्यांचे स्फुटलेखन केसरी, विविधज्ञानविस्तार, इंदुप्रकाश, नेटिव्ह ओपिनियन आदी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. यांपैकी फारच थोडे लेखन ग्रंथरूपात आले. त्यांचे एकूण २९ ग्रंथ प्रकाशित झाले, पैकी ९ ग्रंथ इंग्रजीत आणि २० मराठीत होते.
रामायण-महाभारतावरील लेखन
[संपादन]चिं.वि. वैद्यांच्या ’महाभारत ए क्रिटिसिझम या इंग्रजी ग्रंथावर लोकमान्य टिळकांनी केसरीतून सलग आठ अग्रलेख लिहून परीक्षण केले व ग्रंथांची मौलिकता दाखविली. त्यानंतर टिळकांनी आणखी एक अग्रलेख लिहून रिडल ऑफ रामायण या ग्रंथाचे परीक्षण केले. रामायण व महाभारत ही कल्पित काव्ये नसून ते इतिहासाचे ग्रंथ आहेत, या आपल्या विश्वासाला वैद्यांकडून व्यासंगपूर्ण समप्रमाण पुष्टी मिळाल्याबद्दल लोकमान्यांनी आपल्या अग्रलेखात (६ जुलै१९०६) समाधान व्यक्त केले आहे. वैद्यांनी महाभारताच्या संदर्भात एपिक इंडिया व श्रीकृष्ण चरित्र हे ग्रंथ लिहिले.
हिंदू आणि अन्य धार्मिक कल्पनांविषयीचे लेखन
[संपादन]मानवधर्मसार व हिंदू धर्माची तत्त्वे या दोन पुस्तिकांतून वैद्यांचे हिंदुधर्मविषयक विचार व्यक्त झाले आहेत. त्यांच्या या पुस्तकांतून ईश्वर, सैतान, स्वर्ग आणि नरक, ग्रंथप्रामाण्य, चमत्कार, मूर्तिपूजा, आश्रमव्यवस्था इ. विषयांसंबंधी चिकित्सा केलेली आहे.
चिंतामणराव वैद्यांचे इतिहासविषक लेखन
[संपादन]वैद्यांनी प्राचीन व मध्ययुगीन भारतीय इतिहासावर विविधांगी व प्रचंड संशोधन करून ग्रंथलेखन केले. त्यांपैकी ‘हिस्टरी ऑफ मिडिव्हल हिंदू इंडिया’ या ग्रंथाचे तीन खंड त्यांनी प्रथम इंग्रजीत लिहिले. आणि त्यानंतर त्याचा तीन-खंडी मराठी अनुवाद ‘मध्ययुगीन भारत’ या नावाने प्रसिद्ध केला. याशिवाय ‘गझनीच्या महमूदाच्या स्वाऱ्या’ आणि ‘शिवाजी द फाउंडर ऑफ मराठा स्वराज’ हे त्यांचे दोन अन्य इतिहासविषक ग्रंथ होत.
प्रकाशित साहित्य
[संपादन]- अबलोन्नतिलेखमाला (१९०६)
- एपिक इंडिया (१९०७)
- ए हिस्टरी ऑफ संस्कृत लिटरेचर (१९२६)
- गझनीच्या महमूदाच्या स्वाऱ्या (१९२६)
- चिं.वि. वैद्यांचे ऐतिहासिक निबंध (१९३१)
- दुर्दैवी रंगू (कादंबरी, १९१४)
- मध्ययुगीन भारत (तीन खंड, १९२५)
- महाभारत ए क्रिटिसिझम (१९०४)
- महाभारत कथासार
- महाभारताचा उपसंहार (१९१८)
- महाभारताचे खंड - सभापर्व, विराटपर्व, उद्योगपर्व (१९३३-३५)
- मानवधर्मसार - संक्षिप्त मनुस्मृति (१९०९)
- रामायण कथासार
- रिडल ऑफ रामायण (१९०६)
- शिवाजी द फाउंड��� ऑफ मराठा स्वराज (१९३१)
- श्रीकृष्ण चरित्र (१९१६)
- संयोगिता (नाटक, १९३४)
- संस्कृत वाङमयाचा इतिहास - मूळ संस्कृत वैदिक ग्रंथांचा इतिहास
- संस्कृत वाङ्मयाचा त्रोटक इतिहास (१९२२)
- संक्षिप्त महाभारत (१९०५)
- हिंदू धर्माची तत्त्वे (१९३१)
- हिस्टरी ऑफ मीडिएव्हल हिंदू इंडिया (इंग्लिश) (History of Mediaeval Hindu India, ३ खंड, १९२१, १९२४ व १९२६)
चिं.वि. वैद्यांचे झालेले सन्मान आणि त्यांनी भूषविलेली पदे
[संपादन]- महाभारताचा तर्कशुद्ध सखोल प्रगाढ अभ्यास करून, महाभारताची सर्वंकष मीमांसा करणारा आद्य भाष्यकार म्हणून लोकमान्यांनी चिं.वि. वैद्यांना `भारताचार्य' ही पदवी दिली.
- १९०८ साली पुणे येथे भरलेल्या सहाव्या मराठी साहित्य (ग्रंथकार) संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
- भारत इतिहास संशोधन मंडळाचे सुरुवातीपासून (१९१०) आजीव सदस्य व पुढे अध्यक्ष (१९२६–३६) झाले.
- टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे पहिले कुलगुरुपद त्यांनी भूषविले (१९२२–३४) व पुढे ते त्याचे कुलपती (१९३४–३८) झाले.
- वैदिक संशोधन मंडळाच्या स्थापनेत ना. श्री. सोनटक्के यांना त्यांनी बहुमोल सहकार्य केले.
- टिळक विद्यापीठ आणि वैदिक संशोधन संस्थेत ते शिकवीत असत.
बाह्य दुवे
[संपादन]