मराठी नाट्यसंगीत
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. |
मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीने जागतिक रंगभूमीला दिलेली देणगी आहे, असे मानले जाते. विष्णूदास भावे यांनी मराठी रंगभूमीचा श्रीगणेशा केला तर संगीत नाटकाचा लौकिक अर्थाने प्रारंभ अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतल (१८८०) या नाटकाने झाला. त्यानंतर सौभद्र, रामराज्यवियोग, द्रौपदी, विद्याहरण, शारदा, स्वयंवर, मानापमान, संशयकल्लोळ, एकच प्याला ...अशा संगीत नाटकांची परंपराच निर्माण झाली. १८८० ते १९३० हा संगीत नाटकांच्या आणि पर्यायाने नाट्यसंगीताचा सर्व अर्थांनी सुवर्णकाळ होता.
डिसेंबर १९१६ मध्ये संगीत स्वयंवर रंगभूमीवर आले. या नाटकात ३९ रागांचा वापर करून बांधलेली ५५ नाट्यगीते होती. या कालखंडात गाणी पुढे आणि नाटक मागे अशी परिस्थिती होती. इ.स.१९४२ मध्ये रंगभूमीवर आलेल्या ’संगीत कुलवधू’ या नाटकाद्वारे मास्टर कृष्णराव यांनी ही परिस्थिती बदलली. त्यांनी नाट्यपदांना भावगीतांच्या वळणाने जाणाऱ्या चाली दिल्या होत्या. इ.स. १९६० नंतर पं जितेंद्र अभिषेकी यांनी नाट्यपदांमध्ये सुगम संगीताला प्राधान्य दिले. त्यामुळे नाटकांत ताना मारून गाणारे नट सुगम संगीत गाऊ लागले.
समीक्षकांनी व अभ्यासकांनी संगीत नाटकांच्या इतिहासातील काळाचे टप्पे पुढीलप्रमाणे मानले आहेत.
- किर्लोस्कर-देवल काळ - १८८० -१९१०
- खाडिलकर-बालगंधर्व काळ - १९१० - १९३०
- अत्रे-रांगणेकर काळ - १९३० - १९६०
- गोखले-कानेटकर काळ - १९६० - १९८०
नाटककार, संगीतकार, गायक-अभिनेते
[संपादन]बळवंत पांडुरंग किर्लोस्कर, गोविंद बल्लाळ देवल, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, राम गणेश गडकरी, मामा वरेरकर, आप्पा टिपणीस, वीर वामनराव जोशी, वसंत शांताराम देसाई, प्र.के. अत्रे, गोविंदराव टेंबे, मास्टर कृष्णराव, स्वातंत्र्यवीर सावरकर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, वि.सी. गुर्जर, विद्याधर गोखले, विश्राम बेडेकर, नरसिंह चिंतामण केळकर, माधवराव पाटणकर, ह.ना. आपटे, माधवराव जोशी, मो. ग. रांगणेकर, वि. वा. शिरवाडकर, वसंत कानेटकर, नागेश जोशी, बाळ कोल्हटकर, पुरुषोत्तम दारव्हेकर मोहन दांडेकर, मधुवंती दांडेकर, महेश एलकुंचवार अशा अनेक नाटककारांच्या संगीत नाटकांना विविध कालखंडात पद्यरचनाकार लाभले. १९६० नंतर शांता शेळके यांनी हे बंध रेशमाचे, धाडीला राम तिने का वनी, वासवदत्ता अशा काही संगीत नाटकांसाठी गीते लिहिली.
इतिहास
[संपादन]गायनाचार्य भास्करबुवा बखले, गोविंदराव टेंबे, मास्टर कृष्णराव, पं. राम मराठे, पं. जितेंद्र अभिषेकी, छोटा गंधर्व, केशवराव भोळे असे दिग्गज संगीतरचनाकार (संगीतकार) लाभल्याने मराठी नाट्यसंगीत समृद्ध झाले. यातील प्रत्येक संगीतरचनाकार स्वतः उत्तम गायक होते. हिंदुस्थानभर भ्रमण करून संगीताचे ज्ञान आणि संस्कार त्यांनी आत्मसात केल्याने, त्याचे प्रतिबिंब नाट्यसंगीतात पडणे स्वाभाविक होते. उदाहरणार्थ ‘मानापमान’ नाटकातील अनेक चाली बनारस, लखनौ तसेच पंजाब येथील उपशास्त्रीय गायनप्रकारांवर बेतलेल्या आहेत. तसेच ‘स्वयंवर’ मधील अनेक पदे मूळ बंदिशींवर आधारली आहेत.
दरम्यान अभिजात शास्त्रीय संगीत गाणारे मोठे कलाकारही मैफिलीत नाट्यसंगीताचा समावेश करू लागले. उस्ताद अब्दुल करीम खॉं, सवाई गंधर्व, पं. भीमसेन जोशी, हिराबाई बडोदेकर, सरस्वती राणे, ज्योत्स्ना भोळे, पं. जितेंद्र अभिषेकी, छोटा गंधर्व, पं. राम मराठे, विनायकबुवा पटवर्धन, मास्टर कृष्णराव, निवृत्तीबुवा सरनाईक, मास्टर दीनानाथ मंगेशकर, मालिनी राजूरकर अशी अनेक शास्त्रीय गायकांची नावे सांगता येतील. नाट्यसंगीत सर्व स्तरांत लोकप्रिय करण्याचे काम या कलाकारांनी केले.
विविध सांगीतिक आकृतिबंध
[संपादन]भारतीय संगीत परंपरेतील विविध सांगीतिक आकृतिबंध नाट्यसंगीतातून प्रत्ययास येतात. ध्रुपद - धमारापासून ते गजल -कव्वालीपर्यंत आणि भावगीतापर्यंत हे वैविध्य दिसते. ख्याल, तराणा, ठुमरी, कजरी, होरी, चैती, गजल, कव्वाली, लावणी, साकी, दिंडी, आर्या, अभंग, स्त्रीगीते असे अनेक प्रकार नाट्यसंगीतातून मुक्तपणे वापरलेले दिसतात.
किर्लोस्करी नाटकांतील संगीतावर कर्नाटकातील यक्षगानाचा प्रभाव होता. महाराष्ट्रातील कीर्तनपरंपरेचे व लोकसंगीताचे अंश (दिंडी, साकी, लावणी), जयदेवांच्या गीतगोविंदाचे प्रतिबिंब, आणि शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत गायला जाणारा टप्पा हा प्रकारही नाट्यगीतांत वापरलेला दिसतो.
नाट्यसंगीतामुळे वेगवेगळ्या रागांचा प्रसार झाला. अनृतचि गोपाला (सूरदासी मल्हार), आनंदे नटती (मल्हार), उगवला चंद्र पुनवेचा (मालकंस), एकला नयनाला विषय तो झाला (पहाडी), कटु योजना ही विधीची (शंकरा), ललना मना (गरुडध्वनी), कठीण कठीण ���िती, कृष्ण माझी माता (बागेश्री), कोण अससी तू नकळे मजला (जोगकंस), खरा तो प्रेमा (पहाडी - मांड), गुरू सुरस गोकुळी (जयजयवंती), जय गंगे भागीरथी (कलावती), जय शंकरा गंगाधरा (अहिरभैरव), जयोस्तुते उषादेवते (देसकार), झणी दे कर या (अडाणा), तळमळ अति अंतरात (सोहनी), नाथ हा माझा (यमन), पुरुष हदय बाई (यमनकल्याण), बोला अमृत बोला (भैरवी) अशी कित्येक उदाहरणे सांगता येतील. याशिवाय अनेक संतरचना नाट्यसंगीत म्हणून वापरल्या गेल्या आणि विविध रागांत त्यांची अनेक रूपे रसिकांच्या मनात ठसली. अवघाची संसार सुखाचा करीन (धानी), अगा वैकुंठीच्या राया (भैरवी), अमृताहुनि गोड, देवा धरिले चरण (भीमपलास), देवा तुझा मी सोनार (जौनपुरी) या नाट्यगीतांचा उल्लेख या संदर्भात करता येईल.
नाट्यसंगीताचे अनेक प्रवाह विविध कालखंडांत निर्माण झाले, त्यांना रसिकाश्रय लाभला. किर्लोस्करी काळातील नाट्यसंगीतावर कीर्तन परंपरेचा प्रभाव होता. घरगुती पण वास्तववादी अशी ही नाटके होती. विषयही बहुधा पौराणिक असत. उदा. शाकुंतल, सौभद्र, द्रौपदी, सावित्री, मेनका, आशानिराशा, रामराज्यवियोग, विधिलिखित. त्यानंतर देवलांच्या ‘शारदा’ ने अतिशय सोपी, सहज पण प्रासादिक पदे नाट्यसंगीतात आणली. त्यात माधुर्य होते आणि जिव्हाळाही होता. शिवाय एक सामाजिक भानही या पदांमध्ये होते. उदा. शारदा, संशयकल्लोळ, मृच्छकटिक या नाटकांतील रचना. कृ. प्र. खाडिलकरांची पदे ओजोगुणयुक्त आणि आदर्शवादी आहेत. हे स्वयंवर, मानापमान, विद्याहरण, द्रौपदी, मेनका, त्रिदंडीसंन्यास यातील नाट्यपदे ऐकल्यानंतर लक्षात येते. सुभाषितांचे मोल यातील काही पदांना मिळाले, हेही एक वैशिष्ट्य मानावे लागेल. मी अधना न शिवे भीती मना, तव जाया नृपकन्या, प्रेमसेवा शरण, शूरा मी वंदिले, स्वकुलतारक सुता, ही ‘सुभाषितांची’ उदाहरणे होत. किर्लोस्कर, खाडीलकर, देवल यांच्यापेक्षा निराळा बाज गडकरी, सावरकर, वरेरकर, जोशी, रांगणेकर यांनी नाट्यगीतांतून पुढे आणला. नाट्यपदांची रचना अधिक काव्यमय, सोपी, गायनानुकूल झाली. नाट्यपदांची संख्याही लक्षणीयरीत्या कमी झाली. हा बदल रसिकांनाही भावला.
गंधर्वोत्तर काळातील प्रतिभासंपन्न नाट्य-संगीतकार मास्टर कृष्णराव आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांनी मराठी संगीत नाटकातील संगीतात लक्षवेधक प्रयोग केले. नाट्यपदांची अ-विस्तारक्षमता (विस्ताराला अतिरेकी वाव नसणारी बांधीव रचना) आणि स्वतंत्र स्वररचना (बंदिशींवर आधारित नव्हे तर स्वतंत्र चाली बांधल्या) ही वैशिष्ट्ये जपत मा. कृष्णराव व अभिषेकींनी नाट्यसंगीत आटोपशीर केले. भावगीतांचा सुंदर वापर (उदा० मनरमणा मधुसूदना, क्षण आला भाग्याचा, नाच हृदया आनंदे, अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा, गर्द सभोती रानसाजणी, सर्वात्मका सर्वेश्वरा,) तसेच अनवट रागांचा वापर (उदा० धानी, बिहागडा, सालगवराळी) त्यांनी नाट्यसंगीतात केला. शहाशिवाजी, कट्यार काळजात घुसली, जय जय गौरीशंकर, नेकजात मराठा, पंडितराज जगन्नाथ, मदनाची मंजिरी, मंदारमाला, मेघमल्हार, संन्यस्तखड्ग, सुवर्णतुला, स्वरसम्राज्ञी - ही संगीत नाटकांची सूची पाहिली असता संगीतामुळे नाटक किती उत्कट व प्रभावी बनू शकते याचा प्रत्यय आपल्याला येतो.
अन्य माहिती
[संपादन]काही वेळा संगीत नाटकापेक्षा त्यातील पदांच्या ध्वनिमुद्रिकांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले. उगवला चंद्र पुनवेचा (बकुळ पंडित), ऐसा महिमा प्रेमाचा (रतिलाल भावसार), काटा रुते कुणाला (अभिषेकीबुवा), गुलजार नार ही मधुबाला (वसंतराव देशपांडे), दान करी रे (रामदास कामत), मर्मबंधातली ठेव ही (प्रभाकर कारेकर), मधुमीलनात या विलोपले (आशा भोसले), मानसी राजहंस पोहतो (ज्योत्स्ना भोळे) अशा नाट्यपदांच्या ध्वनिमुद्रिका अतिशय लोकप्रिय झाल्या आणि आजही आहेत. लोकप्रिय ध्वनिमुद्रिकांची असंख्य उदाहरणे देता येतील.
शाकुंतल, सौभद्र या नाटकांच्या काळात नाटकांतील पदांची संख्या भरघोस होती. त्यामुळे नाटके रात्रभर चालत असत. बोलपटांच्या आगमनाने दोन-तीन तासांची कमरणूक सहज उपलब्ध झाल्याने संगीत नाटकांची गरज कमी होत गेली. तसेच या काळात संगीत नाटकाने बदलत्या काळाशी जुळवून घेणे नाकारल्याने नाट्यसंगीतही मागे पडत गेले. ‘नाट्यमन्वंतर’ या नाट्यसंस्थेच्या कुलवधू, आंधळ्यांची शाळा, भूमिकन्या सीता आदि नाटकांनी १९४० च्या दशकात काही बदल करून आटोपशीर नाट्यसंगीत रसिकांसमोर आणले. त्यांना उत्तम प्रतिसादही मिळाला.
नाट्यसंगीतावरील मराठी पुस्तके
[संपादन]- नाट्यसंगीत प्रकाश (वि.मा.दी. पटवर्धन)
- नाट्यसंगीत : वाङमय समीक्षा (ह.रा. महाजनी)
- नोटेशन : लोकप्रिय मराठी नाट्यसंगीतांचे (अशोक सहस्रबुद्धे)
- मराठी नाट्यसंगीत (बाळ सामंत)
- मराठी नाट्यसंगीत-स्वरूप आणि समीक्षा (विजया टिळक, त्रिदल प्रकाशन)
- वेध : संगीत नाटक आणि नाट्यसंगीत (श्रीरंग संगोराम, प्रकाशक - प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन (पुणे, १९९३)
संगीत रंगभूमीवरील काही महत्त्वाचे कलाकार
[संपादन]- गायनाचार्य भास्करबुवा बखले
- गोविंदराव टेंबे
- मास्टर दीनानाथ मंगेशकर
- बालगंधर्व
- केशवराव भोसले
- मास्टर कृष्णराव
शास्त्रीय संगीताच्या रागांवर आधारलेली काही नाट्यगीते
[संपादन]गीताचे शब्द | नाटकाचे नाव | राग |
---|---|---|
अंगणी पारिजात फुलला | सुवर्णतुला | बिहाग |
अरे वेड्या मना | शाकुंतल | पिलू |
अशि नटे ही चारुता | कान्होपात्रा | तिलंग |
एकला नयनाला | स्वयंवर | मिश्र कल्याण यमन |
कशि या त्यजू पदाला | एकच प्याला | मिश्र यमन |
काटा रुते कुणाला | हे बंध रेशमाचे | भीमपलासी |
कोण तुजसम सांग | सौभद्र | पिलू |
जयोस्तुते हे उषा देवते | मंदारमाला | देसकार |
तव भास अंतरा | मत्स्यगंधा | मिश्र मांड |
थाट समरिचा | द्रौपदी | हमीर |
दया छाया घे | एकच प्याला | मिश्र तिलककामोद |
दहति बहु मना | एकच प्याला | काफी/सिंदुरा |
धन्य तूचि कांता | अमृतसिद्धी | नंद |
धीर धरी धीर धरी | मेघमल्हार | खमाज |
नारायणा रमा रमणा | जय जय गौरीशंकर | नट-भैरव |
परवशता पाश दैवे | रणदुंदुभी | पिलू |
पावना वामना | सौभद्र | पिलू |
प्रेम नच जाई तेथे | स्वयंवर | बागेश्री |
बोला अमृत बोला | कुलवधू | भैरवी |
भय न मम मना | स्वयंवर | मालकंस |
मला मदन भासे | मानापमान | मिश्र मांड |
माता दिसली | मानापमान | मिश्र काफी |
मी अधना | मानापमान | पिलू |
रवि मी चंद्र कसा | मानापमान | तिलककामोद |
रुसली राधा रुसला माधव | कुलवधू | मिश्र पहाडी/यमन |
रूपबली तो | स्वयंवर | मिश्र काफी |
लागी करेजवा कटार | कट्यार काळजात घुसली | पहाडी |
लाविते मी निरांजन | वाहतो ही दुर्वांची जुडी | पिलू |
वसुधातल रमणीय | एकच प्याला | बिलावल |
विमल अधर निकटी | विद्याहरण | हमीर |
शूरा मी वंदिले | मानापमान | मिश्र तिलककामोद |
सुकतातच जगि या | संन्यस्त खड्ग | भैरवी |
ही बहु चपल वारांगना | संशयकल्लोळ | खमाज |
हे करुणाकरा ईश्वरा | धन्य ते गायनी कळा | मारवा |
क्षण आला भाग्याचा | कुलवधू | मिश्र यमनकल्याण |
- ^ MNS website Archived 2011-07-13 at the Wayback Machine. reference