Jump to content

बळवंत पांडुरंग किर्लोस्कर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अण्णासाहेब किर्लोस्कर या पानावरून पुनर्निर्देशित)
जन्म बळवंत पांडुरंग किर्लोस्कर
मार्च ३१, १८४३
गुर्लहोसूर, धारवाड जिल्हा, कर्नाटक
मृत्यू नोव्हेंबर २, १८८५
गुर्लहोसूर, धारवाड जिल्हा, कर्नाटक
इतर नावे अण्णासाहेब किर्लोस्कर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र नाटक
भाषा मराठी, कानडी
प्रमुख नाटके संगीत शाकुंतल, संगीत सौभद्र, संगीत रामराज्यवियोग

बळवंत पांडुरंग किर्लोस्कर ऊर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर (जन्म : गुर्लहोसूर, धारवाड जिल्हा, ३१ मार्च १८४३; - २ नोव्हेंबर १८८५) हे मराठी भाषेतील पहिले संगीत नाटककार, गायकनट आणि नाट्यशिक्षक होते.

जीवन

[संपादन]

उल्लेखनीय

[संपादन]

अण्णासाहेब किर्लोस्करांनी ३१ ऑक्टोबर १८८० या दिवशी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर ‘शाकुंतल’ या पहिल्या परिपूर्ण संगीत नाटकाचा पहिला प्रयोग केला.‘शांकरदिग्विजय’ हे त्याचं पहिलं गद्य नाटक. पण अण्णासाहेबांना संगीत नाटकाची स्फूर्ती मिळाली ती मात्र पारशी ऑपेराचे ‘इंद्रसभा’ हे नाटक बघून. हे गद्यपद्यात्मक नाटक बघितल्यावर मराठी रंगभूमीवरही असे नाटक झाले पाहिजे या कल्पनेने त्यांना झपाटून टाकले. त्यांनी लगेचच महाकवी कालिदासांच्या ‘अभिज्ञान शाकुंतलम’ या नाटकाचे त्यांनी मराठी भाषांतर करायला घेतले. पहिल्या चार अंकांचा अनुवाद झाल्यावर १८८० साली ३१ ऑक्टोबरला धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर या नाटकाचा पहिला प्रयोग पुण्याच्या आनंदोद्भव नाट्यगृहात संपन्न झाला. या पहिल्या प्रयोगात मोरो बापुजी वाघुलीकर (मोरोबा देव) यांनी दुष्यंताची आणि बाळकृष्ण नारायण नाटेकर (बाळकोबा) यांनी कण्वमुनींची भूमिका केली होती. शंकरराव मुजुमदार हे शकुंतलाेच्या, तर स्वतः नाटककार अण्णासाहेब हे स्वतः सूत्रधार, शार्गंव आणि मारिच अशा तिहेरी भूमिकेत होते.

शाकुंतल नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे सूत्रधार-नटीचा प्रवेश झाला की सूत्रधार रंगपटात जाई आणि पुन्हा परत येत नसे. अशा रीतीने अण्णासाहेबांनी सूत्रधाराकडचा संगीताचा मक्ता संपवला आणि सर्व पात्रे स्वतःची गाणी स्वतःच म्हणू लागली.

अण्णासाहेबांच्या नाट्य आणि काव्य गुणांची स्वतंत्र प्रतिभा दर्शवणारे त्यांचे नाटक म्हणजे ‘संगीत सौभद्र’. संगीत सौभद्र या तीन अंकी नाटकाचा पहिला प्रयोग पुण्यात १८ नोव्हेंबर १८८२ या दिवशी झाला आणि नाटकाला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर मार्च १८८३मध्ये झालेल्या पाच अंकी प्रयोगाच्या लोकप्रियतेमुळे अण्णासाहेबांचे नाव घरोघरी पोचले. त्यांतही अण्णासाहेबांनी सूत्रधार आणि बलराम अशा भूमिका ���ेल्या. बाळकोबा हे नारद आणि कृष्ण, मोरोबा हे अर्जुन, भाऊराव हे सुभद्रा तर शंकरराव हे रुक्मिणी अशी पात्ररचना होती.

अण्णासाहेबांचे तिसरे नाटक रामराज्यवियोग. या तीन अंकी नाटकाचा पहिला प्रयोग २० ऑक्टोबर १८८४ला झाला. रामराज्यवियोग हे नाटक पूर्ण करण्यापूर्वीच २ नोव्हेंबर १८८५ या दिवशी अण्णासाहेबांना देवाज्ञा झाली.

पुरस्कार

[संपादन]

किर्लोस्करांच्या नावाने महाराष्ट्र सरकारतर्फे संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार आजवर अरविंद पिळगावकर, कीर्ती शिलेदार, चंद्रकांत उर्फ चंदू डेगवेकर, जयमाला शिलेदार, निर्मला गोगटे, प्रसाद सावकार, फैय्याज, रजनी जोशी, रामदास कामत आणि विनायक थोरात यांना प्रदान झाला आहे.

कार्य

[संपादन]

अण्णासाहेब किर्लोस्करांनी एकूण पाच नाटके लिहिली. ती अशी :

नाटक प्रकार साल
अल्लाउद्दिनाची चितुरगडावरील स्वारी एकांकिका, अपूर्ण फार्स १८७३
शांकर दिग्विजय गद्य नाटक १८७३
संगीत शांकुतल कालिदासकृत 'अभिज्ञान शांकुंतलम'चे भाषांतर १८८०
संगीत सौभद्र सात अंकी संगीत नाटक १८८३
संगीत रामराज्यवियोग तीन अंकी - अपूर्ण संगीत नाटक १८८४, १८८८

बाह्य दुवे

[संपादन]
  • "अण्णासाहेब किर्लोस्कर यांची गाणी". 2014-09-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-06-21 रोजी पाहिले.

संदर्भ

[संपादन]