गंगूबाई हनगळ
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
गंगूबाई हनगळ | |
---|---|
गंगूबाई हनगळ कन्या कृष्णा ह्यांच्या सोबत | |
आयुष्य | |
जन्म | मार्च ५ इ.स. १९१३ |
जन्म स्थान | धारवाड, मुंबई प्रांत, ब्रिटिश भारत |
मृत्यू | जुलै २१ इ.स. २००९ |
मृत्यू स्थान | हुबळी, कर्नाटक, भारत |
मृत्यूचे कारण | वृद्धापकाळ |
व्यक्तिगत माहिती | |
धर्म | हिंदू |
नागरिकत्व | भारतीय |
देश | भारत |
भाषा | मराठी, कन्नड |
पारिवारिक माहिती | |
आई | अंबाबाई (कर्नाटक गायिका) |
वडील | चिक्कूराव नादीगर |
जोडीदार | गुरूराव कौलगी |
अपत्ये | नारायण राव, बाबू राव, कृष्णा |
संगीत साधना | |
गुरू | सवाई गंधर्व, दत्तोपंत देसाई, कृष्णाचार्य |
गायन प्रकार | हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत |
घराणे | किराणा घराणे |
संगीत कारकीर्द | |
पेशा | गायकी |
गौरव | |
पुरस्कार | संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार पद्मभूषण पुरस्कार पद्मविभूषण पुरस्कार |
गंगूबाई हनगळ (कानडीत: ಗಂಗೂಬಾಯಿ ಹಾನಗಲ್) (जन्म : धारवाड, मुंबई प्रांत, ब्रिटिश भारत, ५ मार्च १९१३; - हुबळी, २१ जुलै २००९) या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातल्या किराणा घराण्याच्या गायिका होत्या.
जन्म आणि बालपण
[संपादन]गंगूबाई हनगल यांचा जन्म तेव्हाच्या धारवाड (आताच्या हावेरी) जिल्ह्यात इ.स. १९१३ मध्ये झाला. त्यांनी कर्नाटक-संगीताचे प्राथमिक धडे वयाच्या दहाव्या वर्षांपासून आपल्या आईकडून घेतले. वयाच्या अकराव्या वर्षी, म्हणजे इ.स. १९२४मध्ये, त्यांनी बेळगांव येथे महात्मा गांधीच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या (इंडियन नॅशनल)काँग्रेसच्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलम आझाद आणि सरोजिनी नायडू यांच्या उपस्थितीत स्वागतगीत गायले. हा त्यांचा पहिला जाहीर कलाविष्कार होता.[१]
हनगल आडनावाचा इतिहास
[संपादन]गंगूबाई यांच्या आडनावाला एक इतिहास आहे. त्यांच्या खापरपणजी गंगव्वा यांचे यजमान धारवाड जवळील नरगुंद या संस्थानात नोकरीला होते. या संस्थानाचे राजे बाबासाहेब यांनी स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सरकारविरोधात भाग घेतला. त्यांच्या दत्तक विधानाचा प्रस्ताव कोल्हापूरच्या कर्नल मन्सन यांने नामंजूर केल्याने त्यांनी युद्ध सुरू केले. सर्वांनी नरगुंद सोडून सुरेभान येथील जंगलात आश्रय घेतला. तेथे लढाई होऊन त्यात मन्सन मारला गेला. बाबासाहेबांनी त्याचे मुंडके नरगुंदच्या वेशीवर टांगले आणि धड धारवाड कचेरीत पाठवले. याचा सूड घेण्यासाठी इंग्रजांनी कर्नल सूटर याला मोठ्या फौजेसह पाठवले. फितुरीमुळे बाबासाहेब पकडले गेले. त्यांच्या पत्नी व आई यांनी मलप्रभा नदीत देह अर्पण केले. दहशत बसविण्यासाठी बाबासाहेबांची बेळगावात सर्वकडे धिंड काढून त्यांना जाहीर फाशी देण्यात आली. कारभारी राघोबा यांनाही फाशी देण्यात आली. गंगव्वा यांचे यजमान अखेर भूमिगत झाले. ब्रिटिश अधिकारी सतत त्रास देऊ लागल्याने गंगव्वा नरगुंद सोडून सुरक्षित अशा हनगल गावात स्थायिक झाल्या. चौकशीपासून वाचण्यासाठी या गावाचे नाव त्यांनी आपल्या नावापुढे जोडले. हे गाव धारवाडपासून बारा किलोमीटर अंतरावर आहे.[२]
संगीत शिक्षण
[संपादन]गंगूबाईंच्या आई अंबाबाई या कर्नाटक शास्त्रीय संगीत गायिका होत्या. त्यामुळे त्यांच्या बालपणापासून आईने त्यांना संगीताचे प्राथमिक शिक्षण व संस्कार दिले. धारवाड येथे प्रतापलाल व श्यामलाल यांच्याकडे लहान असतानाच त्यांनी काही काळ कथ्थक नृत्याचे शिक्षण घेतले. हिंदुस्थानी गायकीचे शिक्षण त्यांनी कृष्णाचार्य हुळगूर यांच्याकडे घेतले. नंतर १९३८मध्ये सवाई गंधर्व (रामचंद्र गणेश कुंदगोळकर) या किराणा घराण्याच्या गायकांकडे गंगूबाई यांची दीर्घकाळ संगीत-साधना झाली. तेथे त्यांना गायक भीमस���न जोशी आणि फिरोज दस्तूर यांची साथ मिळाली.
कौटुंबिक प्रवास
[संपादन]वयाच्या सोळाव्या वर्षी हुबळी येथील वकील व व्यावसायिक गुरुराज कौलगी यांनी सहजीवनासाठी गंगूबाई यांना मागणी घातली. त्यांची पहिली पत्नी नुकतीच निधन पावली होती. ते मितभाषी आणि गाण्याची आवड असणारे होते. या विवाहामुळे त्या हुबळी येथे वास्तव्यास आल्या. गायिका कृष्णा हनगल, बाबुराव आणि नाना ही त्यांची अपत्ये होत.[२]
गंगूबाई हनगल यांचे शिक्षण, उल्लेखनीय कार्यक्रम व भूषविलेली पदे
[संपादन]- इ.स. १९२५ : मध्ये त्या किराणा घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अब्दुल करीम खान यांच्यासमोर धारवाड येथे गायल्या.
- इ.स. १९२८ : मध्ये त्या हुबळीला आल्या. तेथे त्यांनी शामलाल आणि प्रतापलाल यांच्याकडे कथ्थक शिकायला सुरुवात केली. त्याच वर्षी त्यांनी दत्तोपंत देसाई व कृष्णाचार्य यांच्याकडे काही काळ हिंदुस्थानी संगीताचे धडे गिरवले.
- इ.स. १९३१ : मुंबईतील गोरेगांव येथे शास्त्रीय संगीताचा पहिला जाहीर कार्यक्रम.
- इ.स. १९३२ : हिज मास्टर्स व्हॉइस (एच्एम्व्ही) या मुंबईतील कंपनीने गंगूबाईंच्या गाण्याची पहिली ग्रामोफोन तबकडी काढली.
- इ.स. १९३३ : आकाशवाणी(ऑल इंडिया रेडियो)च्या मुंबई केंद्रावरून त्यांच्या प्रत्यक्ष गाण्याचा कार्यक्रम पहिल्यांदाच प्रसारित.
- इ.स. १९३३ : जी.एन.जोशींबरोबर एच्एम्व्ही ने भारतीय भाषेत प्रथमतःच ध्वनिमुद्रित केलेले द्वंद्वगीत आकाशवाणीवरून गायल्या.
- इ.स. १९३५ : पंडित रामभाऊ कुंदगोळकर म्हणजे सवाई गंधर्वांकडे आल्या. सुमारे पंधरा वर्षे त्यांनी सवाई गंधर्वांकडे संगीताचे शिक्षण घेतले व किराणा घराण्याची शैली पूर्णपणे आत्मसात केली.
- इ.स. १९५२ : जयपूरच्या राजवाड्यात पंडित नेहरूंसमोर गायन.
- इ.स. १९७६ : धारवाड विद्यापीठात मानद संगीत प्राध्यापक म्हणून लागल्या.
- इ.स. १९८२ ते इ.स. १९८४ : कर्नाटक राज्याच्या संगीत आणि नृत्य प्रबोधिनीच्या अध्यक्षा.
- इ.स. १९९२ ते इ.स. १९९४ : कर्नाटकाच्या विधान परिषदेच्या सदस्या.
- इ.स. २००२ : ८ डिसेंबर रोजी वयाच्या ८९व्या वर्षी, महाराष्ट्राच्या ठाणे शहरांत भरलेल्या सूरसंमेलन कार्यक्रमात दीड तास गायल्या. एका तासाहून अधिक कालावधीचा त्यांनी केलेला हा शेवटचा कलाविष्कार. त्यानंतर त्या कुंदगोळ(१५ डिसेंबर २००५ व १२ मे २००७), बेळगांव(१२-३-२००६, १२-८-२००७ व १२-४-२००८), बंगलोर(१२-८-२००६ व २७-१०-२००७) आणि हुबळी(६-१-२००८) येथे १५ ते ४५ मिनिटे गायल्या.
- इ.स. २००९ : ५ मार्च रोजी वयाच्या ९६व्या वाढदिवशी त्या आपल्या धारवाडच्या जन्मघरी दहा मिनिटे गायल्या. हे त्यांचे शेवटचे जाहीर गाणे.
- इ.स. २००९ : २१ जुलै रोजी वयाच्या ९७व्या वर्षी गंगूबाईंचे निधन झाले.
परदेशांतील कार्यक्रम
[संपादन]- अमेरिकेची संयुक्त संस्थाने : वॉशिंग्टन डीसी, शिकागो, सॅन फ़्रॅन्सिस्को, लॉस ॲन्जेलिस, न्यू जर्सी, बोस्टन, फिलाडेल्फिया वगैरे ठिकाणी.
- इंग्लंड : लंडन.
- कॅनडा : टोरॅन्टो, मॉन्ट्रियल.
- नेदरलँड्स : ॲम्स्टरडॅम.
- नेपाळ : काटमांडू.
- पाकिस्तान : लाहोर, पेशावर, कराची.
- पश्चिम जर्मनी : ॲम्स्टरडॅम, ट्यूबिन्जन, हॉस्पिटलकिर्च.
- पूर्व जर्मनी : फ़्रॅन्कफुर्ट, स्टटगार्ट, बर्लिन, सिग्मॅरिग्नेन, लिपझिग.
- फ़्रान्स : पॅरिस.
- बांगला देश : डाक्का.
पुरस्कार
[संपादन]भारत सरकारने गंगूबाई हनगल त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण या नागरी सन्मानांनी अलंकृत केले होते. त्यांना एकूण पन्नासहून अधिक पुरस्कार मिळाले होते. त्यात संगीत नाटक अकादमी पुरस्कार, चार मानद डॉक्टरेट, २४ पुरस्कार यांचा समावेश आहे. किमान नऊवेळा पंतप्रधान व पाचवेळा राष्ट्रपतींकडून त्यांचा खास गौरव झाला होता. पाचवी इयत्ता शिकलेल्या गंगूबाईंनी संगीताच्या मानद प्राध्यापिका म्हणून काम केले. धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठाच्या त्या सेनेट सदस्या होत्या. देशात व देशाबाहेर त्यांनी अनेक संगीत मैफली गाजवल्या. भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी त्यांनी देशभरातील सुमारे २०० शाळा-महाविद्यालयांतून कार्यक्रम केले.
१९३२ ते १९३५ या काळात रामोफोन कंपनीने काढलेल्या त्यांच्या ’गांधारी’ या टोपण नावाने काढलेल्या सुमारे ६० ध्वनिमुद्रिका प्रचंड लोकप्रिय झाल्या. रागसंगीत आणि मराठी भावगीते असलेल्या या ध्वनिमुद्रिका रसिकांना कान भरून ऐकल्या. त्या साडेतीन मिनिटांच्या काळात गंगूबाई ऊर्फ गांधारीने आपली सगळी तयारी कसून सादर केली होती. या गाण्यांत मराठी लेखक आणि कवी मामा वरेरकर यांची दोन गाणी गंगूबाईच्या आवाज ध्वनिमुद्रित झाली होती. ती होती बाळाचा चाळा आणि आईचा छकुला. ही गाणी त्या काळात महाराष्ट्रात घरोघरी वाजत असत. गंगूबाईंच्या ध्वनिमुद्रिकेच्या तबकडीवर छापले होते की, "जून महिन्यात आम्ही प्रसिद्ध केलेली मिस गांधारी या��ची रेकॉर्ड इतकी लोकप्रिय झाली आहे की प्रमुख गायिकांच्या मालिकेत तिने मानाचे स्थान मिळविले आहे."
भारतीय शास्त्रीय संगीत वस्तुसंग्रहालय, स्मारक, गुरुकुल प्रकल्प
[संपादन]हनगल कुटुंबीयांनी १९९२मध्ये हनगल म्युझिक फऊंडेशनची स्थापना केली. गंगूबाई यांचे 'गंगालहरी' हे हुबळीतील घर नूतनीकरण करून तेथे संग्रहालय करण्यात आले आहे. भारतातील विविध प्रांतांतील १२० प्रकारची शास्त्रीय व लोकवाद्ये तेथे आहेत. तसेच गायकांचे फोटो, चरित्रे, वापरातल्या वस्तू, पारितोषिके, पुरस्कार, ग्रामोफोन रेकॉर्ड्स, कॅसेट्स इत्यादींचा संग्रह करण्यात आला आहे. गंगूबाई यांचा नातू मनोज हनगल यांच्या परिश्रमातून हे उभे राहिले आहे. धारवाड येथील जन्मस्थळ कर्नाटक सरकारने स्मारक म्हणून विकसित केले आहे. तसेच हुबळीतील पाच एकर जागेत अद्ययावत संगीत गुरुकुल सुरू करण्यात आले आहे.[२]
गंगूबाईंची गाजलेली इतर मराठी गाणी
[संपादन]- कवी - भा.वि. वरेरकर
- नाही बाळा चाळाना वाटे बरा (’काहे राजा मानत जियरा हमारा’वर आधारित)
- बालिशता काळ कसला, मधुवनिं हरि मजला (राग - तिलंग)
- कुसुम चाप कां धरी (राग - मध्यमावती)
- कवी - कुमुद बांधव
- नव रंगी रंगलेला, हरिचे गुण गाऊया (भीमपलास)
- कशी सदयाना ये माझी दया (जोगिया, ’पिया मिलनकी आस’वर आधारित)
- हालवी चालवी जगताला, आम्हां आनंद आम्हां आनंद (अभंग, राग सिंदुरा)
- लो लो लागला अंबेचा (अभंग, राग -सिंध भैरवी)
- सखे सोडू नकोस अबोला, चल लगबग ये झणीं (यमन, ’एरी आली पिया बिन’वर आधारित)
- मना ध्यास लागे (नाटकुरुंजी)
- कवी - स.अ. शुक्ल
- चकाके कोर चंद्राची
- तू तिथे अन् मी इथे हा (द्वंद्वगीत, सहगायक - जी. एन. जोशी)
गंगूबाईंवर लिहिली गेलेली पुस्तके
[संपादन]- अ लाईफ इन थ्री ऑक्टेव्ह्ज (इंग्रजी, लेखिका - दीपा गणेश)
- गंगावतरण : स्वरसम्राज्ञी गंगुबाई हानगल यांची जीवनगाथा (मूळ इंग्रजी लेखिका - दमयंती नरेगल; मराठी अनुवाद - सुनंदा मराठे). या पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणातील म्हणजे "गंगावतरणाच्या आधी' यात एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते आधुनिक काळापर्यंत कर्नाटकाच्या भौगोलिक, राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासातील काही घटनांचा आढावा घेण्यात आला आहे; तसेच सोबत संदर्भही नमूद केलेले आहेत. संगीतप्रेमी, जाणकार आणि नव्याने संगीत शिकणाऱ्यांना यामुळे उपयुक्त माहितीचा खजिनाच मिळतो.
- स्वरगंगा गंगुबाई हनगल (मराठी, लेखिका - संध्या देशपांडे)
उपाधी
[संपादन]जनतेने आणि संस्थांनी त्यांना अनेक उपाधी (पदव्या) बहाल केल्या होत्या. त्यांतल्या काही अश्या :
- अंबासुता गंगा
- अमृतगंगा
- आधुनिक संगीत शबरी
- कन्नड कुलतिलक
- गानगंगामयी
- गानगंधर्व गंगागीत विद्याअमृतवर्षिणी
- गानरत्न
- गानसरस्वती
- गुरूगंधर्व
- नादब्रह्मिणी
- भारतीकांता
- रागभूषण
- रागरागेश्वरी
- संगीतकलारत्न
- संगीतकल्पद्रुम
- संगीतचिंतामणी
- संगीतरत्न
- संगीतशिरोमणी
- संगीतसम्राज्ञी
- संगीतसरस्वती
- सप्तगिरी संगीतविद्वानमणी
- स्वरचिंतामणी
- स्वरसरस्वती
- श्रीगंगामुक्तामणी
"स्वरगंगा गंगूबाई हनगळ":-
स्वरगंगा गंगूबाई हनगळ यांचे वडील चिक्कूराव नाडगीर व्यवसायाने वकील होते. त्यांची आई अंबाबाई कर्नाटकी पद्धतीच गाण छान गात असे. पण गंगूबाईंना मात्र उत्तर हिंदुस्थानी संगीतच जास्त आवडे. गंगूबाईंचा कल पाहून त्यांच्या आईनेही संगीत क्षेत्रात त्यांची प्रगती व्हावी म्हणून खूप मेहनत घेतली. गंगूबाईंच पाळण्यातील नाव गांधारी अस होत. त्यांच्या आईच्या आईचे 'गंगव्वा' होते.या नावातून गंगू हे स्वतःच नाव तर 'हनगल' हे गावाच नाव आडनाव म्हणून त्यांनी स्वीकारले होते. त्यांचे शालेय शिक्षण फक्त पाचवीपर्यंत झाले होते. बाकी पुढची सारी वर्षे संगीतातच त्यांनी खर्ची घातली.
सोळाव्या वर्षी त्यांचे श्री. गुरूराव कौलगी या वकीलाशी लग्न झाले.
१९३०-३२ च्या नंतरच्या काळात गंगूबाईंनी सर्व महत्त्वाच्या संगीत परिषदा गाजवल्याच; पण परदेशातही कार्यक्रम करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. तरुणपणी उंच टिपेला जाऊन भिडणारा गंगूबाईचा आवाज घशाच्या विकारवरील उपचारात १९५५ मध्ये पुरुषी झाला. एकंदरीत त्यांच्या गाण्यात पुरुषी लकबीच जास्त होत्या. जे स्त्री गायिका सहसा गात नसत अशा गमकाच्या अंगाने गायला त्यांना खूप आवडे; नेहमी डावा हात कानावर दाबून उजवा हात पुढे पसरून गाण्याची त्यांची एक विशिष्ट लबक होती. गाताना त्यांचा मुद्रा अभिनय, आणि हाताच्या हालचाली यामुळे त्यांचे गाणे अधिक खुलत असे. गंगूबाई मुळच्या किराणा घराण्याची गायकी शिकल्या पण इतर घराणातल्या व गवयांच्या गाण्यातल्या त्यांना आवडलेल्या गोष्टी त्यांनी घेतल्या व किराणा घराण्याच्या चौकटीत आणून बसविल्या.
सवाई गंधर्वांकडे त्यांनी सांगीताचे शिक्षण घेतले. हिराबाई बडोदेकर या त्यांच्या आदर्श होत्या. १९३२ च्या सुमारास मुंबईतील मैफलीत ज्येष्ठ गायिका मेनका शिरोडकर, जद्दनबाई (अभिनेत्री नर्गिसच्या आई), गायकनट के. एल. सैगल यांच्यासारख्या दिग्गजांनी गंगूबाईंचे गाणे ऐकून आनंद व्यक्त केला होता. याच साली एचएमव्हीने त्यांच्या गांधारी हनगल या नावाने बारा गाण्यांची ध्वनिमुद्रिका काढली. बाबूराव पेंढारकर यांच्या "विजयाची लग्ने' या चित्रपटातही त्या गायिल्या होत्या.
१९३६ पासून त्यांचे सवाई गंधर्व यांच्याकडे रीतसर शिक्षण सुरू झाले आणि त्यानंतर ख्यालगायिका हीच त्यांची ओळख बनली. १९��२ ते ३५ या काळात गंगूबाईनी "गांधारी हनगल' या नावाने जवळ जवळ साठेक गाणी ध्वनिमुद्रितत केली. अडाणा, कामोद, खंबायती, जोगिया, दुर्गा, देस, पूरिया, बहार, बागेश्री, बिहाग, भूप, भैरवी, मांड, मालकंस, मिया मल्हार, मुलतानी, शंकरा, शुद्धसारंग, हिंडोल,अशा विविध रागांतल्या तीन साडेतीन मिनिटाच्या ध्वनिमुद्रिका त्यांनी दिल्या. शास्त्रीय संगीताबरोबरच ठुंबरी, भावगीत, भक्तिगीत व गझल गायनाच्याही त्यांच्या ध्वनिमुद्रिका आहेत. त्यांनी मुलांसाठी गायलेली गाणी विशेष गाजली. मराठी भावगीतांच्या इतिहासातील पहिले युगलगीे विख्यात गायक जी.एन. जोशी व गंगूबाई यांची आहेत. गंगूबाई जलसेही करत असत. रेडिओवर व गणपती उत्सवातही त्यांची गाणी होत.
गाण्यावर विलक्षण प्रेम करणाऱ्या गंगूबई हनगल नावाच्या या मर्द गायिकेला पद्मभूषण, डॉक्टरेट या पदव्यांनी गौरविले गेले. हुबळी येथे त्यांच्या नातवाने त्यांच्या स्मरणार्थ 'स्मरण मंदिर' नावाचे एक संग्रहालय उभे केले आहे. त्यात त्यांची छायाचित्रे, ध्वनिमुद्रिका, तंबोरे पहायला मिळतात. गंगूबाई कलाकार म्हणून फार मोठ्या होत्याच; पण एक माणूस, विचारी नागरिक म्हणूनही थोर होत्या. २००३ साली त्यांनी आपल्या जीवनातल्या अनेक आठवणी सांगितल्या. त्या 'दि सॉंग ऑफ माय लाईफ' नावाच्या पुस्तकात इंग्रजी व कानडी भाषेत प्रसिद्ध झाल्या आहेत. भारत सरकाने गंगूबाई हनगळ यांनी १९७१ साली पद्मभूषण पुरस्कार व १९९९ साली पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव केला होता. स्वरगंगा गंगूबाई हनगळ यांचे २१ जुलै २००९ रोजी निधन झाले. गंगूबाई हनगळ यांचे संगीय क्षेत्रातील योगदान प्रेरणादायी आहे.
"संदर्भ : पुस्तक - स्वरगंगा गंगुबाई हनगल (लेखिका - संध्या देशपांडे); अनुबंध प्रकाशन (पुणे सन २०२०)
बाह्य दुवे
[संपादन]- साचा:Allmusic
- Gangubai Hangal Detailed Biography
- Gangubai Hangal feted on her 94th birthday Archived 2011-09-28 at the Wayback Machine.
- Gangubai Hangal auf culturebase.net Archived 2010-06-20 at the Wayback Machine.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "हनगल, गंगूबाई". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2020-01-01 रोजी पाहिले.
- ^ a b c देशपांडे, संध्या (२०१०). स्वरगंगा गंगुबाई हनगल. पुणे: अनुबंध प्रकाशन. pp. १८७-१९१.