बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर
पं. बाळ���ृष्णबुवा इचलकरंजीकर ( इ.स. १८४९ - - ९ फेब्रुवारी १९२६[१]) हे ख्याल गायकीत पारंगत असे ग्वाल्हेर घराण्याच्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे गायक होते. महाराष्ट्रात ख्यालगायनाचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे गायनाचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर हे मिरज, औंध आणि इचलकरंजी येथील राजदरबारात दरबारी राजगायक होते.[१]
पूर्वायुष्य
[संपादन]बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांचा जन्म महाराष्ट्रात मिरज जवळ बेडग येथे झाला. त्यांच्या घरी वेदांत पठणाची परंपरा होती. पण वडिलांनी आग्रह करूनसुद्धा बाळकृष्णबुवा यांचे मन त्यात लागले नाही. त्यांची संगीताची आवड वाढतच गेली. एक दिवस त्यांनी संगीत शिक्षणासाठी घर सोडले. धार संस्थानातील देवजीबुवा यांच्याकडे त्यांनी संगीताचे सुरुवातीचे शिक्षण घेतले. नंतर ते ग्वाल्हेर येथे आले. तिथे ते हस्सूखाँ यांचे शिष्य पं.वासुदेवराव जोशी यांच्याकडे गेले. आधी देवजीबुवा यांच्याकडून त्यांनी शिक्षण घेतले असल्याचे कळल्यावर जोशी यांनी शिकवण्यास नकार दिला. बाळकृष्णबुवा वाराणसी येथे पोचले. तेथे त्यांची पुन्हा वासुदेवराव जोशी यांच्याशी भेट झाली. जोशींचे मत परिवर्तन झाले आणि त्यांनी संगीत शिकवण्याचे मान्य केले. त्यानुसार जोशी यांच्याकडे त्यांनी ख्याल गायकीचे शिक्षण घेतले.[२] बाळकृष्णबुवांनी गुरूसेवा करून ज्ञान मिळवले. ग्वाल्हेर हे ठिकाण ख्याल शैलीतील हिंदुस्तानी संगीतासाठी तेव्हा सुप्रसिद्ध होते.
कारकीर्द
[संपादन]पुढे गुरूंच्या आज्ञेवरून बाळकृष्णबुवांनी गृहस्थाश्रमात प्रवेश केला. त्यांनी मुंबई येथे संगीत विद्यालय सुरू केले. तिथे रामकृष्ण भांडारकरांसारखे अनेक विद्वान त्यांचे शिष्य होते. पुढे ते सातारा येथील राजदरबारात गायक म्हणून नोकरी करू लागले. तिथून ते औंधला गेले. पण तेथील हवामान सहन न झाल्याने त्यांना दम्याचा त्रास सुरू झाला. [२]काही वर्षांनी मिरजेचे संस्थानिक त्यांना मिरजेला घेऊन गेले. त्यांच्या उपचाराची व्यवस्था केली व त्यांना राजगायक म्हणून नेमले. मिरज येथे हवामानाच्या अनुकूलतेमुळे आपले बस्तान बसविले. त्यानंतर लवकरच मिरज व त्या भोवतीचा भाग हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात पुढे आला व नंतर १०० वर्षांनीही ती परंपरा कायम राहिली आहे.येथे त्यांनी अनेक शिष्य तयार केले. ज्यात प्रमुखतः पंडित विष्णू दिगंबर पलुसकर, गुंडूबुवा इंगळे, पंडित अनंत मनोहर जोशी (अंतू-बुवा), वामनराव चाफेकर, पंडित नीलकंठबुवा जंगम यांचा समावेश आहे.
१८९६ मध्ये इचलकरंजीचे संस्थानिक नारायणराव बाबासाहेब घोरपडे त्यांना इचलकरंजी येथे घेऊन गेले. त्यांना दरबारी गायकाची नोकरी दिली. येथे त्यांनी तयार केलेल्या शिष्यांमध्ये अण्णाबुवा मिराशी, भाटे बुवा यांचा समावेश होतो.[२]
वारसा
[संपादन]सर्वसामान्य लोकांना शास्त्रीय संगीताची गोडी लावण्यात व त्याचा प्रसार करण्यात त्यांचे शिष्य पलुसकर बुवा यांचे योगदान मोठे आहे.
मृत्यू
[संपादन]१९२५ मध्ये बाळकृष्णबुवांचे पुत्र अण्णाबुवांचे तरुण वयातच निधन झाले. पुत्रशोकामुळे बाळकृष्णबुवांचे ९ फेब्रुवारी १९२६ रोजी निधन झाले. [२]
स्मारक
[संपादन]त्यांच्या स्मरणार्थ इचलकरंजी येथे पंडीत बाळकृष्ण बुवा स्मृती मंदिर हे स्मारक उभारण्यात आले आहे.
संदर्भ
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर विदागारातील आवृत्ती
- इचलकरंजीकरांचे दुर्मिळ छायाचित्र Archived 2011-06-11 at the Wayback Machine.
- गायनाचार्य/भीष्माचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर..