Jump to content

विष्णु मोरेश्वर महाजनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.
विष्णु मोरेश्वर महाजनी

रावबहादुर विष्णू मोरेश्वर महाजनी (जन्म : पुणे, १२ नोव्हेंबर १८५१; - अकोला, १६ फेब्रुवारी १९२३) हे मराठीतील समीक्षक, कवी व नाटककार होते. त्यांनी काव्ये, नाटके, कादंबऱ्या, चरित्रे, प्रवासवर्णने इत्यादी वाङ्‌मय प्रकारांबरोबर अर्थशास्त्र, इतिहास, राजकारण, शिक्षणशास्त्र अशा विषयांवरीलही मार्मिक समीक्षणे लिहिली आहेत. महाजनी यांनी पात्रांवर मराठी परिवार चढवून शेक्सपियरच्या तीन नाटकांची मराठीत भाषांतरे केली आहेत.

महाजनी यांचे शालेय शिक्षण धुळ्यात व उच्च शिक्षण पुण्याच्या डेक्कन कॉलेजात झाले. ते इ.स. १८७३साली एम.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले. वर्ड्‌स्वर्थ, ऑक्झनहॅम, कीलहॉर्न, केरूनाना छत्रे, चिंतामणशास्त्री थत्ते या प्राध्यापकांचा आणि अनंतशास्त्री पेंढारकर यांसारख्या विद्वानाचा, महाजनींच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत महत्��्वाचा वाटा होता.

विष्णू मोरेश्वर महाजनी यांनी ‘ज्ञानसंग्रह’ नावाचे मासिक वयाच्या एकविसाव्या वर्षी, १८७२ साली सुरू केले व काही काळ चालवले. . त्यांनी ‘वऱ्हाड शाला-पत्रक’ हे मासिकही संपादित करून पाच-सहा वर्षें चालवले. ’ज्ञानसंग्रह’ मासिक चालविले. ते १८८६साली एज्युकेशन इन्स्पेक्टर झाले आणि १९०१मध्ये शिक्षणखात्याच्या डायरेक्टर पदावरून निवृत्त झाले. त्यांचा इंग्रजी वाङ्मयाचा व्यासंग वाखाणण्याजोगा होता. त्यांनी शेक्सपियरच्या काही नाटकांची भाषांतरे केली.

मे इ.स. १९०७ साली पुणे येथे झालेल्या पाचव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. जळगांव येथे १९०७ साली कर्नल कीर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिले कविसंमेलन भरले होते. त्या संमेलनात महाजनी यांनी ’कवी आणि काव्य’ या विषयावर दिलेले व्याख्यान फार गाजले होते.

विष्णू मोरेश्वर महाजनी हे प्रार्थनासमाजी नव्हते. पण लोकमान्य टिळकांच्या 'गीतारहस्या'ची मुक्त कंठाने प्रशंसा करणाऱ्या महाजनींनी टिळकांचे व वेदान्ती मंडळींचे मोक्ष हे ध्येय अमान्य केले होते.

विष्णू मोरेश्वर महाजनी यांचे साहित्य

  • कुसुमांजली (भाषांतरित कवितांचा संग्रह )
  • ग्रंथसंग्रहालय (मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय वार्षिक समारंभाचे व्याख्यान -१९०७)
  • डेक्कन कॉलेजच्या आठवणी : ’डेक्कन कॉलेज’ या शीर्षकाखाली महाजनी यांनी त्या कॉलेज जीवनातील गमतीदार अनुभव लिहिले आहेत. महादेव गोविंद रानडे, का.त्रिं तेलंग, वि.ज. कीर्तने यांच्याबद्दलच्या आठवणी पुस्तकांत आहेत.
  • तारा (नाटक - शेक्सपियरच्या ’सिंबेलाईन’ या नाटकाचे नराठी भाषांतर -१८८८)
  • बंगाल्यातील जमीनदारीची वहिवाट (१८८६). ह्या ग्रंथासाठी महाजनी यांनी महादेव गोविंद रानडे यांच्याकडून स्फूर्ती घेतली होती.
  • मोहविलसित (नाटक - शेक्सपियरच्या ’द विंटर्स टेल’चे मराठी भाषांतर -१८८१-८२)
  • रामायणकालीन लोकस्थिती निबंध (१९००)
  • वल्लभानुनय (नाटक - शेक्सपियरच्या ’ऑल वेल दॅट एन्ड्ज वेल’ या नाटकाचे मराठी भाषांतर -१८८७)
  • ’विविधज्ञानविस्तारा’तून इ.स.१८८२ ते १८८५ या दरम्यान प्रसिद्ध झालेली ’स्फुट भाषांतरित कविता’. ह्या कविता केशवसुतांनी पुढे रचलेल्या ’अर्वाचीन मराठी कवितां’ची पूर्वपीठिका समजली जाते. यांतल्या बहुतेक कविता इंग्लिश कवी कीट्स, कोलरिज, ग्रे, टेनिसन, बर्न्स, लाँगफेलो, वर्ड्‌स्वर्थ, शेली, आदींच्या ४१ कवितांची प्रासादिक आणि समर्पक मराठी भाषांतरे होती.
  • ’विविधज्ञानविस्तारा’तून प्रसिद्ध झालेली पुस्तक परीक्षणे : यां समीक्षा लेखांत मार्मिक अभिप्राय तर आहेतच, शिवाय दोषदिग्दर्शन करताना गुणग्राहकता दाखवून मूळ लेखकाला मोलाचे मार्गदर्शनही केले आहे.
  • समर्थ विद्यालय, धर्मशिक्षण, गृहशिक्षण, गुरुशिष्य संबंध, व्यक्तिस्वातंत्र्य, लोकमत आदी अनेक विषयांवर निबंधलेखन.

चरित्र

  • ’विष्णू मोरेश्वर महाजनी’ यांचे त्याच नावाचे चरित्र पुष्पा लिमये यांनी लिहिले आहे.(इ.स. १९४३)
  • विष्णू मोरेश्वर महाजनी व्यक्ती आणि वाङ्‌मय : लेखिका पुष्पा लिमये (१९९३)
  • विष्णू मोरेश्वर महाजनी -चरित्र (बालबोध मासिक प्रकाशन)