मूळभाषा संस्कृत, तिच्यापासून भिन्न प्रदेशांत महाराष्ट्री, शौरसेनी, पैशाची व मागधी या प्राकृत भाषा निर्माण झाल्या; पुढे या प्राकृतापासून देशपरत्वे महाराष्ट्री अपभ्रंश, शौरसेनी अपभ्रंश, पैशाची अपभ्रंश व मागधी अपभ्रंश अशा चार पृथक अपभ्रंश भाषा उद्भवल्या आणि या भिन्न भिन्न अपभ्रंश भाषांपासून आजच्या देशी भाषा किंवा प्रांतिक भाषा जन्मल्या असे आज सर्वसामान्यतः भाषाशास्त्रज्ञांचे मत आहे. यात्र भाषाशास्त्रज्ञांपैकी अनेकांनी असेही मत दिले आहे की मराठी ही महाराष्ट्री अपभ्रंशापासून आणि ही अपभ्रंश भाषा महाराष्ट्री - प्राकृतापासून झालेली आहे. याच्याच जोडीला महाराष्ट्री अपभ्रंश व महाराष्ट्री प्राकृत या भाषा महाराष्ट्राच्या होत्या, त्या या भूमीतच जन्मल्या व विकसित झाल्या, त्या येथील बहुजनांच्या भाषा होत्या आणि ग्रंथकारांच्याही होत्या, हेही मत भाषकोविदांमध्ये बहुमान्य झाले आहे. हे मत जर आपल्याला पटले, स्वीकार्य वाटले तर महाराष्ट्राच्या पृथगात्मतेचा उदय आपल्याला इष्ट त्या प्राचीन काळापर्यंत - इ. पू. पाचव्या सहाव्या शतकापर्यंत- नेऊन भिडविता येईल; आणि महाराष्ट्राला ग���ली दोन अडीच हजार वर्षे स्वतंत्र इतिहास आहे, स्वतंत्र परंपरा आहे, म्हणूनच स्वतंत्र संस्कृती आहे या म्हणण्याला अर्थ प्राप्त होईल. म्हणून भाषाकोविदांची याविषयीची मते आता आपण विचारार्थ पुढे घेऊ.
प्राकृत-उद्भव
आर्य हे हिंदुस्थानात सुमारे ४००० वर्षांपूर्वी आले. आणि प्रथम अनेक शतके त्यांनी आपल्या वसाहती उत्तर हिंदुस्थानातच वसविल्या. पाणिनीच्या व्याकरणात विंध्याच्या दक्षिणेकडच्या प्रदेशांचा उल्लेख नाही. त्यावरून त्या काळापर्यंत आर्य दक्षिणेत आले नव्हते, असे विद्वानांचे अनुमान आहे. पाणिनीचा काळ इ. स. पूर्व ८०० असा धरला जातो. त्यानंतर इ. पू. ४०० च्या सुमारास कात्यायन झाला. त्याच्या ग्रंथात दक्षिणेतल्या देशांचे उल्लेख विपुल आहेत. तेव्हा इ. पू. ८०० ते इ. पू. ४०० या दरम्यान आर्य दक्षिणेत येऊन स्थिर वसाहती करून राहिले, असे दिसते. ते महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांच्या संस्कृत भाषेचा येथल्या मूळच्या समाजाच्या भाषेशी संपर्क येऊन त्यातून महाराष्ट्री ही प्राकृत भाषा निर्माण झाली, असे एक मत आहे. काहींच्या मते उत्तर हिंदुस्थानातच संस्कृताचे भिन्न अपभ्रंश होण्यास प्रारंभ झाला होता. किंबहुना वेदकाळीसुद्धा, ग्रंथाची भाषा वैदिक संस्कृत ही असताना, बहुजनांची एक तिच्याहून निराळी अशी भाषा प्रचलित असली पाहिजे. संस्कृत पंडितांचीसुद्धा प्रत्यक्ष बोलण्याची भाषा तीच असली पाहिजे. यज्ञविधी प्रत्यक्ष चालू असताना त्या काळात प्राकृतात बोलू नये असा एक दंडक होता. त्यावरून धर्मकृत्ये व शास्त्रीय चर्चा ही सोडून अन्यवेळी, वेदकाळीसुद्धा, विद्वान लोक कोठली तरी संस्कृतेतर भाषा बोलत असले पाहिजेत असे दिसते. वेदकाळची ही जी बोली भाषा तीच सर्व प्राकृत भाषांची जननी होय असे एक मत अलीकडे रूढ होत आहे आणि
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३८
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
११
महाराष्ट्राची पृथगात्मता