Jump to content

बंजारा भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बंजारा भाषा ही बंजारा समाजाची मायबोली असून भारतभर बोलली जाणारी राजस्थानी प्रभाव असलेली इंडोआर्यन परिवारातील एक समृृद्ध बोली भाषा आहे.[]  

डॉ. हिरालाल शुक्ल यांनी बंजारा भाषेला 'इंडोआर्यन' परिवारातील भाषा म्हणून संबोधले आहे. तर डॉ. उदय नारायण तिवारी , डॉ. राहुल सांस्कृत्ययान यांनी बंजारा बोलीला 'राजस्थानी बोली' म्हटल्याचे आढळून येते. इतिहास संशोधक बळीराम पाटील यांच्या 'बंजारा क्षत्रियोका इतिहास' (१९३०) या ग्रंथातही बंजारा भाषेतील दोहे आलेले आहे. भारतीय विविधतेला संपन्न करणाऱ्या विविध मातृभाषा यापैकीच बंजारा ही एक समृद्ध वारसा जपणारी बंजारा समाजाची मातृभाषा होय. बंजारा भाषा संदर्भात प्रख्यात बंजारा भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे अभ्यासक एकनाथ पवार-नायक यांनी "बंजारा भाषा ही ग्लोबल सिटीझनची चौदाखडी शिकवणारी सहिष्णूतेची एक मातृभाषा आहे. ज्यात कोणत्याही प्रकारची द्वेषमूलकता स्पर्शत नाही. ती मानवीय नातं जपणारी हृदयाची बोली आहे. ती निसर्गाच्या कुशीत बहरून धरती ,आकाश , चंद्र, तारे , पशू-पक्षी, नदी-नाले, झरे , वृक्ष-वेलीशी संवाद साधणारी निसर्गाची बोली आहेे" या शब्दात बंजारा भाषेचे वर्णन‌ केले आहे.[]


बंजारा बोली मराठी भाषांतर
याडी , ये जगेम तू सेती रूपवान छी | याडी, थारो घंळो रीण छ | आई, या जगात तू सर्वात सौंदर्यवान आहेस. आई, तुझे थोर उपकार आहे.
नायक, मारास्टेनं हारोभरो किदो | किरत वोरी सारी दनियाम गावै | नाईक ,यांनी महाराष्ट्राला हिरवेगार (समृद्ध) केले. किर्ती त्यांची जगभर गातात.
तू घंळी हार्द आवछी | तू आयीस कना ? वाटं जोवूं थारी | तू आयीस कना? तू खूप आठवतेस/आठवतोस. तू येशील केंव्हा ? वाट बघतो/बघते तुझी. तू येशील केंव्हा?
जीवेजीवेनं सायी वं । सेनं हारोभरो रखाड। जिवाजीवास प्रसन्न हो. सर्वांना सुखात ठेव.

बंजारा भाषा-साहित्य

[संपादन]

बंजारा साहित्य-संस्कृती विश्वात अनेक प्रतिभावंत साहित्यिक, कवी, लेखक, समिक्षक, गीतकार तर काही इतिहास संशोधक देखील लाभले आहे. ज्यामुळे बंजारा भाषा साहित्य आणि संस्कृती अबाधित राहण्यास फार मोठी मदत झाली. बंजारा साहित्य व इतिहासाचे आदयसंशोधक , साहित्यिक व इतिहासकार म्हणून स्मृ. बळीराम पाटील यांना मानले जाते. तांडाकार स्मृ. आत्माराम राठोड उपाख्य डॅनियल राणा यांनी बंजारा साहित्याला पुढे आणले. आत्माराम राठोड यांची सर्वप्रथम बंजारा बोलीभाषेत साहित्यकृती प्रकाशित झाली. "या पुढची घटना आम्हीही लिहू , आमची बंजारा बोली अजून लिपीबद्ध व्हायची आहे." असे 'लदेणी' मध्ये त्यांनी म्हणले. भिमणीपुत्र मोहन नाईक यांनी बंजारा भाषा सौंदर्याचे विविध पैलू उलगडून दाखविले. बंजारा भाषिक अस्मिता जागवणारा हा प्रवास आजच्या एकविसाव्या शतकातही कायम टिकून आहे. बंजारा भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे अभ्यासक एकनाथ पवार-नायक यांनी बंजारा भाषेचे गौरवगीत लिहिले.[]

"केसूला नै मोरा री । मायड भाषा बंजारा री। चांदा सुर्यास्यूं अमरारी। जीवे जीवेस्यू प्यारी।।"[]

(मराठी भावार्थ : पळस फुलाप्रमाणे बहरवणारी माझी मातृभाषा बंजारा आहे. चंद्र सूूूूर्याप्रमाणे अजरामर , अशी माझी बंजारा बोली जीवाहुन प्रिय आहे.)

भारतीय विविधतेला समृद्ध ��रणारी ऐतिहासिक बंजारा संस्कृती आणि बंजारा बोलीभाषेचे संवर्धन व्हावे, यासाठी सन २०१५ मध्ये पहिल्यांदा भक्तीधाम पोहरादेवी येथे एकनाथ पवार-नायक यांनी 'बंजारा साहित्य अकादमी' स्थापन करण्याची संकल्पना मांडली. []यासाठी त्यांनी माजी खासदार हरिभाऊ राठोड समवेत महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांची भेट देखील घेतली होती.[] गोर बंजारा साहित्य अकादमीची संकल्पना, पायाभरणी पाठपुरावा आणि प्रसार असे चौफेर पातळीवर योगदान दिल्याने गोर बंजारा साहित्य अकादमीचे शिल्पकार मानले जाते.[]

बंजारा भाषेच्या दर्जासाठी लढा

[संपादन]

बंजारा बोली ही भारतभर बोलली जाणणारी बंजारा समाजाची मायबोली आहे. संविधानाच्या आठव्या सुचीत समावेश करण्यात यावे, यासाठी सर्वप्रथम लोकसभेत खासदार हरिसिंग उर्फ हरिभाऊ राठोड यांनी शासनाकडे मागणी केली. त्यानंतर खासदार राजीव सातव यांनी देखील लोकसभेत मागणी रेटून बंजारा बोलीला भाषेचा दर्जा मिळण्याबाबत लढयाला गती दिली. कर्नाटक येथील खासदार उमेश जाधव , खासदार सुरेश धानोरकर यांनी देखील तशी मागणी शासनाकडे केली. 'तांडेसामू चालो' अभियान अंतर्गत पहिल्यांदाच बंजारा बोलीला भाषेचा दर्जा देण्यात यावे, याबाबत 'चांदा ते बांदा' स्वाक्षरी मोहीम राबवली. प्रसिद्ध लेखक भिमणीपूत्र मोहन नाईक यांनी पत्रव्यवहार केले. पुढे राष्ट्रीय बंजारा परिषद व इतर सामाजिक संघटनांकडून जागृती निर्माण झाल्याने महाराष्ट्रातील अनेक खासदार व आमदारांनी शासनाकडे लेखी पत्रव्यवहार केला. राज्यातील विधान परिषदेचे आमदार हरिसिंग राठोड व तत्कालीन मंत्री संजय सिंह राठोड यांनी शासनाकडे जोरकस मागणी रेटल्याने बंजारा बोलीला भाषेचा दर्जा देण्याबाबत केंद्राकडे तशी शिफारस देखील करण्यात आली. बंजारा बोलीला भाषेचा दर्जा देण्यात यावे, यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची माजी खासदार हरिभाऊ राठोड, बंजारा साहित्य संस्कृतीचे अभ्यासक , विचारवंत एकनाथ पवार यांनी भेट घेऊन निवेदनही दिले. [] बंजारा समाजाकडून सातत्याने ही मागणी आता सुरू झालेली आहे. तथापि अखिल भारतीय बंजारा साहित्य संमेलनात देखील या संदर्भात अनेकदा ठराव मंजूर करण्यात आले आहे.

बंजाराचा साहित्य वारसा

[संपादन]

बळीराम पाटील ते एकनाथ पवार ('पाटील-पवार') पर्यंतचा साहित्य कालखंड हा बंजारा भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा सुवर्णकाळ मानला जातो. बळीराम पाटील ते एकनाथ पवार पर्यंतचा बंजारा साहित्य संस्कृतीचा प्रवास हा एकूणच बंजारा साहित्य, संस्कृतीसाठी मौलिक ठरला असून बंजाराचा आधुनिककालीन कालखंड ठरतो. ज्याअर्थी महाराष्ट्राच्या एकूणच राजकीय, सामाजिक क्षेत्रात 'पाटील-पवार' हा एक ब्रँड मानला जातो, त्याच अर्थी बंजारा साहित्य संस्कृती क्षेत्रात देखील 'पाटील-पवार' (बळीराम पाटील ते एकनाथ पवार) हा वारसा समर्पक ठरतो. तथापि पुरोगामी विचारसरणीचे मात्र 'तांडाकार ते वेदनाकार' अर्थात 'प्रतिभावंत साहित्यिक आत्माराम कनिराम राठोड ते नव्या पिढीतील सर्जनशील साहित्यिक एकनाथ पवार' पर्यंतचा काळ 'आधुनिक बंजारा साहित्य चळवळीचा एक समृद्ध पुरोगामी वारसा' म्हणून संबोधतात.[][१०]

प्रतिभावंत साहित्यिक एकनाथ पवार नंतरचा बंजारा साहित्याचा द्वितीय कालखंडात मात्र मोठ्या प्रमाणात नवोदितांची भरणा दिसून येते. ज्यात भाषिक आणि जातीय अस्मितापर लेखन मोठ्या प्रमाणात पहायला मिळते. बंजारा साहित्य जगतात कोणत्याही एका विशिष्ट विचारसरणीचा सर्वार्थाने पगडा दिसून येत नाही. बंजारा साहित्यिक, लेखक, कवी, गीतकार , समिक्षक, नाटककार, कथाकार यांचे साहित्य लेखनप्रकार हा विविधांगी स्वरुपाचा आहे. जुन्या व नव्या पिढीतील साहित्य रसिक, साहित्य संस्कृतीशी निगडीत सर्व प्रज्ञावंत घटकांनी बंजारा साहित्याचा वारसा अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

बंजारा साहित्यिक व लेखक

[संपादन]

• बळीराम हिरामण पाटील • आत्माराम कनिराम राठोड • पद्मश्री सोमलाल नायक खेतावत • जयराम सिताराम पवार • सुरेश कापडिया • डॉ.रामाकोटी पंवार • डॉ.इंदलसिंह जाधव • भिमणीपुत्र मोहन नाईक • प्रा. अशोक पवार • यशवंत जाधव • डॉ. गणपत राठोड • एकनाथ पवार-नायक • महेशचंद्र बंजारा • राजूसिंग बाणोत • डा. रमेश आर्य • जयपाल सिंह राठौड • हरिभाऊ राठोड • हरलाल सिंह पवार • वीरा राठोड • इंदरसिंह बालजोत • डॉ.विजया चांदावत • डॉ.धनंजय नाईक •चिनीया नाईक • पंजाबराव चव्हाण • विजय जाधव • प्रा.प्रकाश राठोड • प्रा.दिनेश राठोड • डॉ. सुभाष राठोड • रतन बाणोत • बी.सुग्रीव जुन्या नव्या काळातील अशा अनेक साहित्यिक व लेखकांचा बंजारा भाषा, साहित्यामध्ये उल्लेख केला जातो. आज नवोदितांचे बंजारा भाषेत मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती होतांना दिसून येते. साहित्य क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित होणारे सोमलाल नायक खेतावत हे पहिले बंजारा साहित्यिक ठरले.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Inclusion of Banjara language in 8th Schedule sought". द हिंदू (इंग्रजी भाषेत). २४ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ नायक - पवार, एकनाथ (2022). "केसुला नै मोरारी मायड भाषा बंजारारी". दैनिक सकाळ. नागपूर.
  3. ^ Dhawane, Bandukumar. "बंजारा अस्मिता जागविणारे भाषा गौरवगीत". Gaurav Prakashan (Hindi भाषेत). 2022-09-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-09-04 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "बंजारा भाषा गौरवगीत भाषेचे वैभव अन् अस्मिता जागवीणारे". इये मराठीचिये नगरी. २१ फेब्रुवारी २०२३.
  5. ^ "बंजारा अकादमी स्थापन करुन बंजारा बोलीला भाषेचा दर्जा देण्याची राज्यपालांकडे मागणी". लोकमत न्यूझ. 9 फेब्रुवारी 2023.
  6. ^ "गाेर बंजारा साहित्य अकादमीला राज्य सरकारनं दिली मान्यता". Lokmat. 2024-03-17. 2024-03-17 रोजी पाहिले.
  7. ^ "बंजारा भाषा, साहित्य व संस्कृती ऐतिहासिक ठेवा | Gaurav Prakashan". www.gauravprakashan.com. 2024-03-21 रोजी पाहिले.
  8. ^ "बंजारा बोलीला भाषेचा दर्जा द्या". नागपूर: महाराष्ट्र टाइम्स. २०२३.
  9. ^ तांडाकार ते वेदनाकार' : आधुनिक बंजारा साहित्य चळवळीचा वारसा. अ. भा. बंजारा साहित्य संमेलन वाशीम. २०१६. pp. ९१. ISBN 9788191054330.
  10. ^ चव्हाण, भट्टू वेंकण्णा (2024). "बंजारा साहित्य विश्व की एक गरिमापुर्ण विरासत". कुंटेडा. 4: 8–11.