वि.वा. शिरवाडकर
वि.वा. शिरवाडकर | |
---|---|
वि.वा. शिरवाडकर | |
जन्म नाव | विष्णू वामन शिरवाडकर |
टोपणनाव | कुसुमाग्रज |
जन्म |
२७ फेब्रुवारी, १९१२ (पुणे ) |
मृत्यू |
१० मार्च, १९९९ (वय ८७) नाशिक |
शिक्षण | १९८६ - डी.लिटची मानद पदवी . पुणे विद्यापीठातर्फे. |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
धर्म | हिंदू |
कार्यक्षेत्र | कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक |
भाषा | मराठी |
प्रसिद्ध साहित्यकृती |
नटसम्राट, विशाखा |
पुरस्कार |
ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, पद्मभूषण |
संकेतस्थळ |
kusumagraj |
विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर (२७ फेब्रुवारी १९१२ - १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील दैदीप्यमान रत्न असे करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. ( अनेक वेळा सर्व सामान्य माणसा कडून 'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी भाषा दिवस' याची गफलत केली जाते. 'मराठी भाषा गौरव दिवस' (२७ फेब्रुवारी) आणि 'मराठी राजभाषा दिवस' (१ मे) हे स्वतंत्र दिवस असून या दिवसाचे स्वतंत्र असे महत्त्व आहे. १ मे रोजी मराठी राजभाषा दिवस साजरा केला जातो.)
कुसुमाग्रज हे मराठी अभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक होते. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्द-कलेवरचे प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्यातल्या सखोल सहानुभूतीने त्यांना समाजाच्या सर्व थरांतील वास्तवाला भिडण्यासाठी आणि पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांमधील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांच्यातल्या शोधक आणि चिकित्सक स्वभावाने त्यांना प्रत्यक्ष ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचे आकलन करायला प्रवृत्त केले. त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झाले आहे.
जीवन
[संपादन]कुसुमाग्रजांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे बदलले गेले.[१] कुसुमाग्रजांचे वडील वकील होते, वकिलाच्या व्यवसायासाठी ते पिंपळगाव बसवंत या तालुक्याच्या गावी आले, कुसुमाग्रजांचे बालपण येथेच गेले.[२] कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती, एकुलती एक बहीण सर्वांची लाडकी म्हणून कुसुमचे अग्रज म्हणून 'कुसुमाग्रज' असे नाव त्यांनी धारण केले. तेव्हापासून शिरवाडकर कवी 'कुसुमाग्रज' या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले. नाशिक येथील हं. प्रा. ठा. कला महाविद्यालयातून त्यांनी आपले बी.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. बी.ए.ची पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहिणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. यानंतर सोबत, स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी, अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. १९३० मध्ये झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कुसुमाग्रज यांचाही सहभाग होता. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली आहे.[३][४] १९३३ साली त्यांनी 'ध्रुव मंडळा'ची स्थापना केली. अनेक सामाजिक चळवळीत, सत्याग्रहांमधे सहभाग घेतला. पुढील काळातही त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली.
पत्रकारितेच्या निमित्ताने मुंबईत आल्यावर शिरवाडकरांना मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉ. अ.ना. भालेराव भेटले. मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ संपून ती मृतप्राय होऊ नये म्हणून झटणारे भालेराव यांनी कवी शिरवाडकरांना नाटके लिहिण्यास प्रवृत्त केले, केवळ कवी असलेले वि.वा. शिरवाडकर बघता बघता एक यशस्वी नाटककार झाले.
१० मार्च १९९९ रोजी शिरवाडकरांचे निधन झाले.
वि.वा. शिरवाडकर यांच्या स्मरणार्थ नाशिक येथे ’कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ नावाची संस्था उभारण्यात आली आहे.
त्यांच्या नाशिकमधील टिळकवाडी येथील निवासस्थानी आता मराठी पुस्तकांचे सुसज्ज ग्रंथालय आहे.
लेखनशैली
[संपादन]सामाजिक अन्याय व विषमता या विषयांवर कुसुमाग्रजांनी त्यांच्या लिखाणातून कठोर टीका केली. "साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे" या मताचा त्यांनी पुरस्कार केला. कविता, नाटक, कादंबरी, कथा, लघुनिबंध इत्यादी साहित्यप्रकार त्यांनी हाताळले.
साहित्यविचार
[संपादन]प्रा. देवानंद सोनटक्के यांच्या मतानुसार कुसुमाग्रजांचा साहित्यविचार पूर्णतः लौकिकतावादी आहे. एका समाजमनस्क कलावंताच्या सामाजिक चिंतनाचा आलेख त्यात उमटला आहे. कलावादाचा अतिरेक आणि सामाजिकतेचा तिरस्कार अशा द्वंद्वात अडकलेल्या मराठी साहित्यव्यवहारात त्यांनी समन्वय साधला आहे. कलाक्षेत्रात त्या त्या वेळी निर्माण झालेल्या संभ्रमावस्थेतेचे पितामहाच्या भूमिकेतून केलेले ते मार्गदर्शन आहे. कुसुमाग्रज हे अहंकार, अनुभव आणि आविर्भाव ही कलेची आधारभूत तत्त्वे मानतात, त्यांचा हा विचार लेखकसापेक्ष आहे. अहंकार लेखकाच्या लेखनप्रक्रियेला प्रेरणा आणि गती देतो, हे तत्त्व लेखकसापेक्ष आहे. आविर्भाव आशयाचा आकार म्हणजे घाट ठरवितो, म्हणजे हे तत्त्व कलाकृतिसापेक्ष आहे. वर्चस्व हे तत्त्व रसिकसापेक्ष आहे, तर लेखकाच्या अनुभवाची समृद्धी लेखकाच्या सामीलकीवर अवलंबून असते, हे तत्त्व समाजसापेक्ष आहे. कुसुमाग्रजांचा साहित्यविचार समाजसापेक्ष असून ते सामाजिकतेलाच परतत्त्व मानतात, विविध जातींतील लेखक लिहू लागणे यात त्यांना साहित्याची परपुष्टता, समृद्धी वाटते.[५][६]
कुसुमाग्रजांच्या साहित्यविचाराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असे तो एकाचवेळी लेखकसापेक्ष आणि समाजसापेक्ष आहे. लेखकाच्या अनुभवाला, त्याच्या स्वातंत्र्याला आणि त्याचा व्यक्तिमत्त्वाला कुसुमाग्रज महत्त्व देतात. कलेचे आधारभूत तत्त्व ते सौंदर्य, नीती, आत्मनिष्ठा इत्यादींना मानत नाही. त्यांच्या मते "अहंकार, अनुभव आणि आविर्भाव ही साहित्याचीच नव्हे कोणत्याही मानवनिर्मित कलेची आधारभूत तत्त्वे होत.” (रूपरेषा,पृ.२३)
प्रा. देवानंद सोनटक्के यांच्या मतानुसार कलाकृतीत नावीन्य अनुभवामुळेच येते, असे कुसुमाग्रज म्हणतात. म्हणजे कुसुमाग्रजांची नावीन्याची संकल्पना आकृतिवादी नसून आशयवादी आहे. नावीन्य व अनुभव समृद्धीसाठी लेखकाने सामीलकी आणि सामाजिकतेचा स्वीकार करावा. समाजजीवनातील उपेक्षितांचे अनुभव साहित्यात यावे. त्यासाठी समाज जीवनातील व साहित्य व्यवहारातील पुरोहितशाही, जातीयता नष्ट होणे गरजेचे आहे, असे कुसुमाग्रज मानतात.
कुसुमाग्रज, क्रांती ही साहित्याची प्रेरणा मानतात. साहित्य परिवर्तनास पूरक ठरू शकते, असे मानतात. त्यामुळे साहित्याला ते विशुद्ध कला मानत नसून सामाजिक साधन मानतात. कुसुमाग्रजांचा साहित्यविचार बा. सी. मर्ढेकर आणि कुसुमावती देशपांडे यांच्या साहित्यविचारांचा संवादसेतू आहे. मर्ढेकरांच्या नंतर मराठी साहित्यात दुर्बोधता, अश्लीलता आणि लैंगिकता हीच श्रेष्ठ साहित्याची लक्षणे रूढ होत होती, त्यावर कुसुमाग्रजांनी टीका केली आहे. मात्र त्याचबरोबर पारंपरिक नीतिमत्ता आणि श्लीलता या कल्पनांना ढोंगी ठरवून नकार दिला आहे. नाटक मूलतः वाङमय असते, नाटकाच्या पात्रांमध्ये लेखकाचे मीपण असते, असे म्हणणे त्यांच्या अहंकार-आविर्भाव सुसंगत आहे. मीपणाशिवाय अहंकार आणि आविर्भाव शक्य नाहीच.
"साहित्य ही मानवी संसारातील एक समर्थ, किंबहुना सर्वात अधिक समर्थ अशी वस्तू आहे. समाज हा संस्कृतीच्या वातावरणात जिवंत राहत असतो आणि या संस्कृतीच्या प्रवाहात सातत्य ठेवण्याचे, त्याला प्रगत करण्याचे कार्य साहित्य करीत असते. माणसे मर्त्य असतात, पण त्यांनी उच्चारलेला वाङ्मयीन शब्द मात्र अजरामर असतो. पृथ्वीवरच्या नाशवंत पसाऱ्यामध्ये हीच एक शक्ती अशी आहे, की जिला चिरंजीवनाचे वरदान लाभलेले आहे. शब्दाच्या या शक्तीचा उपयोग करूनच संस्कृती जगत असते, पुढे जात असते. देशादेशांतील अंतर या शब्दाने कमी होते आणि युगायुगांची साखळी या शब्दानेच जोडली जाते. या प्रभावी शक्तीचे, शब्दाचे अवतारकार्य कोणते? माणसांच्या मनावर संस्कार करणे हे एकच एक त्यांचे अवतारकार्य होय. संस्कार करणे हा शब्दांचा स्वभाव आहे. साहित्य हे शब्दाश्रित असल्यामुळे तेही वाचकाच्या किंवा श्रोत्याच्या मनावर कोणते न कोणते संस्कार केल्याविना राहत नाही."
कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर हे कवी, नाटककार म्हणून जितके प्रसिद्ध आहेत, तितके साहित्यमीमांसक म्हणून प्रसिद्ध नाहीत. त्यांनी आपला साहित्यविचार स्वतंत्रपणे मांडला नाही. ‘रूपरेषा’ या ग्रंथात त्यांचे साहित्य-चिंतन संकलित करण्यात आले आहे. त्याच्याच आधारे कुसुमाग्रजांचा साहित्यविचार प्रस्तुत निबंधात शोधला आहे. कुसुमाग्रजांच्या कवितेत आलेला साहित्यविचारही येथे विचारात घेतलेला नाही. या शोधनिबंधात त्यांच्या काव्यविचाराचा अभ्यास व विचार स्वतंत्रपणे केलेला नाही.
- कलेचे आधारभूत तत्त्व
कुसुमाग्रजांच्या या विचारात मर्ढेकरी कलाविचारातील आत्मनिष्ठा, सौंदर्य किंवा नेमाडेप्रणित लेखकाची नैतिकता, देशीयता यांपेक्षा वेगळी भूमिका दिसते. सर���व संत ज्या अहंकाराच्या विसर्जनाला महत्त्व देतात त्या अहंकाराला शिरवाडकर कलेत महत्त्वाचे मानतात. त्यांचे म्हणणे असे की, लेखकाचा अहंकार अनन्यसाधारण रूप धारण करतो तेव्हाच लेखकाला लिहावेसे वाटते. या अहंकारामुळेच स्वतःचे स्वत्व बाहेर पल्लवीत करण्याचा एक आंतरिक आग्रह त्याच्या ठिकाणी उत्पन्न होतो. अहंकाराची ही प्रवृत्ती नुसत्या आविष्काराने नव्हे तर वर्चस्वाने समाधान पावते. हे वर्चस्व लेखकाला जवळ व दूर प्रत्यक्षात वा अप्रत्यक्षात असलेल्या वाचकांच्या संदर्भात प्राप्त होते. म्हणजे वाचकवरील वर्चस्वाच्या भावनेने कलानिर्मिती होते असे त्यांचे म्हणणे आहे.
ही प्रक्रिया रसिक, वाचक कशी स्वीकारतो? तर, वाचक शब्दांच्या माध्यमातून लेखकाच्या विश्वात प्रवेश करतो आणि स्वतःच्या जीवनाचे संन्यसन करून त्या वेळेपुरता लेखकाच्या आधीन होतो. याला Empathy म्हणजे ``अंतरानुभूती म्हणतात. वाचकाच्या दृष्टीने जी अंतरानुभूती; तेच लेखकाच्या दृष्टीने वर्चस्वाचे स्वरूप. कुसुमाग्रज म्हणतात, ”कोणत्याही कलेच्या मुळाशी असलेल्या अहंकाराच्या प्रेरणेने आपल्या अंकित होणाऱ्या मनांचे म्हणजेच माणसांचे हे अस्तित्त्व मूलत:च गृहीत धरलेले असते. या प्रेरणेच्या अभावी साहित्याची अथवा कोणत्याही कलेची निर्मितीच सर्वस्वी अशक्य आहे.” (रूपरेषा, पृ.२३/२४)
या अहंकाराच्या प्रेरणेचा समावेश कुसुमाग्रज निर्मितिप्रक्रियेत करतात. त्यांच्या मते, वाचकांपर्यंत पोचण्याची लेखकाची इच्छा लेखनाच्या एकूण प्रक्रियेतच समाविष्ट करायला पाहिजे. असाधारण अहंकारातून इतर अनेक व्यवहारांप्रमाणे माणसाला साहित्यनिर्मितीची प्रेरणा मिळते. जग ऐकत आहे हे माहीत असल्यानेच कवी मोठ्याने बोलतो. “माणसाचे सारे अस्तित्त्व म्हणजे भोवतालच्या जगाशी तो प्रस्थापित करत असलेल्या अनेकविध संबंधांची मालिका असते. साहित्य म्हणजे मूलतः अशा प्रकारचा एक संबंध होय. हा संबंध एका बाजूला साहित्यिकाच्या अहंकाराने आणि दुसऱ्या बाजूला वाचकाच्या अनुभवशोधकतेने नियंत्रित झालेला असतो.” (रूपरेषा, पृ.२५/२६)
- निरुद्देश आविष्कार सृष्टीच्या व्यवहारात तत्त्वतः नामंजूर आहे
आविर्भाव
[संपादन]यानंतर कुसुमाग्रज कलेच्या आविर्भाव या तत्त्वाचे विवेचन करतात. ते म्हणतात, साहित्याचे साहित्यत्व सिद्ध होते ते आविर्भाव व अनुभव या तत्त्वांमुळे. “आविर्भाव म्हणजे जे अरूप आहे किंवा विरूप आहे त्याला परिणामकारक, सौंदर्यबुद्धीला आवाहन करील असा आकार देण्याची प्रवृत्ती होय. अनुभव मुळात निराकार व निरामय असतो. आविर्भाववृती त्याला शब्दांच्या साह्याने आकार देते, रूप देते. शब्द हे या वाङ्मयीन आविर्भावाचे साधन आहे. कुसुमाग्रजांच्या मते, साहित्यप्रकारांचा जन्मही या वृत्तीतूनच होतो. ही वृत्ती मनोगताची रहदारी सुलभ करण्यासाठी साहित्यप्रकार जन्माला घालते. वाङ्मयप्रकारात जे काळानुसार बदल होतात त्याचेही कारण कुसुमाग्रज ही वृत्तीच मानतात. त्यांच्या मते, आविर्भावाच्या प्रयोगशीलतेमुळे व नवीनतेच्या आग्रहामुळेच हे बदल होतात. काळाची गरज भागवण्यासाठी आविर्भाववृत्ती वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळे साहित्यप्रकार जन्मास घालते.
अनुभव
[संपादन]कुसुमाग्रजांच्या मते, आविर्भावाने साहित्याचे रूप ठरते तर अनुभवाने त्याचा आशय निश्चित होतो. अनुभव या संज्ञेचा अर्थ प्रत्यक्षाशी येणारा संबंध असा नसून, लेखकाच्या मनात उद्भवणारी एक भावावस्थेतील जाणीव असा आहे. म्हणजे लौकिक अनुभवानंतरची लेखकाची भावावस्थाच कलाकृतीचा आशय निश्चित करते. “आविर्भाव आणि अनुभव यांच्या संयोगाने साहित्याचे पोत तयार होत असले तरी त्यातील धागेपणाचे स्थान अनुभवाकडे आहे...लेखकांमध्ये अहंकाराची प्रेरणा प्रबळ आहे, अविर्भावाचे सामर्थ्यही प्रभावी आहे; परंतु त्याची अनुभव घेण्याची शक्ती जर संकुचित, बोथट आणि केवळ वरच्या थरालाच स्पर्श करणारी असेल तर त्याचे साहित्य उथळ आणि घायपाताच्या रेशमी कापडासारखे दिखाऊ परंतु तकलादू होण्याची शक्यता असते.”[७]
म्हणजे, जे स्थान मर्ढेकर आत्मनिष्ठेला देतात तेच कुसुमाग्रज अनुभवाला देतात. या अनुभवाचे अधिक विश्लेषण करताना ते म्हणतात, अनुभव प्रत्येक माणसागणिक वेगळा असल्यामुळे एकाच विषयाबाबतही सारखेपणा येत नाही. माणसे संपत नाही, माणसाचे अनुभव संपत नाही, विषय संपत नाहीत. त्यामुळे साहित्यसरितेचा प्रवाह सतत जिवंत, वाहता आणि वाढता ठेवण्याचे कार्य मुख्यत: अनुभवाकडून होत असते. शिवाय साहित्याला कलाकृतीचे स्वरूप अनुभवामुळेच येते. कुसुमाग्रज, अनुभव आणि आविर्भाव यांचा परस्पर संबंध असा स्पष्ट करतात: आविर्भाव-सामर्थ्य प्रभावी असूनसुद्धा योग्य अनुभवाच्या अभावी साहित्याला श्रेष्ठ कलाकृतीचे रूप येणार नाही. आशय आणि आकार यांत सुसंवाद असतो मात्र त्यांच्यात अभिन्नता नसते. समाजाने दिलेला शब्द, साहित्यक्षेत्रातील प्रचलित परंपरा, त्या सांभाळण्याची अथवा तोडण्याची प्रवृत्ती आणि आवश्यकता, परिसरातील बदलती परिस्थिती इत्यादी गोष्टी आविर्भावाचे नियमन करतात. “साहित्यासारख्या कलेत हे जे पारंपरिक असते, आवाहनात्मक असते, समाजाच्या जवळ जाणारे असते ते आविर्भावातून उत्पन्न होते. आणि याच्या पलीकडचे, साहित्यकृतीच्या अंतरंगातील गर्भागार सिद्ध करणारे, त्या ठिकाणी एका नवीन जीवनाची आपल्याला देणगी देऊन आपले व्यक्तिगत जीवन परमेश्वराच्या साहाय्याशिवाय द्विगुणित करणारे, साहित्याला अजरामरता देणारे, जे काही असते ते या अनुभवामुळेच आपल्याला लाभते.” (रूपरेषा, पृ.३०) म्हणजे कलाकृतीत नाविन्य अनुभवामुळेच येते. कलेचे कलारूप याचठिकाणी पूर्ण होते, किंबहुना याचमुळे पूर्ण होते. आविर्भावाच्या म्हणजे आकाराच्या पलीकडे असलेली कलाकृतीची खास नवीनता, तिची खास स्वतंत्रता या अनुभवातच समाविष्ट असते. एखादी कलाकृती ही खास आणि फक्त तिच्या निर्मात्याचीच असते ती तिच्यातील अनुभवामुळे. अशा अनुभवामुळेच चांगल्या साहित्यकृतीला अनन्यसाधारणता व केवलता प्राप्त होते. “अपार आणि अनंत अशा जीवनाचा एक तुकडा, म्हणजेच एक जाणीव, लेखक-कवीच्या मनात प्रवेश करते. जागृत वा सुप्त अवस्थेत असलेल्या इतर संबंधित जाणिवांचे या जाणिवेवर काही संस्कार होतात, आणि या संस्कारामुळेच पूर्णरूप पावलेला त्याचा अनुभव कथा, नाट्य, अथवा काव्य अशा कलाकृतींच्या द्वारा व्यक्त होतो.” (रूपरेषा, पृ.३०) अशी लेखकाची निर्मितिप्रक्रिया घडून येते.
काव्याविषयीचा दृष्टिकोन
[संपादन]कुसुमाग्रजांच्या मते, काव्य हा माणसाच्या भोवतालच्या परिसराशी असलेला संवाद होय. आपल्याला उत्कटपणे जाण���लेले दुसऱ्यापर्यंत पोहोचवणे ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. काव्यातून हा अनुभव दुसऱ्यापर्यंत पोचतो तेव्हा कवीला मीपण व्यापक झाल्याचे समाधान मिळते म्हणजे त्याचा अहंकार सुखावतो. एकाचा अनुभव अनेकांचा होतो. कुसुमाग्रजांच्या मते, हीच काव्यलेखनाची प्रक्रिया व प्रेरणा होय. येथे शब्दांच्या द्वारा कवीचे व्यक्तित्व बाहेर पल्लवीत होते. कवी काव्याच्या साह्याने एक सामाजिक संबंध जोडीत असतो. अशाप्रकारे काव्य म्हणजे अखेरत: कवी आणि वाचक यांच्यामधला एक शब्दांकित, प्रतिमामय संबंध होय.
काव्य हा कवीचा आत्मविष्कार असला तरी आत्माविष्काराची परिणती जेव्हा शब्दांच्या द्वारा संवादात होते, तेव्हाच काव्याचा उदय होतो. हा आविष्कार जेव्हा शब्दाचा म्हणजे सामाजिक व्यवहाराच्या माध्यमाचा आश्रय घेतो, तेव्हा तो काव्यरूप पावतो. शब्द ही एक सामाजिक घटना आहे. म्हणून शब्दांचा वापर करणे म्हणजे स्वतःकडून इतरांकडे, आविष्कारातून संवादाकडे जाणे होय. यात शब्दांची निवड असते आणि छंद, यमक, लय आणि प्रतिमा यांचीही योजना असते, असे कुसुमाग्रज म्हणतात. म्हणजेच काव्यातील आविष्कारात कल्पना आणि रचना यांचेही पदर विणले जातात.
शब्दांची सामाजिकता आणि कवीची कल्पकता यांची प्रक्रिया येथे घडून येते. या प्रक्रियेचे आणखी स्पष्टीकरण ते करतात: “नदीचे वाहते पाणी एखाद्या खड्ड्यात थांबते, साचते आणि तिथे डोह तयार होतो. त्याप्रमाणे जीवनासंबंधीच्या प्रतिक्रिया काही व्यक्तित्वात थांबतात, साचतात, आणि काव्याला जन्म देतात. ही निर्मितीदेखील पूर्णतः स्वयंभू नसते, तर अपरिहार्यपणे संस्कारित असते. हे संस्कार पूर्वसूरींचे असतात, प्रचलित ज्ञानाचे असतात, आणि ज्या परिसरात कवी जन्मतो, वावरतो, त्या परिसराचेही असतात.”
शिरवाडकरांचे आनंद हे पुस्तक काव्याचे उत्तम उदाहरणआहे. त्यातील आनंदच्या मुखी गुंफलेल्या कविता मनाचा ठाव घेतात
(रूपरेषा, पृ.५)
[संपादन]इथे कुसुमाग्रजांनी लेखकाची निर्मितिप्रक्रिया सांगितली असून तिचे आलंबन लेखकाचे व्यक्तित्व, संस्कार आणि सामाजिक परिस्थिती हे मानले आहे.
नाटक आणि संगीत नाटक
[संपादन]कुसुमाग्रज हे नाटककार होते त्यामुळे त्यांच्या नाट्यविचारातही लेखकसापेक्षता आहे. नाटकाच्या पात्रांमध्ये लेखकाचे मीपण, त्याच्या मीपणाचे एक सूत्र व्यक्त होत असते. नाटकात अनेक पात्रे असतात, पण ती पात्रे लेखकाच्या दृष्टीने अनेक ‘मी’च असतात. इतर वाङ्मयप्रकारापेक्षा लेखकाचे मीपण नाटकात अधिक असते. लेखकाला नाटक व्यक्तीत, माणसाच्या स्वभावधर्मात, त्याच्या संघर्षात सापडते, असे सांगून त्यांनी त्यासाठी स्वतःच्या नाटकांची उदाहरणे दिली आहेत.
कुसुमाग्रजांच्या मते, नाट्यप्रगती लेखकाच्या तत्त्वज्ञानात्मक समृद्धीनेच होते. नाटक हे मूलत: वाङ्मय असते. नाटकाची परिणती प्रेक्षकांच्या रसास्वादात होत असली तरी त्याचा उगम नाटकाच्या प्रतिभेत होत असल्यामुळे त्याच ठिकाणी त्याचे शुद्ध, अविकृत स्वरूप शोधायला हवे. वाङ्मयीन गुणवत्ता हा चांगल्या नाटकाचा पहिला निकष आहे. नाटक म्हणजे प्रेक्षकाचे लक्ष बांधून ठेवणारे, त्यांचे रंजन करणारे, स्टेजवर उभारलेले केवळ एक यांत्रिक वा तांत्रिक बांधकाम नव्हे.
नाटक हे रम्य काव्य आहे, म्हणून इतर साहित्यप्रकाराप्रमाणेच चांगले नाटक हे वाङ्मयीन गुणांचा आविष्कार करणारे हवे. त्याला चांगली वाचनीयता हवी. नाटकाची वाचनीयता म्हणजे वाचकांच्या मानसिक रंगभूमीवर होणारा त्याचा प्रयोग होय. नाटकातील ही गुणवत्ता हरवली तर सारेच हरवले.
संगीत नाटक हा मराठी रंगभूमीचा एक अमोल वारसा आहे. संगीतकाराच्या सुप्रमाण, कल्पक व प्रयोगशील योजनेने तो अधिक संपन्न करता येईल. शब्दार्थाचे फारसे साहाय्य न घेता, केवळ स्वररचनेच्या प्रभावाने संवादी वातावरणाचा शामियाना उभा करण्याचे संगीतात सामर्थ्य असते, असे ते म्हणत.
दुर्बोधता आणि अलिप्तता
[संपादन]कुसुमाग्रजांच्या काळात, मर्ढेकरांच्या अनुकरणातून आलेल्या दुर्बोधता, अश्लीलता, लैंगिकता या प्रवृत्ती फोफावल्या होत्या. त्याबद्दलची तीव्र नापसंती ते व्यक्त करतात. काव्य दुर्बोध, कथा विश्लेषणात्मक, कादंबरी लैंगिक, नाटक काव्यशून्य आणि त्रोटक असायला हवे, या आग्रहाच्या मुळाशी, ‘लौकिक आहे त्यापासून दूर जाण्याची आणि अलिप्ततेच्या अंधाऱ्या अरुंद गुहेमध्ये स्वतःला कोंडून घेण्याची’ एक समान प्रवृत्ती आहे, असे ते म्हणतात.
“आपल्या अंगावरील लक्तरे स्वतःपासून लपवत धुळीने माखलेल्या स्वतःच्या पायांचा शरमिंद्या नजरेने धिक्क्कार करत ही उच्चभ्रू कलावंतांची सारी यात्रा असामान्यतेच्या शोधासाठी वाटचाल करीत आहे...साहित्य हे मुळातच असामान्य असते आणि साहित्यिक हा साहित्याची निर्मिती करीत असताना असामान्याच्या कक्षेबाहेर जात असतो. परंतु प्रतिभेची असामान्यता वेगळी आणि प्रवृत्तीची वेगळी.” (रूपरेषा, पृ.५०)
येथे कुसुमाग्रजांनी लेखकांच्या मध्यमवर्गीय, समाजापासून अलिप्त राहण्याच्या वृत्तीवर टीका केली आहे. दुर्बोधतेला नकार दिला असून सामाजिकतेचा स्वीकार केला आहे. साहित्यिक स्वतःला दुर्बोधतेच्या, अतिरेकी विश्लेषणाच्या, विकृत आत्मनिष्ठेच्या आणि पढिक पांडित्याच्या कैदखान्यात स्वतःला बांधून ठेवत आहे. जुनी समाजरचना ढासळली आणि नव्याची रूपरेषा नीट ठरली नाही या परिस्थितीमुळे ते असे करीत आहेत. ‘हजारो वर्षे अज्ञानाच्या, जातिभेदाच्या आणि दारिद्र्याच्या खाईत बेशुद्धावस्थेत पडलेला समाज आपले हातपाय हालवू लागला आहे.. नव्या जाणिवांनी, आकांक्षांनी आणि अहंकारांनी निपचित पडलेल्या मनात चैतन्य निर्माण केले आहे’ असे हे जग मध्यमवर्गाच्या पलीकडचे असून; या घडामोडींची वार्ता न ठेवत मध्यमवर्गीय लेखक, ‘कोणत्याही सामाजिक प्रतिक्रिया वैफल्याच्या स्वरूपातच हवी’ असा आग्रह धरतो आहे, ‘तिरसट, कडवट आणि सहानुभूतिशून्य उद्गार तेच उस्फूर्त व प्रामाणिक काव्य’ असे मानतो आहे. आणि कोणी लेखनात प्रागतिक, राष्ट्रीय अथवा दलितांसंदर्भात सहानुभूती मांडली तर ते प्रचारी, आक्रस्ताळी, कृत्रिम आहे असे मानतो आहे.. यावर कुसुमाग्रजांनी, ‘साहित्यात ही नवी पुरोहितशाही अवतीर्ण होत आहे’ अशी टीका केली आहे.
साहित्य आणि सामाजिकता
[संपादन]कुसुमाग्रज साहित्य आणि समाजाचे नाते मानतात. त्यांचा साहित्यविचार लौकिकतावादी आहे. जीवनवादी आहे. मानवी संसाराच्या समग्र नकाशात साहित्याचे स्थान असते; तर मानवी जीवनाच्या आराखड्यातच साहित्यशास्त्राचे स्थान असते, असे सांगून कुसुमाग्रजांनी साहित्य आणि जीवनाचा संबंध जोडला आहे. ते म्हणतात, साहित्यिकाची प्रतिभा कितीही आकाशमार्गी असली तरी त्याचे पाय-नव्हे सारे जीवन पृथ्वीवरती टेकलेले असते. लेखकाचे व्यक्तित्व स्वयंभू आणि स्वतंत्र असत नाही. परिसरातील परिस्थितीचे नानाविध संस्कार त्याच्यावर होत असतात व त्या क्रिया-प्रतिक्रियांतून त्याला विशिष्ट आकार, विशिष्ट रंग प्राप्त होतो. लेखकाच्या अलिप्ततेतून निर्माण होणारे साहित्य आणि साहित्यशास्त्र केव्हाही निरामय आणि विकसनशील असू शकणार नाही. साहित्यविचाराबाबत निर्विकल्पतेचा आव खरा नसतो, असे ते म्हणतात. कुसुमाग्रज साहित्याच्या सामाजिकतेचा पुरस्कार आणि जातीयतेचा निषेध करतात. त्यांच्या मते, साहित्य आणि संस्कृती यांचा जवळचा संबंध असतो. त्यामुळे साहित्याचा जीवननिरपेक्ष अथवा संस्कृतिनिरपेक्ष असा विचार करता येत नाही. ज्या समाजातील जीवन समृद्ध आणि विशाल आहे तेथेच साहित्याचा निरामय आणि निर्वेध विकास होऊ शकेल. जातिभेदामुळे आमच्या सामाजिक, राजकीय तसेच साहित्यिक विकासाचाही मार्ग कुंठित केला आहे. “आमच्या लेखकाच्या सभोवार जन्मापासून असलेल्या जातीयतेचा तट इतका अभेद्य असतो की आपल्या जागेवरून समग्र समाजजीवनाचे यथार्थ दर्शन त्याला कधी घेताच यायचे नाही.” (रूपरेषा, पृ.६८) असे ते म्हणतात. त्यांच्या मते, श्रेष्ठ लेखनाच्या मागे अप्रत्यक्ष अनुभूती असते; तरी तिचा धागा प्रत्यक्षाशी जुळलेला असल्यामुळेच अप्रत्यक्ष अनुभूती ही अनुभूती होते. त्यासाठी लेखकाजवळ प्रतिभाबळ असावे लागते. ‘मराठी वाङ्मयाची उंची आपणा सर्वाना अभिमान वाटावी अशीच आहे. परंतु आपले साहित्य आणि साहित्यामागे असलेली आपली जीवनदृष्टी प्रगतिशील असल्यामुळे ज्या तळावर आपण आलो आहोत त्यापुढील तळ कोणते हे पाहणे आवश्यक ठरते.’ त्यामुळे आपले साहित्य संपूर्ण आणि समृद्ध होण्यासाठी जातीयतेची बंधने नष्ट होणे आवश्यक आहे.
इथे कुसुमाग्रज, मराठी साहित्य, सकस समृद्ध आणि परपुष्ट नसण्याचे कारण आपली समाजरचना मानतात. आचार्य धर्माधिकारी यांचा दाखला देऊन कुसुमाग्रज सांगतात, हिंदू समाजात हिंदू कोणीच नाही; जे आहेत ते तेली, वंजारी, मराठा असे आहेत. या सर्व भिंती ओलांडून सर्वत्र संचार करण्याचे सामर्थ्य लेखकाच्या प्रतिभेत येणे कठीण आहे. त्यामुळे विविध जातींतील लेखक लिहू लागल्यावर वाङ्मयाचे क्षितिज खूप रुंदावेल यात शंका नाही. म्हणजे साहित्य समृद्धीसाठी सर्व जातिसमूहांचा समावेश त्यांना महत्त्वाचा वाटतो.
सामाजिकता हेच आजचे परतत्त्व
[संपादन]सामाजिकतेलाच कुसुमाग्रज साहित्याचे परतत्त्व मानतात. काव्याचे श्रेष्ठत्व त्यातील कवित्वाने आणि रसिकत्वाने सिद्ध होते. त्याला परतत्त्वाचा स्पर्श झाल्यास अधिक श्रेयस्कर होय. पण परतत्त्वाचा अर्थ सध्याच्या सामाजिक संदर्भात, जे दलित पतित व व्यथित आहेत त्यांच्या हिताहिताची जाणीव ठेवणे होय. ते म्हणतात, जातिभेदाप्रमाणेच दारिद्र्य्, अज्ञान आणि ऐहिकनिष्ठेचा अभाव यांचाही समाजजीवनावर विपरित परिणाम झाला आहे. औदासिन्य आणि निवृत्तीची छाया समाजावर शतकानुशतके पडली आहे. सांस्कृतिक पुनरुज्जीवनाच्या नावाखाली आध्यात्मिक धुके पुन्हा लादले जात आहे. या काळोखातून मार्ग काढण्याची प्रतिभा, प्रज्ञा आणि सहानुभूती असलेल्या साहित्यिकाला, कलावंताला साहाय्य करायला हवे. अशाप्रकारे त्यांनी वंचितांच्या साहित्याचे स्वागतच केले आहे.
बांधिलकी आणि सामिलकी
[संपादन]कुसुमाग्रज बांधिलकीपेक्षा सामिलकीला मानतात. “एखाद्या विचाराशी व अनुभूतीशी बांधलेल्या बांधिलकीपेक्षा, विचारशक्ती आणि अनुभवक्षमता मुक्त ठेवणाऱ्या ‘सामिलकी’चे महत्त्व मला अधिक वाटते. सामिलकीत बांधिलकी समाविष्ट असतेच, पण बांधिलकीची मर्यादा आणि कृपणता तीत असत नाही. बांधिलकी हा लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अंगभूत भाग असतो, तो बाहेरून आणता येत नाही”(रूपरेषा, पृ.१०६)
बांधिलकी ही विचाराच्या बाबतीत खरोखर संभवतच नाही. कारण बांधून घेणे हे जे स्थिर आहे त्याच्याबाबतीत शक्य आहे; पण विचार स्थिर नसून गतिमान असतात. ‘सामिलकी म्हणजे घटनांच्या प्रवाहात मनाने सामील होणे, आणि संस्कृतीच्या वरच्या बांधकामावर नव्हे तर तिच्या मुळाशी असलेल्या आधारभूत मूल्यांची जाण आणि त्यासाठी आग्रह असणे’ होय. अशाप्रकारे कुसुमाग्रज विचारांच्या प्रवाहीपणाला महत्त्व देतात.
‘विचारांचे प्रवाहीपण नाकारणे म्हणजे त्याचे अस्तित्त्वच नाकारणे आणि पर्यायाने संस्कृतीचा विकासही नाकारणे होय.’ असे ते मानतात. लेखक, कवी हा प्रथमत: विचारभावनांच्या आविष्काराने बांधलेला असतो. म्हणूनच त्याची जीवनविषयक जाणीव व्यापक आणि सर्वस्पर्शी असणे इष्ट असते. बांधिलकी, सामिलकी ही लेखकाच्या सामाजिक विचारभावनांशी संबधित असते. निसर्गसौंदर्याच्या बाबतीतही त्याची प्रतिक्रिया वेगळी असल्याचे दिसत नाही. ‘समाज आणि व्यक्ती यांच्यातील सबंधक्षेत्र हेच सामिलकीचे व बांधिलकीचे प्रमुख प्रभावक्षेत्र आहे, असे ते मानतात.
साहित्याचे सामाजिक प्रयोजन
[संपादन]कुसुमाग्रजांच्या मते, साहित्याने प्रत्यक्ष क्रांती होत नसली तरी, क्रांती ही साहित्याची प्रेरणा होऊ शकते. तसेच साहित्य लहानमोठ्या परिवर्तनास आवश्यक अशी मनोभूमिका निर्माण करू शकते. केवळ कलात्मक प्रेरणेचा आग्रह धरणे म्हणजे साहित्याच्या स्वाभाविक विस्ताराला मर्यादा घालणे होय. ही प्रेरणा सौंदर्यात्मक (बालकवी), भावनात्मक (खांडेकर), संशोधनात्मक (गाडगीळ-गोखले), तात्त्विक (खाडिलकर), पारमार्थिक (संतकाव्य) अशी जशी असू शकते तशी ती क्रांतिकारक असू शकते. त्यांच्या मते, “सृष्टीतील सौंदर्य खरे तेवढेच सामाजिक जीवनातील प्रक्षोभही खरे आहेत. श्रद्धा प्रेमावर परमेश्वरावर जशी असू शकते तशी ती एखाद्या राजकीय व सामाजिक तत्त्वज्ञानावर असू शकते” (रूपरेषा, पृ.५३)
साहित्य, नीती आणि अश्लीलता
[संपादन]कुसुमाग्रजांच्या मते, लेखक हा सुसंस्कृत मनुष्य असतो. आपल्या मनावरील नीतिमत्तेचे प्राथमिक संस्कार त्याला कधीही पुसता येत नाही. लेखक नीतिबाह्य असू शकत नाही. प्रचलित नीतिकल्पनांच्या संदर्भात तो नीतिविरोधी असू शकेल. जुने नीतिनियम हे न्याय देण्यास असमर्थ होतात, मनावर अत्याचार करू लागतात, समाजाच्या प्रगतीस अडथळा आणतात. प्रस्थापित नीती ही नीतीचे नाटक असते. अशावेळी रूढ नीतीचे उल्लंघन लेखक करतात. तेव्हा त्यांच्या प्रतिभेला, माणसाला माणुसकी देणाऱ्या शुद्ध सनातन नीतीचे दर्शन व्हायला हवे. नीतीची ही कल्पना बुद्धिवादी आहे, पारंपरिक नाही. द.दि. पुंडे म्हणतात, कुसुमाग्रज, नीतीची उभारणी मध्ययुगीन पापपुण्यादि कल्पनांच्या आधारे न करता माणुसकीच्या तत्त्वावर, न्यायअन्यायाच्या मूलगामी विचारांवर करतात..(कुसुमाग्रज/ शिरवाडकर: एक शोध, पृ १४)
कुसुमाग्रजांच्या मते, अश्लीलतेचा प्रश्न सामाजिक बंधनाचा आहे, तसाच तो अनुभव प्रामाणिकतेचाही आहे. ही भूमिका एकदमच निराळी आहे. “आधुनिक काळातील परिस्थितीने आणि ज्ञानाने संस्कारित झालेल्या जाणिवा म्हणजेच त्यांच्या पासून सिद्ध होणारा अनुभव, वाङ्मयात प्रामाणिकतेने यायचा असेल, आणि तो आल्याशिवाय राहणार नाही, तर श्लीलतेच्या सरहद्दी आपल्याला आणखी व्यापक करण्यावाचून गत्यंतर नाही.” (रूपरेषा, पृ.३६) असे त्यांनी म्हणले आहे. अशा रीतीने कुसुमाग्रजांनी केलेल्या वाङ्मयीन चिंतनातून त्यांचा साहित्यविचार शोधता येतो.
त्यांच्या साहित्य प्रवासाबरोबर माणूस म्हणून त्याचं वेगळं व्यक्तिमत्त्व अभ्यासायचं तर अनेक पैलूनी ते पहावे लागेल. नाशिकमधील अनेक चळवळींचे ते प्रणेते होते. उदाहरणार्थ त्यांनी लोकहितवादी मंडळ १९५० मध्ये सुरू केले नाशिकच्या प्रसिद्ध सार्वजनिक वाचनालयाचे ते १९६२ ते १९७२ पर्यंत अध्यक्ष होते. ते दशक वाचनालयाचे सुवर्णयुग म्हणले पाहीजे. सामाजिक वा वैयक्तिक अशा कुठल्याही प्रकल्पांना ते मार्गदर्शन करीत. कोणीही कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन मागण्यास आला तर क्षणात त्या व्यक्तीची क्षमता ओळखून ते मदत करीत. असे असूनही यश साजरे करतांना ते मागे राहणंच पसंत करत.
मराठी साहित्यात अजरामर साहित्यकृती निर्माण करणाऱ्या वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या प्रकाशित न झालेल्या साहित्यापैकी बरेच साहित्य दुर्लक्षित असल्याची बाब समोर आली आहे. हे दुर्लक्षित साहित्य नाशिक शहरात असतानाना रसिकांना त्याची दखल घ्यावीशी वाटली,ना कुसुमाग्रजांच्या नावाने स्थापन झालेल्या प्रतिष्ठानला. कुसुमाग्रजांनी मराठी साहित्यातील सर्व प्रकारांमध्ये विपुल लेखन केले. यात कथा, कविता, नाटक, एकांकिका, बालसाहित्य अशा सर्व प्रकारांचा समावेश आहे. वि. वा. शिरवाडकर या नावाने लिखाण करण्याअगोदर कुसुमाग्रजांनी पूर्वाश्रमीच्या गजानन रंगनाथ शिरवाडकर या नावानेदेखील मोठ्या प्रमाणात लेखन केले होते. मात्र त्यांचे पुस्तकरूपाने प्रकाशित झालेले साहित्यच फक्त जनतेसमोर आले. त्यांनी लिहिलेले लेख, व्यक्तिचित्रणे, प्रवासवर्णने, बालकविता असा साहित्य प्रकार आजही दुर्लक्षित व असंग्रहित आहे. या साहित्यामध्ये १८९ कविता व १३ बाल कविता आहेत.
साहित्य
[संपादन]कुसुमाग्रज यांची खालील पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.
कविता संग्रह
[संपादन]- अक्षरबाग (१९९0)
- किनारा(१९५२)
- चाफा(१९९८)
- छंदोमयी (१९८२)
- जाईचा कुंज (१९३६)
- जीवन लहरी(१९३३)
- थांब सहेली (२००२)
- पांथेय (१९८९)
- प्रवासी पक्षी (१९८९)
- मराठी माती (१९६०)
- महावृक्ष (१९९७)
- माधवी(१९९४)
- मारवा (१९९९)
- मुक्तायन (१९८४)
- मेघदूत(१९५६)
- रसयात्रा (१९६९)
- वादळ वेल (१९६९)
- विशाखा (१९४२)
- श्रावण (१९८५)
- समिधा ( १९४७)
- स्वगत(१९६२)
- हिमरेषा(१९६४)
निबंधसंग्रह
[संपादन]- आहे आणि नाही (पुस्तक) - लघुनिबंध संग्रह
- प्रतिसाद (पुस्तक) - लघुनिबंध संग्रह
नाटके
[संपादन]- ऑथेल्लो
- आनंद
- आमचं नाव बाबुराव
- एक होती वाघीण
- किमयागार
- कैकेयी
- कौंतेय
- जेथे चंद्र उगवत नाही
- दिवाणी दावा
- दुसरा पेशवा
- दूरचे दिवे (रूपांतरित, मूळ इंग्रजी नाटक ॲन आयडियल हजबंड. लेखक ऑस्कर वाईल्ड)
- देवाचे घर
- नटसम्राट
- नाटक बसते आहे
- बेकेट
- महंत
- मुख्यमंत्री
- ययाति देवयानी
- राजमुकुट
- विदूषक
- वीज म्हणाली धरतीला
- वैजयंती
कथासंग्रह
[संपादन]- अंतराळ (कथासंग्रह)
- अपॉईंटमेंट (कथासंग्रह)
- एकाकी तारा
- काही वृद्ध काही तरुण (कथासंग्रह)
- जादूची होडी (बालकथा)
- प्रेम आणि मांजर (कथासंग्रह)
- फुलवाली (कथासंग्रह)
- बारा निवडक कथा (कथासंग्रह)
- सतारीचे बोल (कथासंग्रह)
कादंबऱ्या
[संपादन]- कल्पनेच्या तीरावर
- जान्हवी
- वैष्णव
आठवणीपर
[संपादन]- वाटेवरच्या सावल्या (पूर्वीचे नाव- विरामचिन्हे)
एकांकिका
[संपादन]- दिवाणीदावा १९५४, ४ आवृत्ती १९७३.
- देवाचे घर १९५५, २री आवृत्ती १९७३.
- नाटक बसते आहे आणि इतर एकांकिका१९६०, २ री आवृत्ती १९८६.
- प्रकाशाची दारे मौज दिवाळी अंक, १९५९.
- बेत, दीपावली, १९७०.
- संघर्ष, सुगंध दिवाळी अंक, १९६८.
लघुनिबंध आणि इतर लेखन
[संपादन]- आहे आणि नाही
- एकाकी तारा
- एखादं पण, एखादं फूल
- प्रतिसाद
- बरे झाले देवा
- मराठीचिए नगरी
- विरामचिन्हे
कुसुमाग्रजांसंबंधी पुस्तके
[संपादन]- कुसुमाग्रज शैलीचे अंतरंग (डाॅ. सुरेश भृगुवार)
- कुसुमाग्रज/शिरवाडकर : एक शोध, लेखक : द.दि. पुंडे, मेहता प्रकाशन, पुणे, १९९१, (दुसरी आवृत्ती)
- कुसुमाग्रजांचा सामाजिक साहित्यविचार : डॉ. देवानंद सोनटक्के लिखित 'समीक्षेची अपरूपे-हर्मिस प्रकाशन (पुणे, २०१७) या पुस्तकातील एक लेख
- कुसुमाग्रजांच्या प्रतिभेचा उगम आणि विकास (डाॅ. द.दि. पुंडे)
- भारतीय साहित्याचे निर्माते कुसुमाग्रज (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक, निशिकांत मिरजकर; मराठी अनुवाद - अविनाश सप्रे, साहित्य अकादमी, २०११)
- सौंदर्याचे उपासक कुसुमाग्रज (संपादक - डाॅ. नागेश कांबळे)
वि.वा. शिवाडकरांसंबंधी पुस्तके
[संपादन]- रूपरेषा, वि.वा .शिरवाडकर, संपादक : सुभाष सोनवणे, चेतश्री प्रकाशन, अमळनेर, १९८४
- शिरवाडकरांची नाटके (शोभा देशमुख)
पुरस्कार
[संपादन]- महाराष्ट्र सरकारचे उत्कृष्ट पुस्तकासाठीचे पुरस्कार
- ’मराठी माती’ला १९६० साली
- ’स्वगत’ला १९६२ साली
- ’हिमरेषा’ला १९६२ साली
- ’नटसम्राट’ला १९७१ साली
- ’नटसम्राट’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार (१९७४)
- "ययाती आणि देवयानी" या नाटकास १९६६ या वर्षी तर संगीत "वीज म्हणाली धरतीला" या नाटकास १९६७ मध्ये राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले.
- विशाखा कवितासंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार
- भारत सरकारचा साहित्यक्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार (१९९१ साली)
- भारत सरकारचा ज्ञानपीठ पुरस्कार
- अखिल भारतीय नाट्यपरिषदेचा "राम गणेश गडकरी" पुरस्कार त्यांना १९६५ मध्ये प्राप्त झाला.
- अंतराळातील एका ताऱ्यास "कुसुमाग्रज" हे नाव दिले गेले आहे.
- १९७४ साली 'नटसम्राट' नाटकाला 'साहित्यसंघ' पुरस्कार मिळाला.
- १९८६ मध्ये पुणे विद्यापीठाने त्यांना 'डि.लिट्' ही सन्माननीय पदवी प्रदान केली.
- १९८८ मध्ये संगीत नाटयलेखन पुरस्कार मिळाला.
वि.वा. शिरवाडकरांना मिळालेले सन्मान
[संपादन]- १९६० मध्ये मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षपदी निवड
- १९६४ च्याच मडगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले.
- १९७० साली कोल्हापूर येथे भरलेल्या ५१व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद
- १९९० साली मुंबईत भरलेल्या पहिल्या जागतिक मराठी परिषदेचे ते अध्यक्ष होते.
- त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.
कुसुमाग्रज यांच्या नावाचे पुरस्कार
[संपादन]- नक्षत्राचे देणे काव्यमंच संस्थेचा कुसुमाग्रज स्मृति गौरव पुरस्कार : हा कवी प्रा. शांताराम हिवराळे यांना मिळाला होता.
- यशव��तराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्यावतीने देण्यात येणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार
- कुसुमाग्रज प्रतिष्ठान (नाशिक) यांच्यातर्फे देण्यात येणारा जनस्थान पुरस्कार. एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असते. २०१३साली भालचंद्र नेमाडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
- नशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या वतीने देण्यात येणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार. एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे याही पुरस्काराचे स्वरूप असते. २०१० साली कन्नड साहित्यिक जयंत कैकिणी, २०११ साली हिंदी साहित्यिक डॉ. चंद्रकांत देवतळे, २०१२ साली मल्याळी साहित्यिक के.सच्चिनानंदन आणि २०१३ साली गुजराती कवी, नाटककार आणि समीक्षक डॉ. सितांशू यशश्चंद्र यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.
- महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने काव्य विभागासाठी दिला जाणारा कुसुमाग्रज पुरस्कार : हा, हत्ती इलो (काव्यसंग्रह-कवी अजय कांडर) आणि कल्लोळातील एकांत (काव्यसंग्रह-कवी अझीम नवाज) यांना विभागून मिळाला होता.
- नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे विविध क्षेत्रातील असामान्य कामगिरीसाठी कुसुमाग्रज यांच्या स्मृतीदिनी, १० मार्चला एक वर्षाआड ‘गोदावरी गौरव पुरस्कार' देण्यात येतात. अभिनेते नाना पाटेकर, नालंदा नृत्य संशोधन केंद्राच्या संस्थापिका डॉ. कनक रेळे, रॅम सायकल शर्यत विजेते डॉ. महाजन बंधू, प्रसिद्ध वास्तुरचनाकार डॉ. बाळकृष्ण दोशी, जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. शशीकुमार चित्रे व महिला सबलीकरणाचे कार्य करणाऱ्या चेतना सिन्हा यांना हा पुरस्कार मिळाला आहे, (२०१६)
- महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे काॅन्टिनेन्टल प्रकाशनपुरस्कृत कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार जालना येथील संजीवनी तडेगावकर यांच्या 'संदर्भासहित' कवितासंग्रहाला प्रदान झाला. (२८ फेब्रुवारी २०१९)
संदर्भ ग्रंथ
[संपादन]- सौंदर्याचे उपासक कुसुमाग्रज (संपादक - डाॅ. नागेश कांबळे)
- कुसुमाग्रज/शिरवाडकर : एक शोध, लेखक : द.दि. पुंडे, मेहता प्रकाशन, पुणे, १९९१, (दुसरी आवृत्ती)
- कुसुमाग्रजांचा सामाजिक साहित्यविचार : डॉ. देवानंद सोनटक्के लिखित 'समीक्षेची अपरूपे-हर्मिस प्रकाशन (पुणे, २०१७) या पुस्तकातील एक लेख
- रूपरेषा, वि.वा .शिरवाडकर, संपादक : सुभाष सोनवणे, चेतश्री प्रकाशन, अमळनेर, १९८४
- भारतीय साहित्याचे निर्माते कुसुमाग्रज, निशिकांत मिरजकर (मूळ इंग्रजी, मराठी अनुवादक अविनाश सप्रे, साहित्य अकादमी, २०११)
संदर्भ
[संपादन]- ^ "कुसुमाग्रजांचे साहित्य आजही दुर्लक्षित". महाराष्ट्र टाइम्स. 2021-11-24 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
- ^ http://www.loksatta.com/navneet-news/marathi-articles-on-kusumagraj-1495525/
- ^ https://m.lokmat.com/television/dr-babarasaheb-ambedkar-serial-be-seen-kalaram-temple-satyagraha-story/
- ^ https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/ravivar-mata/artical-on-vashivarcha-paulkhuna/articleshow/57349100.cms[permanent dead link]
- ^ २९ सप्टें. २०११ कुसुमाग्रजांचे साहित्य: राष्ट्रीय चर्चासत्र, नागपूर शोधनिबंध: प्रा. देवानंद सोनटक्के
- ^ कुसुमाग्रजांचा साहित्यविचार : सामाजिक चिंतनाचा आलेख (प्रा. देवानंद सोनटक्के, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर)
- ^ (रूपरेषा, पृ.२९)