सुलोचना चव्हाण
playback singer | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | सुलोचना चव्हाण | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | मार्च १३, इ.स. १९३३ मुंबई | ||
मृत्यू तारीख | डिसेंबर १०, इ.स. २०२२ गिरगाव | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
पुरस्कार |
| ||
| |||
सुलोचना चव्हाण (माहेरच्या सुलोचना कदम, जन्म: मुंबई, १७ मार्च १९३३ - मृत्यु: १० डिसेंबर २०२२) या एक मराठी गायिका होत्या. मुंबईतील एका चाळीत त्यांचे बालपण गेले. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच त्या गायला लागल्या. त्यावेळेस मुंबईत अनेक मेळे होते. सुलोचना चव्हाण यांच्या घरचाच एक मेळा होता "श्रीकृष्ण बाळमेळा". याच मेळ्यात त्यांच्यासोबत अभिनेत्री संध्या यांनीसुद्धा काम केले होते. या श्रीकृष्ण बाळमेळ्याच्या माध्यमातून सुलोचना चव्हाण यांचे कलाक्षेत्रात पहिले पाऊल पडले. मेळ्यांच्या सोबतीतच त्यांनी हिंदी, गुजराती आणि उर्दू नाटकात बालभूमिका केलेल्या आहेत. त्यांची मोठी बहीण स्वतः कलाक्षेत्रात नव्हती, पण सुलोचना चव्हाणांना नेहमी प्र��त्साहन देत असे. सुलोचनाने उत्तम गावे असे त्यांना वाटत असे. असे असले तरी, सुलोचना चव्हाण यांना गायनाचे कोणतेही शास्त्रीय शिक्षण मिळाले नाही. त्याकाळात ग्रामोफोन रेकॉर्ड ऐकून ऐकूनच त्या गायनाचा रियाज करायच्या. त्याकाळात परिस्थितीशी झगडून त्यांनी गाण्याची कला आत्मसात केली आणि त्यामुळेच त्यांची ही कला चिरकालीन टिकावी अशी निर्माण झाली.
श्रीकृष्ण बाळमेळ्यामध्येच मेकअपमन दांडेकर हे चित्रपटसृष्टीशी संबंधित होते. त्यांच्यामुळेच संगीत दिग्दर्शक श्याम बाबू भट्टाचार्य पाठक यांच्याकडे सुलोचनाबाई पहिले गाणे गायल्या. तो चित्रपट हिंदी भाषेतील होता आणि चित्रपटाचे नाव होते "कृष्ण सुदामा". पहिले गाणे जेंव्हा सुलोचना चव्हाण गायल्या तेंव्हा त्यांचे वय होते अवघे नऊ वर्षे. आपण गाणे रेकॉर्डिंगसाठी फ्रॉकमध्ये गेलो होतो अशी आठवण देखील त्या आवर्जून सांगतात. या नंतर त्यांनी मास्टर भगवान यांच्या काही चित्रपटांत पार्श्वगायन केले आणि त्यावेळेस त्यांच्यासोबत सहगायक असत "सी. रामचंद्र" (त्यांची द्वंद्वगीते - "जो बिगड गयी वो किस्मत हूँ / नजर से नजर लड गयी, जिगर में छूरी गड गयी, हाय राम). पार्श्वगायन करताना मोहम्मद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम, गीता दत्त, श्यामसुंदर यांच्यासारख्या आघाडीच्या गायकांबरोबर गाण्याची संधी त्यांना मिळाली. करियरच्या सुरुवातीलाच अनेक दिग्गजांबरोबर त्यांनी काम केले. वयाच्या सोळाव्या वर्षी गायक मन्ना डे यांच्यासोबत त्या "भोजपुरी रामायण" गायल्या होत्या. मराठी व्यतिरिक्त त्यांनी हिंदी, गुजराती, भोजपुरी, तामीळ, पंजाबी या भाषांमध्ये त्यांनी भजन, गझल असे विविध प्रकारदेखील हाताळले आहेत. त्यांचे गझल गायन ऐकून बेगम अख्तर यांनी सुलोचना चव्हाण यांना जवळ घेऊन दिलखुलास दाद दिली होती. सुलोचनाबाईंच्या आयुष्यातील आठवणींपैकी ही एक अतिशय महत्त्वाची आठवण. सुलोचनाबाईंचे शास्त्रीय गायकीचे शिक्षण झाले नाही हे ऐकून तर बेगम अख्तर यांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
लावणीगायन
[संपादन]वत्सलाबाई कुमठेकर यांनी गायलेली "सांभाळ गं, सांभाळ गं, सांभाळ दौलत लाखाची" ही लावणी सुलोचना चव्हाण लहानपणी वारंवार गुणगुणत असत आणि त्यासाठी आईकडून त्यांनी भरपूर ओरडाही खाल्ला होता. कारण मुलींनी लावणी ऐकू नये, गाऊ नये असे त्यांच्या आईला वाटायचे. पुढे मराठी लावणीसम्राज्ञी ठरलेल्या सुलोचना चव्हाण यांनी पहिली लावणी, आचार्य अत्रे यांच्या "हीच माझी लक्ष्मी" या चित्रपटात गायली. संगीतकार होते वसंत देसाई, आणि ही लावणी चित्रित झाली होते हंसा वाडकर यांच्यावर. या एका गाण्याने सुलोचना चव्हाणांच्या कारकिर्दीला लावणीच्या दिशेने वळण लागले. त्या लावणीचे शब्द होते "मुंबईच्या कालेजात गेले पती, आले होऊनशान बीए बीटी..." . आचार्य अत्रे यांनीच त्यांना "लावणीसम्राज्ञी" असा किताब दिला.
सुलोचना चव्हाण यांनी १९५३-५४ च्या सुमारास "कलगीतुरा" या चित्रपटासाठी राजा बढे यांनी गायलेल्या काही लावण्या गायल्या. त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे नाव "एस. चव्हाण" होते. पुढे याच दिग्दर्शकाबरोबर सुलोचनाबाईंचे लग्न झाले आणि सुलोचना कदम या सुलोचना चव्हाण झाल्या. यादरम्यानच "रंगल्या रात्री अशा" या चित्रपटातील गाणी सुलोचना चव्हाण यांनीच गावी असा आग्रह गीतकार जगदीश खेबुडकर यांनी धरला आणि "नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापुरची, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची" या गाण्याने त्यांचे आयुष्यच बदलून गेले. त्यातूनच खऱ्या अर्थाने लावणीसम्राज्ञी म्हणून सुलोचना चव्हाण पुढे आल्या. "मल्हारी मार्तंड, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका, अशा अनेक तमाशाप्रधान चित्रपटांतून त्यांनी आपल्या ठसकेबाज स्वरात लावण्या सादर केल्या. चपखळ, फटकेबाज शब्दांना आपल्या आवाजाच्या, सुरांच्या माध्यमातून ठसका व खटका देण्याचे काम सुलोचना चव्हाणांइतके कुणीच उत्तम करू शकलेले नाही. "पाठीमागे अंतरे कसेही असोत पण लावणीच्या मुखड्याची सुरुवात ठसकेबाजच झाली पाहिजे" असे सुलोचना चव्हाणांचे ठाम मत होते आणि याचा प्रत्यय त्यांनी गायलेल्या लावण्यांतून येतोच.
सुलोचना चव्हाण यांना १९६५ साली "मल्हारी मार्तंड" या चित्रपटातील पार्श्वगायनासाठी महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार मिळाला. त्याहीपलीकडे जाऊन विविध स्तरावर त्यांनी गायलेल्या गाण्यांनी आणि विशेषतः लावण्यांनी त्यांना जनमानसांच्या हृदयात मानाचे स्थान मिळाले आहे.
सुलोचना चव्हाण यांची गाजलेली गाणी
[संपादन]१. नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापुरची, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची
२. तरुणपणाच्या रस्त्यावरच पहिलं ठिकाणं नाक्याचं, सोळावं वरीस धोक्याचं
३. पाडाला पिकलाय आंबा
४. फड सांभाळ तुऱ्याला गं आला, तुझ्या उसाला लागंल कोल्हा
५. कळीदार कपूरी पान, कोवळं छान, केशरी चुना रंगला काथ केवडा वर्खाचा विडा घ्या हो मनरमणा
६. खेळताना रंग बाई होळीचा होळीचा, फाटला गं कोना माझ्या चोळीचा
७. कसं काय पाटील बरं हाय का, काल काय ऐकलं ते खरं हाय का?
८. स्वर्गाहुन प्रिय आम्हाला आमचा सुंदर भारत देश, आम्ही जरी एक जरीही नाना जाती नाना वेष
९. मी बया पडली भिडंची, गाव हे हाय टग्याचं
१०. मल्हारी देव मल्हारी
११. नाचतो डोंबारी गं नाचतो डोंबारी
१२. पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा
१३. गोरा चंद्र डागला
१४. मला म्हणत्यात पुण्याची मैना
१५. पावना पुण्याचा आलाय गं
१६. रात्र श्रावणी आज राजसा पाउस पडतोय भारी, पाखरू पिरतीचं लाजुन बसलंय उरी
१७. आई चिडली, बाबा चिडला, काय करू तुझ्यावर माझा जीव जडला
१८. दर रात सुखाची नवसाची, मज झोपच येते दिवसाची
१९. हिरीला इंजिन बसवा
२०. कुठवर पाहू वाट सख्याची, माथ्यावर चंद्र की गं ढळला, अन् येण्याच वखत की गं टळला
२१. दाटु लागली उरात चोळी कुठवर आता जपायचं, औंदा लगीन करायचं
२२. अगं कारभारनी, करतो मनधरनी (सोबत जयवंत कुलकर्णी)
२३. करी दिवसाची रात माझी
२४. तुमच्या नावानं गळ्यात माझ्या बांधा एक डोरलं
२५. जागी हो जानकी
२६. बाई मी मुलखाची लाजरी
२७. राजसा घ्या गोविंद विडा
२८. लई लई लबाड दिसतोय ग
२९. घ्यावा नुसताच बघुन मुखडा
३०. बाळा माझ्या कर अंगाई
३१. श्रीहरी गीत तुझे गाते
सुलोचना चव्हाण यांना मिळालेले पुरस्कार
[संपादन]- शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा २००९ सालचा राम कदम कलागौरव पुरस्कार
- महाराष्ट्र सरकारच�� ’मल्हारी मार्तंड’ या चित्रपटाच्या पार्श्वगायनाकरिता १९६५ सालचा पुरस्कार
- संगीत क्षेत्रातील विशेष कामगिरीसाठी दिला जाणारा महाराष्ट्र शासनाचा वर्ष २०१०चा "लता मंगेशकर" पुरस्कार
- चिंचवडच्या रोटरी क्लबतर्फे जीवनगौरव पुरस्कार (१७-१-२०१५)
पुस्तक
[संपादन]सुलोचना चव्हाण यांनी ’माझं गाणं....माझं जगणं’ या नावाचे आत्मवरित्र लिहिले आहे.