Jump to content

विकिपीडिया:धूळपाटी/महाराष्ट्र जनुक कोश(प्रस्तावित)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अनादि कालापासून मानवी समाज देवरायांच्यात, देवडोहांच्यात, देवतलावांच्यात जैवविविधतेला संरक्षण देत आलेले आहेत, आणि या प्रथा महाराष्ट्रात आजही जिवंत आहेत.

उद्देश्य

[संपादन]

महाराष्ट्र जनुक कोश, हा प्रस्तावित उपक्रम असा विशाल दृष्टिकोन स्वीकारून स्वस्थळी, व स्थलबाह्य अशा दोनही प्रकारे काम करणारा एक जिवंत कोश रचेल. ह्यातील स्वस्थळी संरक्षणाचे प्रयत्न सर्व राज्यभर पसरलेले असतील, व त्यामुळे सगळीकडे लोकांना आपापल्या परिसरात जैवविविधता उपलब्ध राहू शकेल. यामुळे जैवविविधतेची नैसर्गिक उत्क्रान्ति, उदाहरणार्थ पिकांच्यात नव्या किडींविरुद्ध प्रतिकारशक्ति निर्माण होणे, हे चालू राहील. यातून शेतकर्‍यांना शाश्वत शेतीकडे वळायचे असेल, तर सरस गुणवत्तेचे वाण जवळच्या प्रदेशात उपलब्ध राहू शकतील.

कार्यक्रम

[संपादन]

महाराष्ट्र जनुक कोश हा एक सहभागी कार्यक्रम असेल, व देशात व महाराष्ट्रात चाललेल्या इतर उपक्रमांशी व ते चालवणार्‍या संस्थांशी तो सहकाराचे संबंध प्रस्थापित करेल. तसेच राज्यातल्या सर्व लोकांना अशा उपक्रमात भाग घेण्यास प्रोत्साहन देईल. इतरत्र चाललेल्या उपक्रमांची पुनरावृत्ति न करता, त्यांच्यातील उणीवा भरुन काढणारे, पूरक उपक्रम आखेल.

फोकस

[संपादन]

आपल्या उद्दिष्टांकडे सर्वांगीण दृष्टिकोनातून बघून, तो ती उद्दिष्टे सुरुवातीपासून शेवटापर्यंत नेता येतील अशी बांधणी करेल. ह्या दृष्टीने महाराष्ट्र जनुक कोशाने पुढील सात घटकांवर लक्ष केन्द्रित करण्याचे ठरवले आहे:[]

१) सागरी जैवविविधतेचे स्थलबाह्य संवर्धन

२) पिकांच्या गावरान वाणांचे शेतकर्‍यांच्या सहभागाने संवर्धन

३) पाळीव पशूंच्या जातींचे-नसलांचे पशुपालकांच्या सहभागाने संवर्धन

४) निवडक जलाशयांत जलचरांच्या देशी जाती-प्रजातींचे संवर्धन

५) लोकोपयोगी व आर्थिकदृष्ट्या उत्पादक अशा विविध स्वकीय वनस्पतींच्या द्वारे सामुदायिक वनसंपत्तीचे संवर्धन

६) गवताळ राने-माळरानांच्या जैवविविधतेचे संवर्धन

७) सर्वसहभागाने माहितीचे व्यवस्थापन

माहितीचे व्यवस्थापन

[संपादन]

लोकांबरोबर मराठीत माहिती संकलन हा इतर उपक्रमांना आधारभूत असा जनुक कोशाच्या कार्यक्रमांतील महत्वाचा घटक असेल. या बाबतीतही जनुक कोश देशात अथवा जगात इतरत्र चाललेल्या उपक्रमांची पुनरावृत्ति न करता, त्यांच्याबरोबर सहकार करुन महाराष्ट्रात जे वैशिष्ट्यपूर्ण, पूरक उपक्रम आखता येतील, अशांवर भर देईल. उदाहरणार्थ, भारत शासनाच्या जीवतंत्रज्ञान विभागातर्फे एक भारतीय जैवविविधता सूचना जाल - Indian Biodiversity Information Network - IBIN नावाचा उपक्रम राबवला जात आहे. [[राष्ट्रीय वनस्पति संसाधन ब्यूरो]]चीही एक स्वतःची माहिती प्रणाली बनत आहेत. या उपक्रमांत महाराष्ट्रातील जैवविविधतेबद्दलच्या माहितीचाही समावेश आहेच आहे.

महाराष्ट्र जनुक कोश याला पूरक अशा दोन अंगांवर खास भर देईल.
  • एक म्हणजे लोकांना अशी माहिती संकलित करण्यात, वापरण्यात सहभागी करुन घेणे व
  • दुसरे म्हणजे मराठी भाषेच्या माध्यमाचा वापर करणे.

संधि

[संपादन]

ह्या दिशेने उपक्रम आखण्यास आज दोन मार्गांनी महत्वाची संधि उपलब्ध झाली आहे.

एक म्हणजे शिक्षणात सर्व पातळींवर पर्यावरण हा सक्तीचा विषय झाला असून महाराष्ट्रभर विद्यार्थी पर्यावरणाच्या निरीक्षणात भाग घेत आहेत; आणि दुसरे म्हणजे जैवविविधता कायद्या अंतर्गत सर्वत्र स्थानिक जैवविविधता समित्या निर्माण होऊन स्थानिक जैवविविधतेबद्दल माहिती संकलन करणे हे त्यांचे एक महत्वाचे कर्तव्य बनणार आहे.

पर्यावरण शिक्षण

[संपादन]

पर्यावरण शिक्षणाबाबत २००५ साली झालेल्या अभ्यासक्रमाच्या चौकटीच्या परीक्षणाच्या दोन महत्वाच्या शिफारसी केन्द्रीय शैक्षणिक सल्लागार मंडळाने मान्य केल्या आहेत. या शिफारसींनुसार :

(१) विद्यार्थ्यांनी त्यांच्या परिसराचे प्रत्यक्ष निरीक्षण, माहिती व्यवस्थित संकलित करणे व त्या निरीक्षणांचा अर्थ लावणे यात सहभागी व्हावे

(२) शाळा महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या सहभागाने पर्यावरणाची सद्यःस्थिती व त्यात चाललेले बदल यांवर माहिती संकलन करावी.

ह्या शिफारसींची अंमलबजावणी आता सुरु होत आहे. ह्या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पातून जनुक कोशाला उपयुक्त अशी उत्तम माहिती गोळा करता येईल.

उदाहरणार्थ, स्थानिक गोड्या पाण्यातील माशांची यादी करणे किंवा तेथील जलाशयाच्या व्यवस्थापनाचा जलचरांवर काय परिणाम होतो याचा अभ्यास करणे, अशा स्वरूपाचे प्रकल्प विद्यार्थी करू शकतील.

लोकांचे जैवविविधता नोंदणीपत्रक

[संपादन]

लवकरच जैवविविधता कायद्यानुसार स्थानिक जैवविविधता व्यवस्थापन समित्या ग्राम पंचायत, नगरपालिका, पंचायत समिति व जिल्हा परिषद पातळीवर प्रस्थापित होतील.ही, आज अस्तित्वात असलेल्या पाणलोट व वन व्यवस्थापन समित्यांबरोबर हात मिळवून एक नैसर्गिक संसाधनांच्या व्यवस्थापनाची चांगली विकेन्द्रीकृत प्रणाली बनू शकेल. या समित्यांना जैवविविधतेचा वापर नियमित करण्याचे व संग्रहण शुल्क आकारण्याचे अधिकार असतील.

ह्या कामाला आधार म्हणून त्या लोकांचे जैवविविधता नोंदणीपत्रक (People’s Biodiversity Register) बनवतील. ही माहिती संगणकीकृत डेटाबेसमध्ये भरता येईल.

वेगवेगळ्या ग्रामपंचायतींत, नगरपालिकांत गोळा केलेली ही माहिती तालुका व जिल्हा पातळीवर संकलित करुन एक समग्र चित्र उभे करता येईल. ह्या प्रक्रियेतून जनुक कोशाशी संबंधित अशी वेगवेगळी माहिती संपूर्ण राज्यभर सर्व लोकांच्या सहभागाने एकत्रित करण्याची, समजावून घेण्याची शक्यता आहे.

आधुनिक तांत्रिक साधने

[संपादन]

अलीकडे सूचना - संचार - तंत्राची (Information Communication Technology) प्रगति मोठ्या झपाट्याने होत चालली आहे. यातून माहिती- ज्ञान लोकांपर्यंत पोचवायला आणि लोकांना माहिती संकलनात, ज्ञान निर्मितीत सहभागी करायला अगदी सहज शक्य झाले आहे. आज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही जवळजवळ सगळीकडे सीडी वापरायची, पहायची साधने उपलब्ध आहेत. केवळ दहा रुपयांत अशा एका सीडीवर अनेक रंगीत चित्रांसहित प्रचंड माहिती उपलब्ध करून देता येते.

उदाहरणार्थ, अशा एका सीडीद्वारे सामूहिक वनसंपत्तिभूमीवर उत्पादनास अनुकूल अशा शेकडो वनस्पतिजातींची वर्णने, फुले, पाने, फळे, संपूर्ण वनस्पतींची छायाचित्रे, त्यांची रोपे वाढवण्याचे, लागवड करण्याचे, उत्पादन गोळा करण्याचे तंत्र, त्या उत्पादनांवर संस्करण करण्याची, मूल्यवर्धनाची तंत्रे, बाजारभाव, बाजारपेठा अशी सर्व माहिती लोकांपर्यंत पोचवता येईल. शिवाय ही माहिती केवळ इंग्रजीत नाही, तर मराठीतही पुरवता येईल. संगणकाद्वारे अथवा मोबाईल फोन वापरुन इंटरनेटही सगळीकडे उपलब्ध होउ लागले आहे. अनेक शाळा व पंचायत कार्यालयांतही संगणक व इंटरनेटची सुविधा उपलब्ध होऊ लागली आहे.

या संदर्भात एक नवी, महत्वाची सुविधा म्हणजे सहभागी संकेतस्थळे - participatory websites. हे सर्वसमावेशक साधन तीन स्रोतांतून वाढत आहे: स्वेच्छेने सहभाग, सहज समजण्याजोगे वर्गीकरण व सर्वांनी मिळून माहितीची गुणवत्ता ठरवण्याची पद्धति. यातून मोठ्या कार्यक्षमतेने माहिती एकत्र केली जाते, तिची पारख केली जाते, स्वीकरणीय-टाकाऊ ठरवले जाते, आणि चांगल्या माहितीचा सुव्यवस्थित समुच्चय बनवला जातो.

विकिपीडिया हा सर्वसमावेशक विश्वकोश अथवा ज्ञानकोश हे अशा पद्धतीने बनलेले, खास लोकप्रिय संकेतस्थळ आहे. या सगळ्यातून माहितीची सुव्यवस्थित मांडणी व चुकीची माहिती काढून टाकणे याच्या अधिकाधिक चांगल्या पद्धती निर्माण होत आहेत. या सगळ्यामागे विकी हे महत्वाच�� सॉफ्टवेअर आहे. हे वापरुन इंटरनेट उपलब्ध असणारी कोणतीही व्यक्ती, त्या संकेतस्थळावर अधिकार दिला गेला असल्यास, जी माहिती असते तिच्यात भर घालू शकते, काढून टाकू शकते, संपादित करू शकते, सर्व प्रकारे सुधारू शकते. अशा रीतीने वापरण्यासाठी आज अनेकांना सहभागाने वापरण्याजोगे, वाढवण्याजोगे दस्तावेज, तक्ते, नकाशे बनवले गेलेले आहेत. महत्वाचे म्हणजे अशा साहित्यात सर्व आवृत्त्या उपलब्ध राहतात. यामुळे कोणी खोडसाळपणे काहीही चुकीची माहिती भरली असल्यास, ती सहजगत्या काढून टाकता येते.

आज महाराष्ट्रात सर्वत्र स्थानिक जैवविविधता समित्यांच्या सहकाराने विद्यार्थी महाराष्ट्राच्या जनुकीय संसाधनावर छोटे छोटे प्रकल्प राबवू शकतील. काही विवक्षित दस्तावेजात, तक्त्यात माहिती भरण्याचा, संपादित करण्याचा अधिकार अशा विद्यार्थ्यांना देता येईल. त्याचा वापर करुन ते आपापल्या अभ्यासांतून, संशोधनातून गोळा केलेली माहिती तेथे भरु शकतील. इतरांनी गोळा केलेल्या माहितीशी तिची तुलना करु शकतील. मुद्दाम मदत करण्यास तयार असलेले तज्ञ अशी माहिती तपासून बघतील, त्यातील चुकीचा भाग दुरुस्त करू शकतील, गोळा झालेल्या सर्व माहितीच्या आधारे अधिक विश्लेषण, विवेचन करू शकतील. शेवटी अशी तावून-सुलाखून पाहिलेली माहिती सर्वांना उपलब्ध करून देता येईल. ती इतरांनाही तपासता येईल, त्यावर टीका-टिप्पण्णी करता येईल, त्यांनाही तिच्यात भर घालता येईल.

तांत्रिक मदत गट

[संपादन]

अशा कामासाठी एका गावातील अथवा जिल्ह्यातील पंचायतींचे किंवा शाळा-महाविद्यालयांचे, गट बनवून ते मुद्दाम बनवलेल्या विकी वापरणार्‍या संकेतस्थलांवर माहिती संग्रहित करु शकतील. अशा कामासाठी जिल्हानिहाय तज्ञांचे तांत्रिक मदत गट - Technical Support Consortia (TSC) स्थापता येतील. हे गट विद्यार्थी किंवा स्थानिक जैवविविधता व्यवस्थापन समित्या यांना मार्गदर्शन करतील; त्यांना माहिती गोळा करण्यास मदत म्हणून कार्यपद्धतीबद्दल स्थानिक परिस्थितीस अनुरुप अशी पुस्तके लिहितील, ती माहिती भरण्यास तक्ते बनवतील, स्थानिक वनस्पती, अथवा मासे इत्यादि ओळखण्यासाठी साहित्य तयार करतील. सर्वात महत्वाचे म्हणजे ते गोळा केलेल्या माहितीच्या गुणवत्तेची पारख करतील. अशा माहितीच्या आधारे विकी सॉफ्टवेअर वापरुन प्रत्येक जिल्ह्याच्या पातळीवर एक जिल्हा परिसर स्थिती नावाचे एक प्राथमिक स्वरूपाचे प्रकाशन सुरु करता येईल. या प्रकाशानातील साहित्यावर सर्वांना टीका - टिप्पणी नोंदवता येईल. नंतर अशा प्राथमिक स्वरुपाच्या प्रकाशनातील माहिती शास्त्रीय दृष्ट्या काळजीपूर्वक तपासून, वेबवर आणखी एक जिल्हा परिसर प्रकाशन नावाचे शास्त्रीय नियतकालिक सुरु करता येईल. हे इतर शास्त्रीय प्रकाशनांच्या तोडीचे असू शकेल. परंतु त्यातील बरीचशी माहिती खास स्थानिक लोकांना उपयुक्त असेल व खूप स्थानिक तपशिलातील असेल. ह्या शास्त्रीय प्रकाशनाच्या आधारे, विकिपीडिया किंवा एन्सायक्लोपीडिया ऑफ अर्थ अशा प्रकाशनांसाठी लेख बनवता येतील.

विकिपीडिया

[संपादन]

परिचय

[संपादन]

पहा विकिपीडिया:वनस्पती प्रकल्प अंतर्गत करावयाच्या गोष्टींची यादी

२००१ साली प्रारंभ झालेला विकिपीडिया आज वेबवरील सर्वात विस्तृत संदर्भग्रंथ बनला आहे. विकिपीडिया जगातील सर्वांनी सहभागाने लिहिलेले साहित्य आहे, व ते सर्वांना पूर्ण मुक्त आणि फुकट उपलब्ध आहे.

हे मिडीयाविकि सॉफ्टवेयर वापरते, त्यामुळे इंटरनेटला पोच असणारे कोणीही याच्या संपादनात, यात भर घालण्यात, सुधारण्यात केवळ एक क्लिक करून भाग घेऊ शकतात. प्रत्येक लेखातून दुव्यांच्या द्वारे वाचक दुसरे संबंधित लेख, चित्रे, संदर्भ इत्यादी यांच्याकडे पोचू शकतो. कोणीही वाचक अधिक माहिती, संदर्भ हे विकिपीडियाच्या संपादनाची पथ्ये पाळत भरू शकतो. सतत वाढत असलेले, सर्वांना मुक्तद्वार असलेले हे साहित्य इतर छापील साहित्याहून साहजिकच वेगळे आहे. यातील जुने लेख जास्त परिपूर्ण, संतुलित असतात. उलट नवीन लेखांत चुकीची माहिती, किंवा खोडसाळपणे भरलेली माहिती असू शकते. वाचकांना याकडे लक्ष द्यावे लागते. परंतु अनेक जण स्वयंस्फूर्तीने लेख तपासून सुधारत असतात, व चुकीची माहिती फार वेळ टिकून राहात नाही. छापील ग्रंथांपेक्षा विकिपीडिया खूपच अद्ययावत् असतो. उदाहरणार्थ, भारतावर त्सुनामीचा तडाखा बसल्यावर २-३ दिवसातच याच्यावर चांगला लेख विकिपीडियात उपलब्ध झाला.

सांख्यिकी

[संपादन]

आज शंभरावर भाषांत ५० हजारांहून जास्त लोकांनी योगदान केलेले ४० लाखांवर लेख विकिपीडियात उपलब्ध आहेत. यातील १४ लाख लेख इंग्रजीत आहेत. सर्व अधिकृत वापरातील भारतीय भाषांच्यात विकिपीडियाच्या आवृत्या आहेत. त्यात तेलगूत ४० हजार लेख आहेत. मराठीत १३ हजार. रोज लाखो लोक हे लेख वाचतात व बारिक सारिक सुधारणा सुचवतात. हजारो नवे लेख रोज लिहिले जातात. नवी माहिती लिहिण्यास वाचकांनी त्या विषयातले तज्ञ असण्याची जरुरी नसते. आणि सर्व वयाचे लोक आपापल्या आवडीनुसार माहितीत भर घालत राहतात.

विकिपीडिया सहप्रकल्प

[संपादन]

विकिपीडिया या विश्वकोशाबरोबरच, इतर सहप्रकल्प राबवत आहेत.

१) विक्शनरी शब्दकोश व पर्यायकोश

२) विकिबुक्स, फुकट पाठ्यपुस्तक रचना

३) विकिस्रोत, प्रताधिकार मुक्त/फुकट ग्रंथ संग्रह

४) विकिस्पेसिज, जीवजातींबद्दलचा मुक्त संदर्भ

५) विकिकॉमन्स, सर्वांना उपलब्ध फोटो, व्हिडियो इत्यादी

दर्जा आणि विश्वासार्हतेची पाठराखण

[संपादन]

विकिपीडियातील लेख हे विश्वकोशाच्या धर्तीवरचे, म्हणजे इतरत्र प्रकाशित संदर्भ देणारे, सर्वमान्य माहितीवर आधारित असतात.

माहितीची विश्वासार्हता जपण्याच्या दृष्टीने केवळ वैयक्तिक निरीक्षणावर (व्यक्तिगत मते) आधारित लेखन स्वत:चे स्वत:विकिपीडियात प्रकाशित करता येत नाहीत. उदाहरणार्थ 'रानवा' या पुण्याच्या सेवाभावी संस्थेने <http://www.ranwa.org/punealive.htm> या संकेतस्थळावर पुण्याच्या जैवविविधतेवर अनेक शास्त्रीय लेख, शास्त्रज्ञांनी तपासून मग प्रकाशित केले आहेत. यातील माहितीच्या आधारे पुण्यातील नदीतील माशांवर अथवा पक्ष्यांवर विकिपीडियात लेख लिहिता येईल. पण जर बारामतीच्या शारदाबाई पवार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतः कर्‍हा नदीत मासे गोळा करुन, त्यांची छायाचित्रे व इतर माहिती असा लेख बनवला व त्यात वैयक्तीक नीष्कर्ष(मते) मांडली , तर तो विकिपीडियात भरता येणार नाही. परंतु असा लेख त्या महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर मिडीयाविकि सॉफ्टवेअर वापरून प्रकाशित करता येईल. माशांबद्दल माहिती असलेले तज्ञ हा लेख वाचून, त्यातील छायाचित्रे तपासून लेख सुधारू शकतील. इतर जण, कातकरी, भोई व इतर मच्छीमार सुद्धा, हा लेख वाचून त्यात माहितीची भर घालू शकतील.

आपण पकडलेल्या माशांची छायाचित्रे विकिकॉमन्स प्रकाशित करु शकतील, मासे, नदी, संबंधित शब्द मराठी विक्शनरी नमूद करु शकतील. अशा लेखांतून इतर 'फिशबेस' सारख्या माशांवरील शास्त्रीय लेखांशी दुवे जोडून देऊ शकतील.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "महाराष्ट्र जनुक कोश प्रकल्प जोरात". १४ ऑक्टोबर २०२० रोजी पाहिले.