Jump to content

गोंधळ (लोकपरंपरा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गोंधळ या पानावरून पुनर्निर्देशित)
संबळ वादक

प्रस्तावना

[संपादन]

गोंधळ हा देवीच्या उपासनेशी संबंधित धार्मिक आणि सांस्कृतिक कलाप्रकार आहे. []विशेषतः महाराष्ट्र राज्यात गोंधळी या जमातीतील लोक गोंधळ सादर करतात. महाराष्‍ट्र, कर्नाटक, मध्‍यप्रदेश आणि आंध्रप्रदेश या प्रांतात विशेषेकरून आढळतात. गोंधळ्यांनी आपल्‍या विधिनाट्याची एक स्‍वतंत्र रंगभूमी विकसित केली असून आपल्‍या या रंगभूमीवरील रंगाविष्‍काराला संस्‍थात्‍मक स्‍वरूप प्राप्‍त करून दिले आहे. महाराष्ट्रातील लोककला या प्रकारात कीर्तन आणि तमाशानंतर गोंधळाला विशेष महत्त्व आहे. गोंधळ आणि गोंधळी प्राचीन काळापासून लोककला प्रकारात मोडली गेले आहे. विशेषतः तुळजाभवानी आणि रेणुकामाता या देवींच्या संदर्भात गोंधळ घालण्याची पिढीजात परंपरा आहे. कालांतराने अन्य देवींच्या बाबतीतही गोंधळ घालण्याची प्रथा सुरू झाली.

स्वरूप

[संपादन]

गोंधळी हे देवीचे उपासक असून ते गोंधळ या विधिनाट्याद्वारे मंगल कार्याची सांगता करतात.[] महाराष्‍ट्रात गोंधळ्यांच्‍या मराठे‚ कुंभार, कदमराई व रेणूराई अशा पोटजाती असल्‍याचे उल्‍लेख असले तरी गोंधळ्यांनी रेणुराई आणि कदमराई अशाच आपल्‍या पोटजाती असल्‍याचे सांगितले. यांनाच रेणूराव व कदमराव असेही म्‍हणतात. रेणुराई हे माहूरच्‍या रेणुकेचे भक्त असून ते रेणुकेचीच उपासना करतात. तर कदमराई हे तुळजापूरच्‍या भवानीचे भक्त असून तिचीच पूजा मांडतात. गोंधळाचे विधिनाट्य सादर करण्‍यालाच गोंधळ घालणे अशी संज्ञा आहे.

चित्रफीत

[संपादन]
Dance of Muralis

कुलाचार महत्व

[संपादन]

लग्‍नासारख्‍या विधीत गोंधळाच्‍या कुळाचारास अनन्‍यसाधारण महत्त्व आहे. लग्न समारंभ , नवीन घर बांधणे किवा विकत घेणे या शुभ समयी आपल्याला होणाऱ्या आनंदात दुसऱ्यांना सहभागी करून घेण्यासाठी गोंधळ हा कार्यक्रम ठेवतात. सद्यस्थितीत गोंधळाचे जे प्रचलित स्‍वरूप आहे त्‍यात गोंधळ्यांची संख्‍या चार किंवा आठ असते. त्‍यातील एक प्रमुख गोंधळी असतो, बाकी त्‍याचे साथीदार असतात. वाद्यांमध्‍ये तुणतुणे आणि संबळ ही प्रमुख वाद्ये आहेत. तर कधी गोंधळी हाच वादकाची भूमिका बजावत असतो. आणि एखादा साथीदार दुसऱ्या वाद्यासह साथ करतो. आज रूढ असलेल्‍या गोंधळाच्‍या प्रकारात काकड्या गोंधळ व संबळ्या गोंधळ असे दोन प्रकार आढळतात. काकड्या गोंधळ हे कोणत्‍याही जातीचे लोक करू शकतात, तर संबळ्या गोंधळ हा गोंधळी जातीचे लोकच घालतात. गोंधळ करण्‍याच्‍या पद्धतीत दोन्‍ही उपजातींच्‍या पोषाखामुळे आणि परंपरेने चालत आलेल्‍या संकेतांमुळे काही भेद निर्माण झाले आहेत. उदा. रेणुराई गोंधळी विधिनाट्याच्‍या वेळी समोर दिवटी ठेवतो. कदमराई गोंधळी हातात जळता पोत घेऊन गाणी म्‍हणतात. ते एका हाताने संबळ वाजवतात. कदमराई गोंधळ्यांनाच भुत्‍ये‚ राजदरबारी गोंधळी असे म्‍हणतात. गोंधळी हा गोंधळ विधी सादर करताना परंपरेने चालत आलेल्‍या सांकेतिक करपल्‍लवीने प्रेक्षकांना चकित करतात. करपल्‍लवीच्‍या वापराने त्‍यांचे सादरीकरण न केवळ चमत्‍कृतीपूर्ण होते तर नाट्यपूर्ण व रंजकही होते. परशुरामाने गोंधळ्याची निर्मिती कशी केली हे जसे ते कवनांमधून सांगतात त्‍याचप्रमाणे उदरनिर्वाहाची तरतूद भवानी मातेने आशीर्वाद दिल्‍यामुळे कशी झाली यासंबंधीची कथाही त्‍यांच्‍या कवनांतून गातात.

गीतांचे स्वरूप

[संपादन]
Mother and Son presenting folksong at Jejuri Pilgrimage


गोंधळातील गीत समारंभात देवीची स्तुतिगीते असतात. कृष्णकथा गुंफणाऱ्या गौळणी असतात. वीरांचे पराक्रम गाणारे पोवाडे असतात. आध्यात्मिक भेदिक रचना असतात. ग्रामीण जीवनातील वास्तवावर उपरोधिक भाषेत प्रकाश चाकणारी गीते असतात, तर कीर्तनकारांच्या उत्तररंगात रंगणारी आख्यानगीतेही असतात. गोंधळाच्या उत्तररंगात आख्यान लावले जाते. त्यात अंबरीष राजा, विक्रम राजा, जांभुळ आख्यान, चांगुना आख्यान यांसारखी आख्याने, निरुपण, निवेदन, विनोदी बतावणी, गमतीशीर संवाद यांसह गोंधळी रंगवून रंगवून सांगतो.[]

पोशाख

[संपादन]

मुख्‍य गोंधळ्याच्‍या कपाळावर कुंकवाचा मळवट भरलेला असतो. तसेच गळ्यात कवड्यांच्या माळा असतात.पोषाखात जामा किंवा पायघोळ अंगरखा, धोतर किंवा पायजमा,डोक्यावर मावळी पगडी, मुंडासे, उपरणे इ. घटकांचा समावेश असतो. अंगात तेलकट झबला, कपाळावर कुंकू, गळ्यात देवींची प्रतिमा व कवड्यांची माळ अशा वेश��ूषेत आपल्या दारावर आलेली व्यक्ती म्हणजे गोंधळी. अंबेमातेच्या जयजयकार करीत ही व्यक्ती संबळ आणि तुणतुणे या वाद्यांच्या साहाय्याने विविध देवींचे गाणे सादर करतो. संबळाच्या तालावर नृत्यही करतो. त्याला 'संबळ गोंधळ' म्हणतात. तर काही गोंधळी काकडे पेटवून गोंधळ घालतात. ज्याला 'काकड्या गोंधळ' असे म्हणले जाते.[]

सादरीकरणाचा क्रम

[संपादन]

गोंधळामध्ये सादरीकरण करताना सुरुवातीला सर्व देवी - देवतांना आवाहन केलं जातं त्यानंतर श्रीगणेशाला वंदन करून गण गायला जातो,त्यानंतर आदिशक्ती कुलस्वामिनीला आवाहन केलं जातं आणि तिचा महिमा गाण्याच्या स्वरूपात सादर केला जातो,त्यानंतर श्रीकृष्णाच्या कथा किंवा आदिशक्ती कुलस्वामीनीच्या कथा सांगितल्या जातात त्यानंतर जोगवा आणि पावुड गायला जातो आणि शेवटी देवीची आरती करून गोंधळाचा शेवट केला जातो असा गोंधळाच्या सादरीकरणाचा क्रम आहे.संबळ, तुणतुणे, टाळ, झांजरी, डिमडी, इत्यादी वाद्यांचा व हातातल्या दिवटीचा उपयोग केला जातो.

  • पूर्वरंगग व उत्तररंग

पूर्वरंग व उत्तररंग अशा दोन विभागात गोंधळ सादर केला जातो. गोंधळ सुरू होण्‍यापूर्वी पाच उसांची मखर केली जाते. त्‍यामध्‍ये देवीच्‍या स्‍वरूपात घट ठेवतात आणि गोंधळाला सुरुवात होते. या विधिनाट्याची सुरुवात गणेशस्‍तुतीने होते. कुलस्‍वामिनी अंबाबाईच्‍या विविध रूपांचे गायन केले जाते. व उत्तररंगात एखादे पौराणिक, सामाजिक किंवा देवाविषयीचे आख्‍यान सादर केले जाते. शेवटी भैरवीच्‍या माध्‍यमातून समारोप होतो. आरतीने शेवट होतो.

लोकलाप्रकारात झालेले बदल

[संपादन]

एके काळी चार- चार तास चालणारा गोंधळ आज तासाभरात उरकला जातो. वाढत्‍या मनोरंजनाच्‍या साधनांमुळे गोंधळाचे महत्त्व कमी होत चालले आहे. गोंधळातील गीतांच्‍या चाली बदलत आहेत. योग्‍य तो प्रतिसाद मिळत नाही.एक उपचार म्‍हणून आज गोंधळ पार पाडला जातो.[]

गाेंधळगीत

[संपादन]


अंबे जोगवा दे जोगवा दे
माय माझ्या भवानी जोगवा दे ।

हे जसे शक्तीची भक्ती करणारे गीत आहे तसे-

मी मिरचीचे भांडण ।
एका रोज खटखटीन जी ॥
मिरची अंगी लईच ताठा ।
म्हणतिया मी हाई तिखटजी ॥

असे विनोदी गीतही सादर केले जाते.

उदा.
रत्‍नागिरी ज्योतिबा ।
गोंधळा या हो ।
तुळजापूरची अंबाबाई गोंधळा या हो।
पंढरपूरचे विठोबा गोंधळा या हो ।

असे गीत गाऊन आमंत्रित केले जाते. त्यात वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. सर्वसाधारणपणे रात्री ९ च्या सुमारास सुरू झालेला गोंधळ पहाटेपर्यंत सुरू असतो. यासाठी कुठलाही रंगमंच लागत नाही. घरापुढील आंगण, ओटा चालतो. रंगभूषा आणि नेपथ्यही नसते. संत साहित्यात देखिल गोंधळाचा उल्लेख आढळतो. संत एकनाथांनी -

द्वैत सारूनि माळ मी घालीन।
हाती बोधाचा झेंडा मी घेईन।
भेदरहित वारीस जाईन।


हे ही पहा

[संपादन]

जागरण गोंधळ

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ हिर्लेकर, श्रीरंग (2015-04-15). Hindu Dharma Shastra Ase Sangte / Nachiket Prakashan: हिंदू धर्म शास्त्र असे सांगते. Nachiket Prakashan.
  2. ^ "जागरण – गोंधळ". My Mahanagar. 2021-03-21. 2024-09-26 रोजी पाहिले.
  3. ^ देखणे, डॉ. रामचंद्र (25 मार्च 2005). गोंधळःपरंपरा,स्वरुप आणि आविष्कार. पुणे: पद्मगंधा प्रकाशन. p. 31.
  4. ^ वृत्तसेवा, सकाळ (2023-10-28). "Gondhali : नवीन पिढी दूर जातेय; गोंधळ लोककलेला मिळावा राजाश्रय, गोंधळी समाजाची मागणी". Marathi News Esakal. 2024-09-26 रोजी पाहिले.
  5. ^ खोचारे, संजय (2020-02-07). "गोंधळातून समाज प्रबोधन करणारा गोंधळी". Marathi News Esakal. 2024-09-26 रोजी पाहिले.