पु.ल. देशपांडे

मराठी विनोदी लेखक, अभिनेते, नाटककार
(पु. ल. देशपांडे या पानावरून पुनर्निर्देशित)

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे तथा पु.ल. देशपांडे (८ नोव्हेंबर १९१९ - १२ जून २०००) हे एक लोकप्रिय मराठी विनोदी लेखक होते. ते एक प्रसिद्ध अभिनेते, पटकथालेखक, संगीतकार आणि गायकही होते. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे त्यांना म्हणले जाते. त्यांच्या आद्याक्षरांवरून ते नेहमी पु.ल. म्हणून ओळखले जातात.

पु.ल. देशपांडे
बडोदे, गुजरात
जन्म नाव पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे
टोपणनाव पु.ल., भाई
जन्म नोव्हेंबर ८, इ.स. १९१९
मुंबई
मृत्यू १२ जून, २००० (वय ८०)
पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र नाटककार, साहित्यकार, संगीतकार
विनोद, तत्त्वज्ञान, दूरचित्रवाणी, संगीत दिग्दर्शक
वडील लक्ष्मण त्रिंबक देशपांडे
आई लक्ष्मीबाई लक्ष्मण देशपांडे
पत्नी सुनीता देशपांडे
अपत्ये मानसपुत्र दिनेश ठाकूर
पुरस्कार पद्मश्री सन्मान
महाराष्ट्र भूषण
साहित्य अकादमी
महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्कार
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
पद्मभूषण
स्वाक्षरी पु.ल. देशपांडे ह्यांची स्वाक्षरी

पु. ल. देशपांडे हे शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, होते. त्यांनी एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत काम केले.[][]

त्यांच्या पुस्तकांची इंग्रजी आणि कन्नडसारख्या बऱ्याच भाषांमध्ये भाषांतरे झालेली आहेत. [] दूरदर्शन सुरू झाल्यावर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची पहिली मुलाखत देशपांडे यांनी घेतली होती. [][] भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ २००२ साली त्यांच्या नावाचे टपाल तिकीट प्रकाशित केले.[] अनुक्रमे चौथे आणि तिसरे सर्वोच्च नागरी सन्मान असलेले पद्मश्री (१९६६) आणि पद्मभूषण(१९९०) देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला. []

 
पु.ल.देशपांडे यांचे छायाचित्र असलेले पोस्टाचे तिकीट

पु.ल.देशपांडे यांचा जन्म मुंबईतील गावदेवी या भागात गौड सारस्वत ब्राह्मण (जी.एस.बी.) कुटुंबामध्ये झाला. त्यांचे बालपण जोगेश्वरी येथील सारस्वत कॉलनीत गेले. त्यांनी पार्ले टिळक विद्यालयात शालेय शिक्षण घेतले आणि नंतर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात ते शिकले. १९४० च्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी ते काही काळ शाळेमध्ये शिक्षक होते. १९४६ साली ते सुनीताबाईंशी विवाहबद्ध झाले.[ संदर्भ हवा ] त्यांचे आजोबा वामन मंगेश दुभाषी हे एक कवी व साहित्याचे जाणकार होते. रवीन्द्रनाथ टागोर लिखित गीतांजली हा काव्यसंग्रह तयांनी 'अभंग गीतांजली' या नावाने मराठी मध्ये भाषांतरित केला होता.

मराठी साहित्य व संगीतातील योगदानाव्यतिरिक्त पु.लं.चे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य लक्षणीय आहे. ते उत्तम संवादिनी वादक होते, तसेच त्यांनी काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही केले.[ संदर्भ हवा ]

मृत्यू

संपादन

पु.ल. देशपांडे यांचे १२ जून २००० रोजी पुणे येथे पार्किन्सन्स आजाराच्या गुंतागुंतीमुळे निधन झाले. ते तेव्हा ८० वर्षांचे होते. हा दिवस म्हणजे त्यांच्या लग्नाचा ५४ वा वाढदिवस होता. [] []

बालपण आणि शिक्षण

संपादन

देशपांडे यांचे वडील हे अडवाणी कागद कंपनीत दीडशे रुपये पगारावर फिरते विक्रेते होते. फिरतीवर असताना जेवणाखाण्याचा भत्ता मिळे. एकदा कोल्हापूरला असताना ते बहिणीकडे जेवले. त्यादिवशी त्यांनी भत्ता घेतला नाही अशी आठवण पु.ल. देशपांडे यांनी सांगितली.[ संदर्भ हवा ]

देशपांडे लहानपणापासूनच धष्टपुष्ट होते. वयाच्या दुसऱ्या वर्षी ते पाच वर्षांच्या मुलाएवढे दिसत होते. ते हुशार होते आणि सतत काहीना काही करत असत. त्यांना स्वस्थ बसण्यासाठी घरचे लोक पैसा देऊ करायचे, पण हे त्यांना जमले नाही. आजोबांनी लिहून दिलेले आणि पु.लं.नी पाठ केलेले दहा-पंधरा ओळींचे पहिले भाषण पु.लं.नी वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या शाळेत हावभावासहित खणखणीत आवाजात म्हणून दाखवले. सात वर्षे अशी भाषणे केल्यानंतर वयाच्या बाराव्या वर्षापासून देशपांडे स्वतःची भाषणे स्वतःच लिहायला लागले आणि इतरांनाही भाषणे आणि संवाद लिहून देऊ लागले.[ संदर्भ हवा ]

पुलंना घरात खूप वाचन करायला आणि रेडिओवरील संगीत ऐकायला मिळाले. त्यांच्या घरी संगीताच्या बैठकाही होत असत. ते घरीच बाजाची पेटी शिकले. टिळक मंदिरात एकदा बालगंधर्व आले असताना पु.लं.नी त्यांना पेटी वाजवून दाखवली. बालगंधर्वांनी शाबासकी दिली आणि भावी कलाजीवनासाठी शुभेच्छा दिल्या. लोकांच्या वागण्यातील विसंगती आणि हास्यास्पद गोष्टी हेरून पु.ल. त्या लोकांच्या नकला करायचे, म्हणून घरी कुणी आले असताना पुरुषोत्तम जवळ नसलेलाच बरा असे आईला वाटे. देशपांड्यांची आई कारवारी, वडील कोल्हापूरचे आणि बहीण कोकणात दिलेली, त्यामुळे घरात भोजनात विविधता असे. यातूनच पु.ल. खाण्याचे शौकीन झाले.[ संदर्भ हवा ] वडिलांच्या मृत्यूनंतर देशपांडे गाण्याच्या, पेटीच्या व अन्य शिकवण्या करू लागले. ते शाळेत असल्यापासूनच भावगीते गायचे आणि गीतांना चाली लावायचे. कॉलेजात असताना त्यांनी राजा बढे यांच्या माझिया माहेरा जा या कवितेला चाल लावली. आज ते गाणे मराठी भावसंगीतातील अनमोल ठेवा समजला जातो. ग.दि. माडगूळकरांनी लिहिलेल्या आणि भीमसेन जोशींनी गायलेल्या इंद्रायणी काठीला पु.लं.नी चाल लावली होती. हेही गाणे अजरामर झाले.[ संदर्भ हवा ]

कॉलेजमध्ये असताना पु.ल. गायकांना साथ करीत. पु.ल. पेटी वाजवत, त्यांचा भाऊ रमाकांत तबला आणि मधुकर गोळवलकर सारंगी वाजवीत. मिळालेले १५ रुपये तिघेही वाटून घेत. पार्ले टिळक विद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पु.ल.देशपांडे मुंबईतील इस्माईल युसुफ कॉलेजातून इंटर व सरकारी लॉ कॉलेजमधून एल्‌एल.बी. झाले, आणि कलेक्टर कचेरी व प्राप्तीकर विभागात काही काळ नोकरी करून पुण्याला आले. त्यापूर्वी ते पेट्रोल रेशनिंग ऑफिसमध्ये कारकून आणि ओरिएंटल हायस्कूलमध्ये शिक्षक होते. पुण्याला आल्यावर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए.आणि नंतर एम.ए. केले.[ संदर्भ हवा ]

कारकीर्द

संपादन

१९३७पासून नभोवाणीवर पु.ल.देशपांडे छोट्या मोठ्या नाटिकांत भाग घेऊ लागले. त्या वर्षी त्यांनी अनंत काणेकरांच्या 'पैजार' या श्रुतिकेत काम केले. १९४४ साली पु.लंनी लिहिलेले पहिले व्यक्तिचित्र - भय्या नागपूरकर - अभिरुची या नियतकालिकातून प्रसिद्ध झाले. याच दरम्यान त्यांनी सत्यकथामध्ये 'जिन आणि गंगाकुमारी ही लघुकथा लिहिली. १९५६ मध्ये[ संदर्भ हवा ] प्रकाशित झालेले 'बटाट्याची चाळ' हे त्यांचे विनोदी पुस्तक प्रसिद्ध आहे.[१०]

फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये असताना देशपांडे यांनी चिंतामण कोल्हटकरांच्या 'ललितकलाकुंज'व 'नाट्यनिकेतन' या नाट्यसंस्थांच्या नाटकांतून भूमिका करायला सुरुवात केली.[ संदर्भ हवा ]

१९४८साली पु.ल.देशपांडे यांनी तुका म्हणे आता हे नाटक आणि बिचारे सौभद्र हे प्रहसन लिहिले.[ संदर्भ हवा ]

चित्रपटसृष्टीत पदार्पण

संपादन

१९४७ ते १९५४ या काळात त्यांनी चित्रपटांमध्ये आणि चित्रपटांसाठी काम केले. वंदे मातरम्‌, दूधभात‘ आणि गुळाचा गणपती या चित्रपटांत त्यांनी अष्टपैलू कामगिरी केली. गुळाचा गणपती या चित्रपटांत कथा, पटकथा, काव्य, संगीत, भूमिका आणि दिग्दर्शन सर्वच पुलंचे (सबकुछ पु.ल!) होते.[ संदर्भ हवा ]

भाग्यरेखा या मराठी चित्रपटात पुलंची भूमिका होती.

१९४७सालच्या मो.ग. रांगणेकरांच्या कुबेर चित्रपटाला देशपांडे यांनी संगीत दिले आणि चित्रपटातील गाणी देखील गायले. वंदे मातरम्‌मध्ये देशपांडे व त्यांच्या पत्‍नी सुनीताबाई यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यात पु.ल. देशपांडे गायक-नट होते. पु.ल.देशपांडे यांचा देवबाप्पा प्रसिद्ध झाला व त्यातील ’’नाच रे मोरा’’ हे गाणे अनेक दशके प्रसिद्धीत राहिले. पुढचे पाऊल या चित्रपटात त्यांनी कृष्णा महाराची भूमिका केली.[ संदर्भ हवा ]

संगीतकार पु.ल. देशपांडे

संपादन

पु. ल. देशपांडे यांनी 'अंमलदार','गुळाचा गणपति','घरधनी','चोखामेळा', दूधभात', 'देव पावला', 'देवबाप्पा', 'नवराबायको', 'नवे बिऱ्हाड', 'मानाचे पान' आणि 'मोठी माणसे' या अकरा चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले. याशिवाय ज्योत्स्ना भोळे, माणिक वर्मा व आशा भोसले यांच्याकडून पुलंनी गाऊन घेतलेल्या भावगीतांची संख्या विशीच्या घरात जाईल.

'गुळाचा गणपती'मधील 'इंद्रायणी काठीं' ह्या भीमसेन जोशींनी लोकप्रिय केलेल्या गाण्याचे संगीत पु.ल. देशपांडे यांचे होते.

नभोवाणी आणि दूरचित्रवाणी

संपादन

१९३७पासून पुलंचा नभोवाणीशी संबंध आलाच होता. १९५५मध्ये पु.ल.देशपांडे ’आकाशवाणी‘त (ऑल इंडिया रेडिओत) नोकरीला लागले. आकाशवाणीसाठी त्यांनी अनेक श्रुतिका लिहिल्या आणि भाषणे दिली. ५६-५७मध्ये ते आकाशवाणीवर प्रमुख नाट्यनिर्माता झाले. बदलीवर दिल्लीला गेले असताना त्यांनी व सुनीताबाईंनी ’गडकरी दर्शन‘ नावाचा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमातूनच ’बटाट्याची चाळ’चा जन्म झाला. बटाट्याच्या चाळीला अभूतपूर्व लोकप्रियता लाभली.[ संदर्भ हवा ]

१९५८मध्ये पुलंना आकाशवाणीने युनेस्कोच्या शिष्यवृत्तीवर मीडिया ऑफ मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमासाठी लंडनला बीबीसीकडे पाठवले. १९५९मध्ये पु.ल. देशपांडे भारतातील पहिले दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्माते झाले. दिल्ली दूरदर्शनवर सुरू झाले त्यावेळचा पहिला कार्यक्रम पुलंनी निर्मिला होता. दूरदर्शनवरील बिरजू महाराजांच्या नृत्याचा कार्यक्रम होता. संथ गतीत सुरू झालेल्या नृत्याची लय वाढत वाढत चौपट झाली. अश्या वेळी त्या द्रुतगतीतही तबला वाजवून पुलंनी आपले तबला प्रावीण्य दाखवून दिले.[ संदर्भ हवा ]

पुरस्कार आणि सन्मान

संपादन
  • साहित्य अकादमी पुरस्कार ("व्यक्ती आणि वल्ली"साठी)- १९६५
  • पद्मश्री- १९६६
  • संगीत नाटक अकादमी पुरस्कार- १९६७
  • संगीत नाटक अकादमी फेलोशीप- १९७९
  • कालीदास सन्मान- १९८७
  • पद्मभूषण- १९९०
  • पुण्यभूषण"- १९९२
  • महाराष्ट्र भूषण पुरस्कार- १९९६
  • रवींद्र भारती विद्यापीठ(१९७९), पुणे विद्यापीठ(१९८०) आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ(१९९३) कडून मानाची डी. लिट. पदवी
  • महाराष्ट्र गौरव (बहुरूपी) पुरस्कार
  • नवीन स्थापन झालेल्या दूरदर्शनसाठी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंची मुलाखत घेणारी पहिली व्यक्ती
  • महाराष्ट्र शासनाकडून त्यांच्या सन्मानार्थ २००२ साली मुंबईत "पु.ल. देशपांडे कला अकादमी"ची स्थापना[११]
  • पुण्यातील सुप्रसिद्ध पु. ल. देशपांडे उद्यान ("पुणे-ओकायामा मैत्री उद्यान" या नावानेही ओळखले जाते.)
  • ८ नोव्हेंबर २०२०ला गुगलने त्यांच्या १०१ व्या जन्मदिवसानिमित्त गुगल डूडल तयार करून आदरांजली वाहिली.
  • PuLa100 नावाचा संगणक फॉन्ट, जो देशपांडे यांच्या हस्ताक्षरावर आधारित आहे, २०२० साली उपलब्ध झाला.[१२]

लोकप्रिय माध्यमांमध्ये

संपादन

पु.ल. आणि त्यांच्या लिखाणाबद्दल लिहिली गेलेली पुस्तके

संपादन
  • अमृतसिद्धी : (स.ह.देशपांडे, मंगला गोडबोले), पु.ल.देशपांडे गौरवग्रंथ
  • असा मी... असा मी... (संकलन, संकलक - डाॅ. नागेश कांबळे)
  • जीवन त्यांना कळले हो ! (सहसंकलक - अप्पा परचुरे,) पु.ल. देशपांडे यांच्याबद्दल विविध साहित्यिकांव्च्या लेखांचे संकलन)
  • पाचामुखी (संकलन : पु.ल. देशपांडे यांच्या भाषणांचे आणि मुलाखतींचे संकलन).
  • पुन्हा मी..पुन्हा मी! (संकलक. डाॅ. नागेश कांबळे)
  • पुरुषोत्तमाय नम: (मंगला गोडबोले)
  • पु.ल. : एक साठवण (संपादक जयवंत दळवी)
  • पु.ल. चांदणे स्मरणाचे (मंगला गोडबोले)
  • पु. ल. देशपांडे यांचे निवडक विनोद (तुषार बोडखे)
  • पु. ल. नावाचे गारुड (संपादक - मुकुंद टाकसाळे)
  • बदलते वास्तव आणि पु. ल. देशपांडे (प्रकाश बुरटे) [संदर्भ: लोकवाङ्मय गृह, मुंबई. पहिली आवृत्ती १९८२, दुसरी आवृत्ती १९९६.[१३]
  • भावगंध (पु.ल. देशपांडे यांच्या काही लेखांचे संकलन)
  • विस्मरणापलीकडील पु.ल. (गंगाधर महाम्बरे)[ संदर्भ हवा ]

चित्रपटांची यादी

संपादन
वर्ष-इसवी सन चित्रपटाचे नाव भाषा कामगिरी
१९४७ कुबेर मराठी अभिनय
१९४८ भाग्यरेषा मराठी अभिनय
१९४८ वंदे मातरम् मराठी अभिनय
१९४९ जागा भाड्याने देणे आहे मराठी पटकथा, संवाद
१९४९ मानाचे पान मराठी कथा-पटकथा-संवाद (ग.दि.माडगूळकरांसह); संगीत
१९४९ मोठी माणसे मराठी संगीत
१९५० गोकुळचा राजा मराठी कथा, पटकथा, संवाद
१९५० जरा जपून मराठी पटकथा, संवाद
१९५० जोहार मायबाप मराठी अभिनय
१९५० नवरा बायको मराठी कथा, पटकथा, संवाद, संगीत
१९५० पुढचं पाऊल मराठी पटकथा, संवाद (ग.दि.माडगूळकरांसह); अभिनय
१९५० वर पाहिजे मराठी कथा (अच्युत रानडे यांच्यासह); संवाद
१९५० देव पावला मराठी संगीत
१९५२ दूधभात मराठी कथा, पटकथा, संवाद, गीतरचना, संगीत
१९५२ घरधनी मराठी पटकथा, संवाद, गीतरचना, संगीत
१९५२ संदेश हिंदी कथा, पटकथा, संवाद (संवादाचे हिंदी भाषांतर: मीर असगर अली)
१९५३ देवबाप्पा मराठी पटकथा, संवाद, संगीत, गीतरचना(ग.दि.माडगूळकरांसह)
१९५३ नवे बिऱ्हाड मराठी संवाद, संगीत
१९५३ गुळाचा गणपती मराठी कथा, पटकथा, संवाद, संगीत, अभिनय, दिग्दर्शन
१९५३ महात्मा मराठी, हिंदी, इंग्रजी कथा
१९५३ अंमलदार मराठी पटकथा, संवाद, संगीत, अभिनय
१९५३ माईसाहेब मराठी पटकथा, संवाद
१९६० फूल और कलियॉं हिंदी कथा, पटकथा
१९६३ आज और कल हिंदी कथा, पटकथा

साहित्य

संपादन

अनुवादित कादंबऱ्या

संपादन

प्रवासवर्णने

संपादन

व्यक्तिचित्रे

संपादन

चरित्रे

संपादन

गांधीजी (२ ऑक्टोबर १९७०)[ संदर्भ हवा ]

एकपात्री प्रयोग

संपादन

एकांकिका-संग्रह

संपादन

नाटके

संपादन

लोकनाट्ये

संपादन

काही विनोदी कथा

संपादन

व्यक्तिचित्रे

संपादन

संकीर्ण

संपादन


पुलंची काही प्रासंगिक वाक्ये

संपादन
  • ‘‘एखादा प्रश्न सरकारच्या विचाराधीन आहे या इतके विनोदी विधान अन्य नाही,’’ असे पु. ल. देशपांडे म्हणत. सरकार विचार करते ही त्यांच्या मते विनोदी कल्पना. फटाक्यांसंदर्भात दिवाळीच्या तोंडावर विविध शासनांनी घेतलेले निर्णय पुलंच्या विधानाची कालातीतता दाखवून देतात. करोनासाथ जाणारी नाही, यात श्वसनाचा विकार होतो, ज्यांना तो आहे त्यांचा बळावतो हे सरकारला गेले सहा महिने ठाऊक आहे आणि यंदा दीपावली कधी आहे हे माहीत नसण्याची शक्यता नाही. तरीही फटाक्यांवरील बंदीसाठी सरकारला दिवाळी तोंडावर यावी लागली. आणि ही बंदी तर मूळ निर्णयापेक्षा विनोदी. फटाके विकायला, विकत घ्यायला बंदी नाही. पण विकत घेतलेले फटाके फोडायला मात्र बंदी. अशी कमाल फक्त सरकारच करू शकते.

उल्लेखनीय

संपादन
  • दूरदर्शनच्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते.[ संदर्भ हवा ]
  • साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी या दोहोंचे पुरस्कार मिळवणाऱ्या मोजक्या प्रतिभावंतात पुलंचा समावेश होतो.[ संदर्भ हवा ]
  • मुंबईच्या ’नॅशनल सेंटर फॉर परर्फॉर्मिंग आर्ट्‌स‘ (NCPA) या संस्थेत पुलंनी अनेक प्रयोग केले. संशोधकांना आधारभूत होतील असे असंख्य संदर्भ, कलांचा इतिहास, ध्वनिफिती, मुलाखती, लेख आदी बरेच साहित्य पु.लंनी जमा करून ठेवले आहे. मराठी नाटकाचा आरंभापासूनचा इतिहास त्यांनी अशा जबरदस्त प्रयत्‍नान्ती जमा केला की त्यांच्यावरून स्फूर्ती घेऊन भारतातील अनेक जणांनी त्यांच्या त्यांच्या प्रांतांतील कलांचा इतिहास जमा करून नोंदवायची सुरुवात केली. NCPAच्या रंगमंचावर पु.ल.देशपांडे यांनी देवगाणी, बैठकीची लावणी, दोन पिढ्यांची गायकी असे काही अनोखे कार्यक्रम सादर केले.[ संदर्भ हवा ]
  • पु.ल. भाषाप्रेमी होते. त्यांना बंगाली, कानडी येत असल्याने ते त्या त्या समाजातील लोकांत सहज मिसळत.[ संदर्भ हवा ]
  • पु.ल. देशपांडे यांच्या जीवनावर महेश मांजरेकर 'भाई' - व्यक्ती की वल्ली' या नावाचा मराठी चित्रपट काढला आहे.
  • पु.ल.देशपांडे यांच्या साहित्यकृतींवर आजवर बरीच नाटके आणि चित्रपट झाले आहेत. शिवाय त्यांच्या साहित्यावर आधारित ‘नमुने’ नावाची हिंदी मालिका येत असून अभिनेते संजय मोने मुख्य भूमिका साकारणार आहेत. ‘सोनी सब’ या वाहिनीवर ही मालिका प्रसारित होणार आहे. पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ ही मालिका आधारित आहे. यामध्ये सुबोध भावे आणि इतर काही मराठी आणि हिंदी कलाकारांची फौज दिसणार आहे.

पुलंची काही टोपणनावे

संपादन
  • धोंडो भिकाजी कडमडे जोशी
  • मंगेश साखरदांडे
  • बटाट्याच्या चाळीचे मालक
  • भाई
  • कोट्याधीश पु.ल.
  • पुरुषराज अळूरपांडे(उरलंसुरलं)


संदर्भ

संपादन
  1. ^ "Purushottam Laxman Deshpande". IMDb (इंग्रजी भाषेत). 2021-12-29 रोजी पाहिले.
  2. ^ "A documentary ode to Pu La Deshpande in Pune on June 12". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2018-06-10. 2022-09-13 रोजी पाहिले.
  3. ^ Jun 25, Bangalore Mirror Bureau / Updated:; 2017; Ist, 04:00. "Two good: Couple of translators bring joy to Kannada, Marathi". Bangalore Mirror (इंग्रजी भाषेत). 2021-12-29 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  4. ^ "On This Day In History! June 12, 2000 – Legendary writer Pu La Deshpande passes away; view rare pic". Free Press Journal (इंग्रजी भाषेत). 2021-12-29 रोजी पाहिले.
  5. ^ "Pandit Jawaharlal Nehru with PuLa – Broadcast Television". Google Arts & Culture. 2021-12-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-12-29 रोजी पाहिले.
  6. ^ "P. L. Deshpande Stamp Released by Govt. Of India". Google Arts & Culture. 2021-12-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-12-29 रोजी पाहिले.
  7. ^ "Padma Awards | Interactive Dashboard". www.dashboard-padmaawards.gov.in (इंग्रजी भाषेत). 2018-10-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-12-29 रोजी पाहिले.
  8. ^ PTI (12 June 2000). "Pu La Deshpande passes away". The Indian Express. 26 December 2010 रोजी पाहिले.
  9. ^ "Pu La Deshpande to come alive on silver screen – Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया. 1 November 2017 रोजी पाहिले.
  10. ^ "Batatyachi Chal". www.bookganga.com. 2018-09-05 रोजी पाहिले.
  11. ^ "P.L.Deshpande Maharashtra Kala Academy, Ravindra Natya Mandir, Prabhadevi, Mumbai". web.archive.org. 2014-06-29. 2014-06-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-12-29 रोजी पाहिले.
  12. ^ "डिजिटल फॉन्टमधील पुलंच्या अक्षरलेखनाची जादू". Loksatta. 2021-12-29 रोजी पाहिले.
  13. ^ "बदलते वास्तव आणि पु.ल. देशपांडे-Badalate Vastav Ani Pu.L. Deshpande by Prakash Burate - Lokvangmaya Griha - BookGanga.com". www.bookganga.com. 2018-09-05 रोजी पाहिले.
  14. ^ "BookGanga - Creation | Publication | Distribution". www.bookganga.com. 2018-09-05 रोजी पाहिले.
  15. ^ Deshpande, P. L. (2005). Daad (इंग्रजी भाषेत). Mauj Prakashan Griha.
  16. ^ Deshpande, P. L. (1985). Aamhi Lrike Na Bolu (इंग्रजी भाषेत). Shri Vida.
  17. ^ Deshpande, P. L. (1985). Mothe Mase Chote Mase (इंग्रजी भाषेत). Shri Vida.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिक्वोट
पु.ल. देशपांडे हा शब्द/शब्दसमूह
विकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.