अपूर्वाई (पुस्तक)
अपूर्वाई हे पु. ल. देशपांडे यांनी मराठी भाषेत लिहिलेले प्रवासवर्णनपर पुस्तक आहे. इ.स. १९६० साली हे पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित झाले.
अपूर्वाई | |
लेखक | पु. ल. देशपांडे |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | प्रवासवर्णन |
प्रकाशन संस्था | श्रीविद्या प्रकाशन |
प्रथमावृत्ती | इ.स. १९६० |
मुखपृष्ठकार | दीनानाथ दलाल |
पुस्तकातील चित्रांचे चित्रकार | शि. द. फडणीस |
पृष्ठसंख्या | २५० |
त्यांनी केलेल्या इंग्लंड, स्कॉटलंड, फ्रान्स व जर्मनी या देशांतल्या भ्रमंतीवर आधारित प्रवासवर्णन आहे. बी.बी.सी. संस्थेतर्फे आयोजलेल्या दूरचित्रवाणी क्षेत्रातल्या अभ्यासक्रमानिमित्त पु.ल.देशपांडे हे पत्नी सुनीता देशपांडे यांच्यासमवेत इंग्लंडात गेले होते. तेथील अभ्यासक्रम आटोपल्यानंतर त्यांनी नाताळाच्या सुटीत जर्मनीस भेट दिली. जर्मनीहून त्यांनी पुढे दूरचित्रवाणी क्षेत्राशी निगडित पुढील अभ्यासानिमित्त पॅरिसास प्रयाण केले. तेथील त्यांचे वास्तव्य २ महिन्यांचे होते.
या प्रवासाला निघण्याआधी केलेल्या तयारीचे, कागदपत्रे प्राप्त करण्याचे, वैद्यकीय सोपस्कार पूर्ण करायचे विविध प्रसंग पु.ल.देशपांडे विनोदी शैलीत मांडतात. प्रवासात भेटलेल्या, ओळख झालेल्या माणसांचे वर्णन यात येते. लंडन, एडिंबरा, पॅरिस इत्यादी शहरांतल्या वास्तव्यात त्यांनी अनुभवलेल्या स्थानिक नाटके, गायनवादनादि कार्यक्रमांबद्दल त्यांनी लिहिले आहे. तसेच, या विविध देशांतील सांस्कृतिक पैलूदेखील पुस्तकात विविध प्रसंगांतून दृग्गोचर होतात.