कल्याणगड

महाराष्ट्रातील किल्ला, सातारा जिल्हा

कल्याणगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

कल्याणगड (नांदगिरी)
नाव कल्याणगड (नांदगिरी)
उंची ३५०० फूट
प्रकार गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण कोरेगाव तालुका, सातारा, महाराष्ट्र
जवळचे गाव नांदगिरी, किन्हई
डोंगररांग सातारा
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}


भौगोलिक स्थान

संपादन

पुणे - बंगळूर महामार्गावर सातारा शहर वसलेले आहे. सातारा शहराच्या पूर्वेला सह्याद्रीमधील महादेव रांगेचे एक शृंग आलेले आहे. या शृंगातच नांदगिरी ऊर्फ कल्याणगड उभारलेला आहे. पुणे ते सातारा या महामार्गाच्या पूर्वेला कल्याणगड हा किल्ला आहे. सपाट माथा असलेल्या या किल्ल्याच्या माथ्यावर असलेल्या एकमेव वटवृक्षामुळे हा किल्ला दूरूनही ओळखू येतो.

कसे जाल?

संपादन

सातारा शहरापासून सातारा रोड रेल्वे स्टेशनकडे जाणारा मार्ग, महामार्ग ओलांडून जातो. या मार्गावर एस.टी. बसेसची सोय आहे. किंवा पुणे-मुंबईहून रेल्वेनेही येऊन सातारा रोड रेल्वेस्थानकावर उतरता येते. येथून चालत नांदगिरी ऊर्फ कल्याणगडाचा पायथा गाठता येतो. सातारा रोड रेल्वे स्थानकापासून हे अंतर तीन किलोमीटर आहे.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

संपादन

कल्याणगडाच्या पूर्वेकडून गडावर जाणारी पायवाट आहे. पायथ्याला धुमाळवाडी हे गाव आहे. सध्या या गावाला नांदगिरी असेही म्हणतात. नांदगिरीमधून गडावर जाणाऱ्या पायवाटेच्या सुरुवातीला काही नव्याने बांधलेल्या पायऱ्या आहेत. सुरुवातीच्या पायऱ्या संपल्यानंतर मुरमाड वाट आहे. या वाटेने आपण चढून उजवीकडील डोंगरदांडावर येतो. या मार्गावर दिशा दाखवण्यासाठी पिवळ्या रंगाचे बाण जागोजाग रंगवलेले असल्यामुळे रस्त्यात भरकटण्याची शक्यता नाही. या दांडावर आल्यानंतर डोंगरावर एक कोरलेली गुहा आहे.कल्याणगडाचे एक वेगळेपण इथे दडलेले आहे. दरवाजातून आत शिरताच समोर कातळकडा आहे. या कातळकड्याच्या डावीकडे खाली काही पायऱ्या उतरल्यावर एक गुहा आहे. गुहेमध्ये पारस्नाथ आणि दत्ताची मूर्ती आहे. इथला सगळ्यात लक्षणीय गोष्ट म्हणजे बाहेर कितीही दुष्काळ असला तरी, एवढ्या उंचीवर देखील या गुहेत पाणी झिरपते आणि आत तले बनले आहे. एक सुंदर भुगोलिक गोष्ट अशी की जिथे पाणी झिरपते इथे क्षार साठून लवण स्तंभ बनले आहेत. खरं तर या गोष्टीची कुणीही नोंद घेतलेली दिसत नाही.या गुहेत शिरण्या आधी काही काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. या कड्यातील गुहेचे जे तोंड आहे. याच्यावर आठ दहा फूट ते वीस फूट उंची वर मधमाशांची एक दोन पासून पाच सात अशी पोळी लटकलेली असतात. कांदा - लसूण अथवा धुम्रपान याने मोहोळ उठण्याची शक्यता असते. गुहेमधे पूर्णपणे अंधार आहे. त्यामुळे टॉर्चच्या उजेडातच आत शिरावे लागते. गुहेमधे पाणी आहे. हे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे चप्पल बूट बाहेर काढूनच आपल्याला आत जावे लागते. आत मार्गदर्शक अशा सळया रेलिंगसारख्या लावलेल्या आहेत. पहिले दहा पंधरा फूट गुहेची उंची कमी असल्यामुळे वाकून जावे लागते. पुढे उंची वाढल्यामुळे उभे राहून जाता येते. या मार्गावर कधी पाणी गुडघ्याएवढे असते तर कधी कमरे एवढे असते. सध्या गुहेतील वाट बांधून काढण्याचे काम गावकऱ्यांनी सुरू केलेले आहे. ते पूर्णही होत आले आहे. तीस पस्तीस फूट आत गेल्यावर नवव्या शतकातील एक पार्श्वनाथाची मूर्ती आहे. बाजूलाच दत्ताचे छोटेखानी मंदिर आहे. शेजारीच सध्या देवी मूर्तीही विराजमान झालेली आहे. हा सगळा भाग अंधार असल्यामुळे टॉर्चच्या उजेडातच पहावा लागतो. हे पाहून गोंगाट न करताच गुहेपासून दूर जावे लागते. पुन्हा दरवाजाच्याकडे येऊन येथून वरच्या दरवाजाकडे जाणारी वाट पकडावी लागते. थोडा वर गेले की डोंगर माथ्यावर कल्याणस्वामी यांची समाधी, गोरखनाथ यांचे मंदिर, एक जुने पार बांधलेले वडाचं झाड आहे. अजूनही काही पडक्या वस्तूंचे अवशेष आहेत. या ठिकाणी भुयारी रस्ता आहे पण तो सध्या जाण्यायोग्य नाही.

दरवर्षी येथे जैन धर्मीय धार्मिक कार्यक्रम करतात. तसच आसपासचे गावकरी भाविक पूजा करण्यासाठी येतात. अर्ध्या डोंगरामध्ये एक पाण्याचे कुंड आहे पण पावांचक्कीसाठी रस्ता केल्यानंतर ते आता दिसत नाही.

वरचा दरवाजा पूर्वाभिमुख असून दोन्हीकडून बुरुजांनी संरक्षित केलेला आहे. या दरवाजाच्या आत गेल्यावर समोर हनुमानाचे मंदिर आहे. शिखरावर गणपतीची मूर्ती बसवलेली आहे. मंदिराच्या डावीकडे कड्यावर एक गोलाकार पर्णकुटी उभारून सध्या एका महाराजांनी मठ स्थापन केलेला आहे.

कल्याणगडाचा माथा दक्षिणोत्तर पसरलेला असून आटोपशीर आहे. माथ्यावरील एका वास्तूचे नूतनीकरण करून भक्त मंडळीसाठी निवासस्थान उभ��रलेले आहे. या वास्तूसमोरच कल्याणस्वामी यांची समाधी असून बाजूला पाण्याचे मोठे तळे आहे. पाण्याचा उपसा नसल्यामुळे पाणी शेवाळलेले आहे. माथ्यावर वाड्याची व शिबंदीच्या घरट्यांची जोती आहेत. मध्यभागी वडाचे मोठे झाड आहे. झाडाखाली कबर आहे. दक्षिण टोकावर कोरडे पडलेले पाण्याचे टाके आहे. या टोकावरून समोरच जरंडेश्वराचा डोंगर दिसतो. सातारा शहर आणि अजिंक्यतारा किल्ला तसेच यवतेश्वराही दृष्टिपथात येतात. पूर्वेकडे किन्हईमधील यमाई देवीच्या डोंगर, तसेच एकांबेचा डोंगर दिसतो. त्यामागे भाडळीकुंडल रांगेतील वर्धनगडही दृष्टीत पडतो. संपूर्ण गड पाहण्यात तासभर पुरतो. गड पाहून, पुन्हा आल्यामार्गानेच गड उतरायला लागतो. कल्याणगडावरील वैशिष्ट्यपूर्ण असे जलमंदिर मात्र स्मृतिपटलावर कायमचे कोरले जाण्यासारखे आहे.

पहा नांदगिरी लेणी; महाराष्ट्रातील किल्ले

संदर्भ

संपादन

बाहय दुवे

संपादन